ऑलिम्पिक गाजवणारा बीडचा शिलेदार : अविनाश साबळे

सध्या भारतीय क्रीडाप्रेमींमध्ये पॅरिस ऑलिंपिकची जोरदार चर्चा आहे. गाव खेड्यातल्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत यावर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये भारताला किती पदके मिळणार याचे अंदाज बांधले जात आहेत आणि याच ऑलिंपिकमध्ये 3000 मीटर Steeplechase च्या फायनलपर्यंत पोहचलेला पहिला भारतीय खेळाडू अविनाश साबळे या ध्येयवेड्या महाराष्ट्रपुत्राची संघर्षकथा आज आपण पाहणार आहोत.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मांडवा गावातील एका साधारण शेतकरी कुटुंबात १३ सप्टेंबर १९९४ ला जन्मलेल्या अविनाशची घरची परिस्थिती तशी जेमतेमच. त्याचे आई वडील वीटभट्टी कामगार होते. आईवडिलांचा संघर्ष आणि घरातील दारिद्र्य उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या अविनाशची स्वप्नं मात्र छोटी नव्हती. सुरुवातीच्या काळात त्याच्याकडे प्राथमिक सुविधा नसताना, त्याने विविध खेळांमध्ये भाग घेतला. अविनाशला लहानपणापासून धावण्याचा सराव होता. घरापासून शाळा लांब असल्याने तो धावत शाळेमध्ये जायचा. ग्रामीण भागात संसाधनांची कमतरता असताना, अविनाशने मातीच्या रस्त्यावर आणि साध्या साधनांवर प्रशिक्षण घेतले. त्याच्या पदरी कित्येक वेळा निराशा आणि अपयश आले; पण त्याचा आत्मविश्वास आणि चिकाटीने त्याला कायम पुढे जाण्यासाठी प्रेरित केले.

अविनाशने आपल्या शालेय जीवनात धावण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि त्यात यशही मिळवले. १२ वी झाल्यानंतर तो भारतीय लष्करामध्ये भरती झाला. तिथे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आणि धावण्यासाठीप्रोत्साहित केले. २०१८ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अविनाशने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्य पदक जिंकले. त्यानंतर २०१९ साली जागतिक क्रीडा स्पर्धेत त्यांनी नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला.
गरीब परिस्थितीचे चटके सोसत त्याने आज बीड ते पॅरिस ऑलिम्पिक असा संघर्षमय प्रवास पूर्ण केला. फायनलमध्ये पदक जरी मिळाले नसले तरी कोणत्याही प्रकारची खेळाची पार्श्वभूमी नसताना अविनाशने घेतलेली एवढी मोठी झेप ही निःसंशय कौतुकास्पद आहे.
अविनाश साबळेच्या यशस्वी प्रवासाबद्दल इतकंच म्हणावं वाटतं,
मंजिल उन्हीं को मिलती है;
जिनके सपनो में जान होती है;
पंख से कुछ नहीं होता;
हौंसलों से ही उड़ान होती है।
जय हिंद
आणखी वाचा:
- स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर क्रांतिदिनाचे महत्त्व काय?
- कोणतीही नवीन सवय लावू शकता फक्त 2 मिनिटांत
- सगळं संपलं असं कधीच होत नसतं! – मोटिव्हेशनल स्टोरी