भारतीयांची घर आणि दार सुरक्षित ठेवण्याच काम यांच्या कुलूपांनी केल- अर्देशीर गोदरेज
सध्या ब्रॅंडचा जमाना आला आहे, कपड्यापासून ते घरातील चिजवस्तूपर्यंत अनेकजन ब्रांडेड वस्तुच वापरतात. पण हे ब्रॅंड काही आत्ताचे नाहीत. अनेक वर्षांचा इतिहास त्यामागे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ब्रॅंडचा जमाना आहे. भारताला स्वतंत्र्य मिळण्याआधीच जागतिक स्तरावर आपल्या विश्वासाची मोहोर उमटविणारे नाव म्हणजे गोदरेज कंपनी. आणि या गोदरेजचे संस्थापक म्हणजे अर्देशीर गोदरेज.
चला तर आजच्या भागात जाणून घेऊ गोदरेजच्या कपाटबंद जन्माची ही कहाणी.
अर्देशीर गोदरेज यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजेच 1868 मध्ये मुंबई प्रांतात बुरजोरजी आणि दोसीबाई गुठरजी या पारशी दाम्पत्त्याच्या पोटी एका सधन कुटुंबात झाला. त्यांना सहा अपत्ये. अर्देशीर सगळ्यात मोठा मुलगा. बुरजोरजी आणि त्यांच्या वडीलांचा बांधकाम क्षेत्रात व्यवसाय होता. १८७१ साली या कुटुंबाने गोदरेज हे आडनाव स्वीकारले.
लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असणाऱ्या अर्देशीरने पुढे जाऊन वकिलीचा अभ्यास केला. वकिलीची पदवी मिळाल्यानंतर त्यांनी अनेक खटले लढवले, अनेक केसेस सोडविल्या. मात्र झांझिबार येथील एका खटल्यादरम्यान त्यांनी आपली वकिली सोडली व ते परत मुंबईत आले.
इतर पारशी उद्योजकांप्रमाणे त्यांनाही व्यवसायात आपले नशीब आजमवायचे होतं. मात्र उपजीविकेसाठी त्यांनी एका फार्मसीत सहाय्यक म्हणून काम करायचे ठरवले. तिथे मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर शस्त्रक्रियेसाठी लागणारी सामग्री बनवण्याचा व्यवसाय करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. पारशी समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व “मेरवानजी कामा” यांच्याकडून त्यांनी व्यवसायासाठी कर्ज मागितले. मेरवानजींनी विचारले, “घरी वडिलांना पैसे मागायचे सोडून माझ्याकडे का आला?” त्यावर अर्देशीर म्हणाले, “मी घरी पैसे मागितले असते, तर वडिलांनी दिले नसते असे नाही, पण वडिलांनी कर्ज म्हणून पैसे दिले नसते, तर मुलासाठी द्यायचे म्हणून स्वखुशीने दिले असते आणि अर्देशिर यांच्या स्वाभिमानी मनाला ते काही पटणारे नव्हते. १९१८ साली वडिलांचे निधन झाल्यावर ‘त्यांच्या संपत्तीवर माझा हक्क नाही’ असं सांगताना अर्देशीर यांचा हाच करारीपणा पुन्हा एकदा दिसला.
मेरवानजी कामा यांच्याकडून घेतलेल्या ३००० रुपयांतून या स्वाभिमानी तरुणाने शस्त्रक्रियेसाठी लागणारी सामग्री बनवली. अपार मेहनत करून त्यांनी उत्पादनात वेगळेपणा आणून उत्पादने बनवली, ही सगळी उत्पादने जेव्हा कंपनीला विकायची वेळ आली, तेव्हा मात्र अर्देशिर यांच्या एका अटीमुळे व्यवहार फिस्कटला. ती अट म्हणजे प्रत्येक उत्पादनावर मेड इन इंडिया चा tag लावणे. समोरील कंपनीच्या मालकाने ‘मेड इन इंडिया’ टाकलं, तर सर्जिकल उत्पादनं खपणार नाहीत असं सांगून ही अट अमान्य केली. व्यवहार फिस्कटला आणि तो व्यवसायसुद्धा तिथेच बंद पडला.
