Racheal Kaur : लेकरांसाठी रोज ६०० किमी विमानाने प्रवास करणारी सुपरमॉम!

आई म्हणजे प्रेम, त्याग आणि जबाबदारीचं जिवंत रूप. आपल्या मुलांसाठी ती कोणत्याही अडचणींवर मात करू शकते. याचं जिवंत उदाहरण म्हणजे मलेशियातील रचेल कौर (Racheal Kaur), ज्या आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी दररोज तब्बल ६०० किलोमीटरचा विमान प्रवास करतात! त्यांच्या त्यागाची ही कहाणी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि लाखो लोकांना प्रेरणा देत आहे.
राचेल कौर या भारतीय वंशाच्या असून आपल्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून त्या मलेशियातील क्वालालंपूर ते सिंगापूर असा रोज विमान प्रवास करतात. चला, जाणून घेऊया त्यांच्या या अनोख्या आणि रंजक प्रवासाबद्दल!
रोजचा प्रवास कसा असतो?
राचेल कौर या मलेशियातील पेनांग शहरात राहतात, तर त्यांचं ऑफिस क्वालालंपूरमध्ये आहे. त्या एअर एशिया कंपनीत फायनान्स ऑपरेशन विभागात असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करतात. आधी त्या ऑफिसजवळ राहत होत्या, पण तिथलं घरभाडं खूप महाग होतं. आणि त्या फक्त आठवड्यातून एकदाच आपल्या मुलांना भेटू शकत होत्या. आई म्हणून त्यांना हे सहन होईना. म्हणून त्यांनी अनोखा मार्ग निवडला तो म्हणजे दररोज विमानाने प्रवास करण्याचा!
राचेल रोज पहाटे ४ वाजता उठतात, तयारी करून ५:५५ च्या फ्लाइटने क्वालालंपूरला जातात आणि ७:४५ ला ऑफिसला पोहोचतात. संध्याकाळी ऑफिस संपल्यावर त्या पुन्हा विमानाने पेनांगला परततात आणि रात्री ८ वाजता आपल्या मुलांसोबत असतात. हा प्रवास ऐकायला अविश्वसनीय वाटतो, पण त्यांच्या मते यामुळे त्या मुलांसोबत अधिक वेळ घालवू शकतात आणि त्यांच्या संगोपनात कुठलीही तडजोड करावी लागत नाही.
विमान प्रवास महाग नाही का?
पहिल्यांदा ऐकून वाटतं की रोज विमानाने प्रवास करणं खूप महाग असेल. पण प्रत्यक्षात राचेल कौर यांचा खर्च आधीपेक्षा कमी झाला आहे. आधी त्या ऑफिसजवळ राहायच्या, तेव्हा त्यांना दरमहा २८,००० (३४० डॉलर) घरभाडं द्यावं लागायचं. त्यात मुलांपासून दूर राहण्याचं दुःख वेगळंच होतं.
आता त्या रोज विमानाने प्रवास करतात, तरी त्यांचा खर्च कमी आहे. विमान तिकिटासाठी त्यांना रु. १८,५०० (२२६ डॉलर) आणि जेवणासाठी रु. ५,५०० (६८ डॉलर) इतकाच खर्च येतो. त्यामुळे त्यांची पैशांची बचतही होते आणि त्यांना कुटुंबासोबत राहण्याचा आनंदही मिळतो.
आई असणं म्हणजे त्याग आणि कष्ट
राचेल कौर यांची ही प्रेरणादायी कहाणी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. पण अशीच कहाणी लाखो भारतीय महिलांचीही आहे. भारतातही अनेक स्त्रिया रोज तासन्तास लोकल ट्रेन, बस किंवा ट्रॅफिकमध्ये अडकून ऑफिसला जातात. घरी परतल्यानंतरही त्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळतात. आईपण आणि करिअर एकत्र निभावणं सोपं नसतं, पण त्या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल साधण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतात.

राचेल यांची कहाणी प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे, विशेषतः त्या महिलांसाठी ज्या आपल्या कुटुंब आणि करिअरमध्ये सुंदर समतोल साधण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहतात. ही कहाणी त्या सर्व आईंना समर्पित आहे, ज्या आपल्या मुलांसाठी आणि कुटुंबासाठी अहोरात्र झटत असतात.
नवी अर्थक्रांती राचेल आणि अशा सर्व “आयांना” सलाम करते , ज्या आपल्या कुटुंबासाठी आणि करिअरसाठी अखंड झटत असतात!
आणखी वाचा:
- किती सबस्क्राइबर्स नंतर कोणते YouTube प्ले बटण?
- चेष्टा-मस्करीत सुरू झालेला प्लॅटफॉर्म कसा बनला जगातील सर्वात मोठा सोशल मीडिया?
- भारताला पिनकोड सिस्टिम दिलीय या मराठी माणसाने…जाणून घ्या हा पिनकोड वाचायचा कसा?