लेख

यश तुमच्या हातात 

अर्ल नाईटिंगेल यांच्या मते,

 “एखाद्या उचित ध्येयाच्या दिशेने उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणजे यश होय”

 उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा याचा अर्थ – यशाच्या कोणत्याच टप्प्यावर आपण थांबून राहत नाही. म्हणजे हा एक न संपणारा प्रवास आहे, एक उद्दिष्ट पूर्ण केल्यानंतर पुढच्या उद्दिष्टाकडे चालायला लागणं. असं करत करत आपण निश्चित केलेल्या आपल्या ध्येयनिश्चितीच्या मार्गावर पुढे पुढे चालत राहतो. यशप्राप्तीच्या या प्रवासात चालत राहणं फक्त खूप महत्वाचं आहे, कारण इथं थांबणाऱ्याचा अंत निश्चित आहे. 

यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारे काही महत्त्वाचे गुण खालीलप्रमाणे आहेत :

1. कर्तव्यनिष्ठा : 

कोणतेही काम वेळेवर आणि प्रामाणिकपणे पूर्ण करण्याची वृत्ती असणे गरजेचे आहे. ती सवय स्वतःला लावून घेणं गरजेचं आहे. एखादी गोष्ट फक्त करायची म्हणून करणं आणि ती जबाबदारी समजून करणं यात खूप फरक आहे. 

यश मिळवायचं असेल तर आपली जबाबदारी तितक्याच जबाबदारपणे पार पाडणं आवश्यक असतं. प्रवासात अनेक अडचणीचे, अडथळ्याचे आणि कसोटीचे प्रसंग येतात पण तीच खरी परीक्षा असते त्यावर मात करण्याची आणि पुन्हा उभं राहण्याची.

2. कठोर परिश्रम : 

मित्रांनो यश कोणालाही सहज मिळत नाही. त्यासाठी आवश्यक मेहनत घ्यावी लागते आणि त्यात सातत्य ठेवणे अपेक्षित असते.

सर्वांनाच यशस्वी व्हावं असं वाटतं पण त्यासाठी लागणारे कष्ट उपसण्याची वेळ देण्याची तयारी किती जणांची असते ? यशासाठी अपार त्यागाची आणि स्वयंशस्तीची गरज असते. कठोर परिश्रमाला दुसरा पर्याय नाही. कोणत्याही गोष्टीतील परिपूर्णता ही काही नशिबाने मिळत नाही त्यासाठी भरपूर कष्ट आणि निरंतर सराव करावा लागतो. 

3. सकारात्मक विचारसरणी :

 प्रत्येक अडचणीतून काहीतरी शिकण्याची वृत्ती आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास यश मिळवणं सोपं होऊ शकतं. प्रत्येक गोष्टीकडे आपण जर नकारात्मक नजरेने बघितलं तर आपलं इच्छित कधीच साध्य होणार नाही.

4. आत्मविश्वास : 

स्वतःवर आणि आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवणे ही यशस्वी होण्याची अगदी प्राथमिक पायरी आहे. जोपर्यंत आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत आपल्यावरही कोणी विश्वास ठेवणार नाही.

image 10

5. धैर्य आणि चिकाटी : 

अडथळ्यांना सामोरे जाताना कधीही हार न मानता पुढे जाणे आवश्यक आहे. यशप्राप्तीच्या वाटेत येणाऱ्या अडचणी, अडथळे आणि निरुत्साह यावर मात करत ध्येय गाठण्यासाठी सतत, कसून प्रयत्न करण्याची क्षमता म्हणजे चिकाटी. चिकाटी हे तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडण्याची आणि तुमच्या प्रयत्नांवर अधिक काळजीपूर्वक लक्ष देण्याचे लक्षण आहे. हे लक्षण धैर्याने आत्मसात करून पुढं जाणं हाच काय तो यशाचा राजमार्ग.

6. वेळेचे व्यवस्थापन : 

वेळेचे योग्य नियोजन आणि त्या प्रमाणे काम करणे यश मिळवण्यासाठी आवश्यक असते. कोणते वेळी आपल्याला काय करायचं हे ती गोष्ट करण्याच्या आधी आपल्या मनाला माहीत असलं पाहिजे. हे वेळेचं नियोजन अनेक अडचणी येण्याआधीच त्यांना दूर करतं.

7. नवीन शिकण्याची इच्छा : 

आपल्या ज्ञानात सातत्याने भर घालण्याची इच्छा आणि नवीन गोष्टी शिकण्याची तयारी आपली असली पाहिजे. दररोज स्वतःच्या ज्ञानात व्यक्तिमत्त्वात 1 % भर घालणं ही कायमची सवय आपण आत्मसात केली पाहिजे.

8. चांगले संबंध : 

लोकांशी चांगले संबंध ठेवणे, सहयोगी वृत्तीने काम करणे, सहकार्याची भावना ठेवणं  हेदेखील यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचे आहे. एक चांगलं Network केवळ यशाच्याच नाही तर आयुष्याच्या प्रवासात कामाला येतं हे मात्र नक्की !

9. इच्छाशक्ती :

आपल्या मनात असलेलं कोणतही ध्येय साध्य करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते करण्याची प्रबळ इच्छाशक्ती आपलं अपेक्षित साध्य करण्याची प्रचंड तळमळ हीच आपल्याला यशाकडे नेणारे सर्वात प्रबळ प्रेरणा ठरते. ईच्छा असल्याशिवाय मार्ग कधीच सापडणार नाही. 

image

हे गुण कौशल्य आत्मसात केल्यास यशाच्या मार्गावर निश्चितपणे यशस्वीपणे वाटचाल करता येईल.

आपल्याला जीवनात काय मिळवायचं आहे हे लवकर ठरवलं पाहिजे. आपलं उद्दिष्ट आपल्याला जितक्या लवकर सापडेल तेवढं जगणं अर्थपूर्ण ठरेल हे मात्र नक्की. आपल्याला का जगायचय याच ठोस कारण आपल्याला शोधता आलं पाहिजे. दररोज आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की मी माझ्या जीवनाच्या उद्दिष्टपूर्तीकडे योग्य दिशेने जात आहे का ? आणि या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. 

आणखी वाचा :

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button