एकदा असंच अर्देशिर वर्तमानपत्र वाचत बसले होते. आणि वर्तमानपत्रावरील एका बातमीने त्यांचे लक्ष वेधून घेतले. मुंबई इलाख्यात वाढलेल्या घरफोड्या आणि त्यावर सुरक्षेचे उपाय म्हणून पोलिसांनी योग्य सुरक्षा उपाय करण्याचे आवाहन केले होते. आणि त्याच क्षणी अर्देशिर यांच्या तल्लख मेंदूत बिझनेसची एक भन्नाट कल्पना आली, ती म्हणजे मजबूत आणि सहजासहजी फोडता न येणारी कुलुपं बनवणे. मात्र पुन्हा प्रश्न होता तो पैशांचा. त्यांच्या स्वाभिमानी वृत्तीने वडीलोपार्जित जमिनीचा हिस्सा नाकारला होता, जे करेन ते फक्त स्व-कर्तूत्वावरच करेन हेच त्यांच्या जीवनाचे मर्म होते.
गोदरेजची ही गाडी केवळ कुलुपांवरच थांबली नाही, तर तिला खूप मोठा पल्ला गाठायचा होता. १९०१ साली अर्देशीर यांनी तिजोरी बनवायचा निर्णय घेतला. त्यांना इतकी सुरक्षित तिजोरी बनवायची होती कि, जी फोडता येणार नाही आणि आगीपासूनही ती सुरक्षित असेल. डझनभर डिझाइन्स बनवून झाल्यावर 1902 साली गोदरेजची पहिली तिजोरी बाजारात आली आणि प्रत्येक भारतीयाच्या घरात या तिजोरीच्या रूपाने एक सुरक्षारक्षकच अवतरला. मौल्यवान वस्तूंचा तो दणकट पहारेकरी बनला.
१९०५ मध्ये भारतभेटीवर आलेल्या इंग्लंडच्या राणीने देखील आपले मौल्यवान सामान सुरक्षित राहण्यासाठी गोदरेजच्या तिजोरीला प्राधान्य दिले आणि ही एक प्रकारे गोदरेजच्या दर्जाला मिळालेली पोचपावतीच ठरली. ही तिजोरी चोरांपासूनच नाही, तर आगीपासूनही सुरक्षित होती. १९४४ साली मुंबईच्या इतिहासातील सर्वात भीषण मुंबई गोदीतील आगीत प्रचंड वित्तहानी आणि जीवितहानी झाली, पण गोदरेज कपाटाच्या तिजोरीतील मौल्यवान वस्तू, कागदपत्रं मात्र आगीच्या झळांपासून सहीसलामत वाचले होते आणि ही घटना गोदरेजसाठी निर्णायक टप्पा ठरली. या घटनेनंतर गोदरेज कपाटांनी भारतीयांच्या मनात जे अढळ स्थान प्राप्त केले ते कायमचे. त्यामुळेच आज कपाट म्हटलं कि डोळ्यासमोर उभे राहते ते केवळ गोदरेजचेच. कपाटाला ‘गोदरेज’ हा जणू प्रतिशब्दच तयार झाला.
अर्देशीर गोदरेज यांचा भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी संबंध होता. पण त्यांचे स्वदेशीबद्दलचे मत लक्षात घेण्याजोगे होते. केवळ वस्तू स्वदेशी आहे म्हणून तिला चांगले म्हणण्याची सक्ती नको. ती दर्जाच्या बाबतीतही उत्तम असली पाहिजे. असे त्यांचे मत होते. भारतीय घराघरांत दाराला गोदरेज कुलूप आणि आत गोदरेज कपाट हे समीकरण अभेद्य होते.
