लेखरंजक-रोचक माहिती

जाहिरातीसाठी टक्कल! या माणसाच्या आयडियाने सोशल मीडियावर उडवली खळबळ

आपल्या समाजात माणसाला पहिल्यांदा त्याच्या रूपावरूनच ओळखलं जातं. कोणी उंच आहे की ठेंगणा, बारीक आहे की जाड, सुंदर आहे की नाही, यावरूनच लोक त्याच्या विषयी मत बनवतात. अगदी डोक्यावर केस आहेत की नाही, यावरूनही माणसाला जज केलं जातं. त्यामुळे अनेक लोक आपल्या लुक्सविषयी अत्यंत संवेदनशील असतात. विशेषतः पुरुषांमध्ये लवकर वयात गळणारे केस ही मोठी चिंतेची बाब असते. गंजेपणा किंवा टक्कल आल्यावर अनेकांना लाज वाटते, आत्मविश्वास कमी होतो आणि काही जण तर डिप्रेशनमध्येही जातात. मात्र, केरळच्या एका तरुणाने या गोष्टीला संधीमध्ये रूपांतरित करून असं काही साध्य केलं आहे की, तो आज संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरला आहे. 

केरळमधील अलप्पुझा जिल्ह्यातील करूर गावात राहणारा शफीक हाशिम हा एक ट्रॅव्हल व्लॉगर आहे. वय फक्त ३६ वर्षं. शफीकच्या केसांची गळती कॉलेजमध्ये असतानाच सुरू झाली होती. त्यामुळे त्याला अनेकदा लोकांच्या टिंगलटवाळ्या सहन कराव्या लागल्या. मित्रमंडळी त्याच्या टक्कलवरून मस्करी करत, त्यामुळे तो काहीसा अस्वस्थ होत असायचा. या परिस्थितीत त्याने हेअर ट्रान्सप्लांट करण्याचा विचार केला होता. पण अचानक त्याचा विचार बदलला आणि त्याने ठरवलं कि “मी हे स्वीकारणार आणि त्याचा फायदा करून घेणार!”

शफीकने एक भन्नाट कल्पना लढवली. त्याने ठरवलं की, डोक्यावर केस नसले तरी हरकत नाही, पण हे टक्कलच जर जाहिरातीसाठी वापरता आलं तर? होय, अगदी खरं! त्याने आपल्या सोशल मीडिया हँडल्सवर एक व्हिडिओ शेअर केला आणि कंपन्यांना आवाहन केलं, की माझ्या टक्कल पडलेल्या डोक्यावर जाहिरात करा!  त्याची ही अनोखी कल्पना सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली.

शफीकची ही कल्पना कोची शहरातील ‘ला डेंसिटे’ नावाच्या हेअर ट्रान्सप्लांट कंपनीच्या लक्षात आली. त्यांनी शफीकसोबत तात्काळ संपर्क साधला आणि तीन महिन्यांचा करार केला. या करारानुसार, शफीक आपल्या डोक्यावर त्यांच्या कंपनीचा तात्पुरता टॅटू करून ठेवणार आणि आपल्या यूट्यूब व्हिडिओजमध्ये तो दाखवणार. या अनोख्या जाहिरात संकल्पनेतून शफीकला तब्बल ५०,००० रुपये मिळणार. 

मात्र, शफीकचा हा प्रयोग केवळ कमाईसाठी नाही, तर समाजाच्या मानसिकतेत बदल घडवण्याचा एक प्रयत्न आहे. टक्कल असणे म्हणजे कमीपणा नाही, तर त्याला सकारात्मक दृष्टिकोनातून स्वीकारता येतं, हेच तो दाखवून देतो. लोक ज्या गोष्टीला न्यूनगंड मानतात, त्याचा उपयोग संधी म्हणूनही करता येऊ शकतो, हे शफीकच्या प्रयोगातून स्पष्ट होतं.

शफीकचे यूट्यूबवर २८,००० हून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. तो ट्रॅव्हल व्लॉग्स तयार करतो आणि त्याच्या या युनिक कल्पनेमुळे तो लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. केस गेल्यामुळे आत्मविश्वास गमवण्याऐवजी, त्याचा सकारात्मक उपयोग करून त्याला आपल्या ताकदीत बदलता येतं, हे शफीकने सिद्ध करून दाखवलं आहे.

आपल्यात एखादी गोष्ट कमी आहे असं वाटलं, तरी स्वतःला कमी न समजता त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहा. आत्मविश्वास, कल्पकता आणि सकारात्मक विचारसरणी असेल, तर कोणतीही अडचण संधीमध्ये बदलता येते. शफीक हाशिमसारखा विचार करा. मग टक्कल असो की अडथळे, प्रत्येक गोष्ट आपल्या फायद्याची ठरू शकते!

आणखी वाचा:

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button