Digital Eye Strain : डोळ्यांची काळजी घ्या! ‘डिजिटल आय स्ट्रेन’ पासून बचावाचे १० महत्वाचे उपाय

तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे आपल्या दैनंदिन जीवनात मोठा बदल झाला आहे. विद्यार्थी, नोकरदार आणि गृहिणी. सर्वांनाच मोबाईल, लॅपटॉप आणि डिजिटल उपकरणे आवश्यक वाटू लागली आहेत. मात्र, सतत स्क्रीनसमोर राहिल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी, लालसरपणा आणि दृष्टी कमजोर होण्याच्या समस्या वाढल्या आहेत. याच कारणामुळे ‘डिजिटल आय स्ट्रेन’ किंवा ‘कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम’ हा नवा आजार उद्भवला आहे.
तासनतास स्क्रीनकडे पाहिल्याने डोळे कोरडे पडतात आणि दृष्टी धूसर होते. विशेषतः ऑनलाईन शिक्षण, वर्क फ्रॉम होम आणि सोशल मीडियाच्या वाढत्या सवयीमुळे हा त्रास अधिक जाणवतो. मात्र, काही सोप्या उपायांनी डोळ्यांचे आरोग्य जपता येऊ शकते. या लेखात आपण हा आजार नेमका काय आहे, या आजाराची लक्षणे आणि त्यावरचे उपाय जाणून घेऊया.
डिजिटल आय स्ट्रेन म्हणजे नेमकं काय? (What exactly is digital eye strain?)
डिजिटल आय स्ट्रेन म्हणजे डोळ्यांवर पडणारा तो ताण, जो सतत मोबाईल, लॅपटॉप, टॅब्लेट किंवा टीव्हीसारख्या डिजिटल स्क्रीनकडे पाहिल्यामुळे निर्माण होतो. दिवसाचे अनेक तास स्क्रीनसमोर घालवल्याने डोळ्यांवर सतत दबाव येतो आणि त्याचा थेट परिणाम दृष्टीवर होतो. अयोग्य प्रकाश, चुकीची बसण्याची स्थिती, स्क्रीन आणि डोळ्यांतील कमी अंतर तसेच ब्लू लाईटचा प्रभाव यामुळे ही समस्या अधिक वाढते. दीर्घकाळ या त्रासाकडे दुर्लक्ष केल्यास डोळ्यांची शक्ती कमी होऊ शकते आणि चष्म्याचा नंबरही वाढू शकतो. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी काही आवश्यक उपाय करण्याची गरज आहे.
डिजिटल आय स्ट्रेनची लक्षणे
जर तुम्हाला सतत खालील लक्षणे जाणवत असतील, तर तुम्ही डिजिटल आय स्ट्रेनचा अनुभव घेत आहात.
- डोळ्यांची जळजळ आणि खाज
- डोळे कोरडे होणे किंवा पाणावणे
- डोळ्यांमध्ये लालसरपणा
- डोकेदुखी आणि डोळ्यांवर ताण येणे
- धूसर किंवा अस्पष्ट दिसणे
- स्क्रीनकडे पाहताना अस्वस्थ वाटणे
- झोप न येणे किंवा झोपेच्या वेळेत बदल होणे

डिजिटल आय स्ट्रेनपासून बचाव करण्यासाठी महत्त्वाचे उपाय
- दर २० मिनिटांनी, २० सेकंदांसाठी, २० फूट अंतरावरील वस्तूकडे पाहा.
- लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर डोळ्यांपासून किमान १८ ते २४ इंच दूर ठेवा आणि स्क्रीन डोळ्यांच्या थोडी खाली असावी.
- ब्लू लाईट फिल्टर किंवा अँटी-ग्लेअर ग्लास वापरा.
- सतत स्क्रीन वापरल्याने डोळ्यांचा थकवा वाढतो, त्यामुळे अधूनमधून डोळे मिटून काही सेकंद आराम द्या.
- डोळे कोरडे पडू नयेत म्हणून वारंवार डोळे मिचकवा आणि हलवा.
- स्क्रीनचा प्रकाश खूप जास्त किंवा कमी नसावा आणि उजेड थेट स्क्रीनवर पडणार नाही याची काळजी घ्या.
- व्हिटॅमिन-ए, ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स आणि ल्यूटिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा (उदा. गाजर, पालक, ड्रायफ्रूट्स, ताज्या फळे).
- दररोज 7-8 तासांची शांत झोप घेणे महत्त्वाचे आहे.
- डोळ्यांची जळजळ, धूसर दिसणे, डोकेदुखी यासारखी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- योग्य काळजी घेतल्यास डिजिटल आय स्ट्रेन टाळता येतो आणि डोळ्यांचे आरोग्य टिकवता येते.
मित्रांनो, डोळे आपल्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान देणगी आहेत म्हणून त्यांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. आजच्या डिजिटल युगात संगणक आणि स्मार्टफोन आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग झाले आहेत, त्यामुळे डिजिटल आय स्ट्रेन ही समस्या वाढत आहे. दीर्घकाळ स्क्रीनसमोर राहणे टाळता येत नसले, तरी डोळ्यांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. संतुलित आहार, पुरेशी झोप आणि डोळ्यांची वेळोवेळी तपासणी करून आपण डोळ्यांचे आरोग्य टिकवू शकतो.