1910 मध्ये गोदरेजचा हा सगळा डोलारा धाकटा भाऊ पिरोजशा याला सांभाळायला सांगून अर्देशिर युरोप दौऱ्यावर गेले. युरोपातील नावीन्यपूर्ण गोष्टींचा अभ्यास करून त्यांनी गोदरेजमध्ये बदल केले. 1928 साली अर्देशिर यांनी सगळा व्यवसाय धाकट्या पिरोजशाच्या हाती सोपविला आणि ते नाशिकला गेले.
त्यानंतर पिरोजशा यांनी देखील गोदरेजमध्ये क्रांती घडवली. गोदरेज फक्त कपाट आणि कुलूपातच अडकून बसले नाहीत, तर त्याने साबण, डिटर्जंट, टाईपरायटर, फ्रीज अशी अनेक उत्पादने तयार केली. १९१८ साली गोदरेजने साबण निर्मिती व्यवसायात पाऊल ठेवले. कंपनीने प्राण्यांच्या चरबीचा वापर न करता जगातील पहिला साबण बनवला. खुद्द रवींद्रनाथ टागोरांनी या साबणाची जाहिरात केली होती.
भारताच्या इतिहासातील अनेक घडामोडींचा अर्देशिर यांचा गोदरेज ब्रॅण्ड हा साक्षीदार आहे. १९५१ साली स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या लोकशाही निवडणुकांत मतदारांचं बहुमूल्य मत कोणाला मिळाले आहे हे पण सर्वात आधी गोदरेजलाच माहीत होते, कारण ती मते जपून ठेवणाऱ्या मतपेटय़ा गोदरेजच्याच होत्या. या साऱ्याचे रहस्य एकच होते, उत्तम दर्जा. १९५८ साली कंपनीने भारतातील पहिला फ्रिज सुद्धा बनवला होता.
अर्देशिर यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील योगदान हे खूप मोठे होते. स्वदेशी उत्पादनासाठी त्यांनी घेतलेली ठोस भूमिका महत्त्वाची होती. गोदरेजला केवळ कंपनी म्हणून नाही, तर भारतीय ग्राहकांच्या घराघरात नेऊन ठेवण्यापर्यंत विश्वास कमविणारा असा हा ब्रॅंडेड उद्योजक 1936 साली गोदरेजचा बलाढ्य कारभार वयाच्या 68 व्या वर्षी मागे सोडून जगातून निघून गेला.
बिझनेस महारथी या मालिकेत आम्ही जगातील महान उद्योजकांच्या जीवनप्रवास आपल्यापर्यंत घेऊन येत असतो. आपल्याला हि मालिका कशी वाटतेय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून कोणत्या उद्योजकांच्या कहाण्या तुम्हाला ऐकायच्या आहेत ते देखील सांगा. भेटूया पुढील रविवारी अजून एका बिझनेस महारथीची कहाणी घेऊन…!
आणखी वाचा
- जगातील सर्वात मोठ्या बँकेचे संस्थापक जे पी मोर्गन यांची कहाणी
- या माणसामुळे आपल्या घरापर्यंत वीज पोहचली- निकोला टेस्ला
- फोटोग्राफी क्षेत्रातला पहिला कॅमेरा बनवणारा अवलिया – जॉर्ज इस्टमन
- जगातील पहिली गाडी बनवणारा कार्ल बेंझ
- यांच्यामुळे सामान्य माणसाच्या दारात गाडी उभी राहिले – हेन्री फोर्ड
- सायकलच्या दुकानापासून १० हजार कोटींपर्यंत पहिले मराठी उद्योगपती – लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर
- मतिमंद म्हणून शाळेतून काढून टाकलं, तोच मुलगा जगातील सर्वात मोठा संशोधक बनला
- इंग्रजांच्या घरात घुसून त्यांचेच घर विकत घेऊन, त्यांनाच नोकर म्हणून ठेवणारा सांगलीचा पठ्ठ्या
- अवघ्या भारताच भविष्य बदलणाऱ्या टाटा कंपनीची सुरुवात कशी झाली?