उद्योजकताबिझनेस महारथीलेख

Success Story: २००० रुपये उधार घेऊन सुरू केला व्यवसाय, आज आहे २,६०,००० कोटींची कंपनी | Dilip Shanghvi

असं म्हटलं जातं की, श्रीमंत घरात जन्मलेल्या लोकांना मोठा व्यवसाय उभारण्याची अधिक संधी असते, सर्वसामान्य लोकांना व्यवसाय उभा करणं अवघड जातं. अनेक व्यक्ती स्वप्नं पाहतात, मोठे विचार मनात ठेवतात, पण त्यांच्या वास्तविक गरजांनी ती स्वप्नं धूसर होत जातात. आपण हे लक्षात ठेवायला हवं की, जर तुमच्यात स्वप्नं पाहण्याची क्षमता आणि ती पूर्ण करण्याची मेहनत घेण्याची इच्छाशक्ती असेल, तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता.

देशातील वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि सन फार्माचे संस्थापक दिलीप संघवी यांचं जीवन हे याचं उत्तम उदाहरण आहे. त्यांनी सुरुवात केली इतरांच्या औषधांचा व्यवसाय करून आणि त्याच अनुभवातून त्यांनी स्वतःचा औषध व्यवसाय सुरू केला. ना त्यांच्यामागे व्यापाराची कौटुंबिक पार्श्वभूमी, ना त्यांच्याकडे मोठी आर्थिक ताकद होती. पण त्यांचं धाडस आणि जिद्द यामुळेच त्यांनी ‘फार्मा किंग’ म्हणून स्वतःचा ठसा निर्माण केला.

प्रारंभिक जीवन

दिलीप संघवी  यांचा जन्म १ ऑक्टोबर १९५५ रोजी गुजरातमधील अमरेली या छोट्या गावात एका मारवाडी कुटुंबात झाला. त्यामुळे व्यापाराची मूलभूत समज त्यांच्याकडे बालपणापासूनच होती. त्यांच्या वडिलांचा एक छोटा औषध विक्रीचा व्यवसाय होता आणि संघवी लहानपणापासूनच वडिलांना या व्यवसायात मदत करत असत. ही मदत त्यांच्यासाठी फक्त कुटुंबाला दिलेला हातभार नव्हता, तर औषध उद्योगातील प्राथमिक अनुभव घेण्याची एक महत्त्वाची संधी होती. वडिलांना व्यवसायात केलेल्या मदतीमुळे औषध विक्रीच्या विविध बाजू समजून घेण्याची क्षमता त्यांच्यात विकसित झाली. 

संघवी यांनी कोलकात्यातील भवानी पूर एज्युकेशन सोसायटी कॉलेजमधून वाणिज्य विषयात पदवी प्राप्त केली. औषध निर्मितीचा कोणताही औपचारिक अभ्यास न करता, त्यांनी वडिलांच्या व्यवसायात काम करत करत औषध बाजारातील विविध संधींची जाण मिळवली. औषध विक्रीच्या व्यवसायात असताना संघवींना हे लक्षात आलं की जेनेरिक औषधांची मागणी भविष्यात मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यांनी विचार केला, की जर मी इतरांनी तयार केलेली औषधे विकू शकतो, तर मी स्वतःची औषधे का बनवू नये?

या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी औषध निर्मिती क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला, ज्यातून पुढे ‘सन फार्मास्युटिकल्स’ या यशस्वी कंपनीची स्थापना झाली. त्यांच्या लहानपणी घेतलेल्या अनुभवांनी आणि औद्योगिक दृष्टिकोनाने त्यांना औषध उद्योगात एक महत्त्वपूर्ण स्थान मिळवून दिलं

सन फार्माची सुरुवात आणि विस्तार 

१९८२ साली वडिलांकडून २००० रुपये उसने घेऊन सन फार्माची सुरुवात संघवींनी गुजरातमधील वापी येथे केली. सुरुवातीला कंपनीने मनोरुग्ण आणि हृदयविकाराशी संबंधित औषधे तयार करण्यावर लक्ष केंद्रित केलं. उत्पादनांची विविधता कमी होती, पण संघवी यांनी नेहमी गुणवत्तेला प्राधान्य दिलं,  ज्यामुळे कंपनीची औषधं बाजारात लोकप्रिय होऊ लागली.

