लेखआर्थिकसरकारी योजना (उद्योग)

महिलांना ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देणारी ‘लखपती दीदी’ योजना काय आहे? 

महिलांनी आज प्रत्येक क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय अशा सगळ्या क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय यश मिळवलं आहे. मात्र, आजही अनेक महिला आर्थिक मदतीअभावी आपल्या स्वप्नांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. काहींना स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करायचा असतो, तर काहींना कौशल्य विकसित करून स्वावलंबी व्हायचं असतं. पण यासाठी लागणाऱ्या भांडवलाचा अभाव अनेक महिलांसाठी मोठी अडचण ठरतो.

याच गोष्टीची दखल घेत केंद्र सरकारने ‘लखपती दीदी’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे त्या आपल्या कौशल्यांचा विकास करून अर्थपूर्ण उपजीविकेच्या संधी निर्माण करू शकतात. 

एकीकडे राज्यात ‘लाडकी बहीण’ योजनेचं कौतुक होत असताना, महिलांना आर्थिक स्वावलंबन देणारी ‘लखपती दीदी’ योजना सुद्धा त्यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. पण ही योजना नेमकी काय आहे? तिचा लाभ कोण आणि कसा घेऊ शकतो? योजनेचे स्वरूप काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या लेखात जाणून घेऊया…

ही योजना नेमकी आहे तरी काय?

‘लखपती दीदी’ योजना म्हणजे महिलांसाठी स्वावलंबनाची नवी संधी आहे. ही योजना विशेषतः महिला बचत गटांशी जोडलेल्या महिलांसाठी आहे. सुरुवातीला त्यांना विविध कौशल्य विकास प्रशिक्षण दिलं जातं, जसं की व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक तयारी, व्यवस्थापन आणि बाजारपेठेतील संधी कशा ओळखायच्या. यामुळे महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्याचं मार्गदर्शन मिळतं.

प्रशिक्षणानंतर, या महिलांना १ लाख ते ५ लाख रुपयांपर्यंतचं बिनव्याजी कर्ज दिलं जातं. याचा उपयोग त्या टेलरिंग, डबे बनवणे, किराणा दुकान, शेतीपूरक उद्योग किंवा इतर व्यवसाय सुरू करण्यासाठी करू शकतात. या कर्जावर कोणतंही व्याज नसल्यामुळे महिलांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक ताण न येता  स्वतःचा व्यवसाय उभा करता येतो.

या योजनेचा उद्देश काय आहे?

‘लखपती दीदी’ योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं हा आहे. केवळ घराची जबाबदारी न निभावता, महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, उत्पन्न वाढवावं आणि आत्मनिर्भर बनावं, असा या योजनेचा हेतू आहे. महिलांनी समाजात आत्मविश्वासाने उभं राहावं आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हावं, हा या योजनेमागील सरकारचा मुख्य उद्देश आहे.

या योजनेद्वारे सरकारने तीन कोटी महिलांना संधी देण्याचा निर्धार केला आहे. व्यवसायाच्या माध्यमातून या महिलांनी दरवर्षी किमान एक लाख किंवा त्याहून अधिक उत्पन्न मिळवून यशस्वी उद्योजिका बनावं,असा प्रयत्न आहे. यामुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होईल आणि त्या आपल्या कुटुंबाच्या तसेच देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकतील.

या योजनेत सहभागी होण्यासाठी काय करावं लागतं?

जर तुम्ही महिला बचत गटाची सदस्य असाल आणि स्वतःचा उद्योग सुरू करण्याची इच्छा असेल, तर ‘लखपती दीदी’ योजना तुमच्यासाठी आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी सरकारकडून प्रथम कौशल्य विकास प्रशिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षणात व्यवसाय सुरू करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, बाजारपेठेची समज कशी वाढवावी, आणि यशस्वी व्यवसाय कसा चालवावा याबाबत मार्गदर्शन केलं जातं.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, महिलांना आपला उद्योग सुरू करण्यासाठी एक आराखडा (बिझनेस प्लान) तयार करून सरकारकडे अर्ज करावा लागतो. अर्जाची तपासणी झाल्यानंतर, सर्व अटी पूर्ण करणाऱ्या महिलांना ५ लाख रुपयांपर्यंतचं बिनव्याजी कर्ज दिलं जातं. यासाठी अर्जदार महिला वय १८ ते ५० वर्षांच्या दरम्यान असावी, तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाखांपेक्षा कमी असावं, आणि घरातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा. तसेच, अर्जदार महिला बचत गटाशी जोडलेली असणं आवश्यक आहे.

Navi Blogs Size 7 1

अर्ज करताना काय कागदपत्रं लागतात?

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • बँक पासबुक
  • उत्पन्नाचा दाखला
  • पासपोर्ट साइज फोटो
  • मोबाईल नंबर

या योजनेत महिलांना कोणतेही व्याज न लागणारं कर्ज मिळतं आणि त्यासोबत मोफत कौशल्य प्रशिक्षणही दिलं जातं. त्यामुळे महिलांसाठी ही एक मोठी संधी आहे. सरकारची थेट मदत मिळत असल्यामुळे उद्योजिका होण्याचं त्यांचं स्वप्न आता सहज पूर्ण होऊ शकतं.

आणखी वाचा :

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button