१९९७ मध्ये, कंपनीच्या स्थापनेनंतर १५ वर्षांनी, संघवी यांनी अमेरिकेतील कॅराको फार्मास्युटिकल्स नावाची एक फार्मा कंपनी विकत घेतली, ज्यामुळे अमेरिकेच्या बाजारपेठेत प्रवेश मिळाला. यानंतर २००७ मध्ये, त्यांनी इस्रायलमधील टारो फार्मा ही कंपनी विकत घेतली, ज्यामुळे कंपनीचे जागतिक स्तरावरील स्थान आणखी बळकट झाले. त्यानंतर, २०१४ मध्ये त्यांनी रॅनबॅक्सी कंपनी विकत घेतली. हे अधिग्रहण भारतीय औषध उद्योगात एक मोठा टप्पा होता, कारण यामुळे सन फार्मा भारतातील सर्वात मोठी औषध निर्मिती कंपनी बनली. यामुळे जागतिक बाजारातही सन फार्माचे स्थान मजबूत झाले.

संघवी यांनी केलेली या कंपन्यांची खरेदी फक्त व्यवसाय वाढवण्यासाठी नव्हे, तर संशोधन आणि विकास वाढवण्यासाठी देखील होती. त्यांनी अमेरिका, युरोप आणि इतर विकसित बाजारांमध्ये विस्तार केला, ज्यामुळे कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर एक विश्वासार्ह ब्रँड बनली.

२००० रुपये उधार घेऊन सुरू केला व्यवसाय आज आहे २६०००० कोटींची कंपनी 2 1

यशाच्या शिखरावर 

दिलीप संघवी यांनी भारतीय औषध उद्योगात केवळ व्यावसायिक यश मिळवलं नाही, तर औषध निर्मितीची गुणवत्ता वाढवून आणि किफायतशीर औषधांचा पुरवठा करून एक महत्त्वपूर्ण सामाजिक योगदान दिलं  आहे. त्यांचा दृष्टिकोन व्यावसायिकतेच्या पलिकडे जातो, जो समाजाभिमुख आहे, त्यांच्या या कार्यामुळे  अनेकांना योग्य आणि परवडणारी औषधे उपलब्ध झाली आहेत.

संघवी यांनी फार्मास्युटिकल उद्योगाला नवी दिशा दिली, विशेषतः भारतात जेनेरिक औषधांची क्रांती आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. औषधांच्या किमती कमी करून त्यांनी केवळ भारतीय ग्राहकांना नाही, तर जागतिक स्तरावरही आरोग्यसेवा परवडणारी बनवली आहे.

त्यांच्या उल्लेखनीय यशासाठी आणि योगदानासाठी दिलीप संघवी यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. २०१६ मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार प्रदान केला, जो देशातील चौथा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. याशिवाय, संघवी हे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर सन्मानित झाले आहेत. फोर्ब्सच्या यादीत त्यांनी अनेक वेळा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून स्थान मिळवलं  आहे. २०१५ मध्ये त्यांना फोर्ब्सने भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून घोषित केलं, तेव्हा त्यांची संपत्ती $१७.५ बिलियन इतकी होती. सध्या फोर्ब्सनुसार, दिलीप संघवी यांची एकूण संपत्ती २९.८ अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास २.५० लाख कोटी रुपये इतकी आहे. सन फार्मा जगातील पाचवी सर्वात मोठी जेनेरिक कंपनी असून कंपनीत जवळपास ४१००० कर्मचारी कार्यरत आहेत. 

दिलीप संघवी यांचा जीवनप्रवास हा चिकाटी, कठोर परिश्रम आणि दृढनिश्चय यांचा अद्भुत संगम आहे. त्यांनी अत्यंत साध्या परिस्थितीतून आपल्या व्यवसायाची सुरुवात केली आणि आज ते जागतिक स्तरावरील एक प्रमुख उद्योगपती म्हणून ओळखले जातात. त्यांच्या जीवनातून शिकण्यासारखे खूप काही आहे – विशेषत: उद्योजकतेत टिकून राहण्यासाठी आणि सातत्याने नवनवीन संधी शोधण्यासाठीची त्यांची क्षमता प्रेरणादायी आहे.

आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button