Who is Ram Sutar? | जगातील सर्वात मोठा पुतळा उभारणारे महाराष्ट्र भूषण राम सुतार नेमके आहेत तरी कोण?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२५’ Maharashtra Bhushan Puraskar जाहीर केला आहे. यंदाचा हा पुरस्कार जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ मूर्तिकार डॉ. राम वनजी सुतार यांना प्रदान करण्यात येणार आहे. १९९५ पासून दिला जाणारा हा मानाचा पुरस्कार आतापर्यंत पु. ल. देशपांडे, लता मंगेशकर, सुनील गावसकर, बाबासाहेब पुरंदरे, रतन टाटा, डॉ. रघुनाथ माशेलकर, आशा भोसले, अशोक सराफ यांसारख्या २० दिग्गजांना प्रदान करण्यात आला आहे.
डॉ. सुतार यांचा या यादीत समावेश होणे, ही केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतासाठी अभिमानाची बाब आहे. या लेखात आपण त्यांच्या जागतिक शिल्पकलेतील महत्त्वपूर्ण योगदानावर सविस्तर नजर टाकूया.
शिल्पकलेचा जन्मजात वारसा
डॉ. राम सुतार (Ram Sutar) यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९२५ रोजी महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील गोंदूर या छोट्या गावात एका सर्वसाधारण कुटुंबात झाला. त्यांचे वडील लोहारकाम आणि सुतारकाम करत असत, त्यामुळे लहानपणापासूनच राम सुतार यांना हस्तकलेची गोडी लागली. वडिलांसोबत शेतीची अवजारे तयार करणं, बैलगाड्या बनवणं, भिंतींवर चित्रं काढणं आणि मातीच्या वस्तूंना आकार देणं यामध्ये त्यांची कलात्मकता विकसित होत गेली.
गावात शिक्षणाची नीट सोय नसल्यामुळे त्यांनी मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण नातेवाईकांकडे राहून पूर्ण केलं. लहानपणापासूनच कलेची आवड असल्याने पुढील शिक्षणासाठी त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आणि मुंबई गाठली. तिथे शिकताना त्यांची शिल्पकलेची प्रतिभा अधिक खुलत गेली. १९५२ साली पदवी संपादन करताना त्यांनी मेयो सुवर्णपदक मिळवलं. याच संस्थेतील शिक्षणाने त्यांचं कौशल्य अधिक विकसित झालं आणि त्यांच्या कारकिर्दीला नवा आयाम मिळाला.
शिल्पकलेचा वैश्विक प्रवास
१९५४ मध्ये डॉ. राम सुतार (Ram Sutar) यांनी छत्रपती संभाजीनगर नगर (औरंगाबाद) येथे भारतीय पुरातत्त्व खात्यात नोकरीला सुरुवात केली. त्यांच्याकडे अजिंठा-वेरूळ येथील प्राचीन शिल्पांची देखभाल आणि पुनर्बांधणी करण्याची जबाबदारी होती. या काळात त्यांनी प्राचीन भारतीय शिल्पकलेचा सखोल अभ्यास केला, जो त्यांच्या पुढील कारकीर्दीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला.
१९६० मध्ये त्यांनी चंबळ नदीवरील गांधीसागर धरणाजवळ चंबळ देवीचे भव्य शिल्प साकारलं. या कलाकृतीमुळे त्यांना संपूर्ण देशभरात ओळख मिळाली आणि एक कुशल मूर्तिकार म्हणून त्यांची प्रतिष्ठा वाढली. यानंतर त्यांच्या कलाकृतींना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी वाढू लागली.
डॉ. सुतार यांनी केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात आपल्या प्रतिभेची छाप सोडली आहे. त्यांनी तयार केलेले पुतळे संसद भवन, राष्ट्रपती भवन, विविध राज्यांच्या विधानसभांमध्ये तसेच अनेक आंतरराष्ट्रीय स्थळी प्रतिष्ठित आहेत. असंख्य मूर्ती आणि पुतळे घडवून त्यांनी भारतीय शिल्पकलेला जागतिक स्तरावर पोहचवलं आहे.
स्टॅच्यू ऑफ युनिटी – एक स्वप्नपूर्ती
डॉ. राम सुतार (Ram Sutar) यांनी साकारलेली स्टॅच्यू ऑफ युनिटी ही त्यांच्या शिल्पकलेतील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध कलाकृती आहे. हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंच पुतळा आहे, जो जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून ओळखला जातो. या भव्य शिल्पामुळे त्यांच्या कलेला जागतिक स्तरावर ओळख मिळाली आणि भारताच्या शिल्पकलेचा गौरव वाढला. हे शिल्प देशाच्या एकतेचं प्रतीक आहे आणि आपल्या ऐतिहासिक वारशाची आठवण करून देतं.
लहानपणी स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची चित्रं पाहून त्यांच्या मनात अशीच भव्य मूर्ती घडवण्याचं स्वप्न निर्माण झालं होतं. स्टॅच्यू ऑफ युनिटी तयार करून त्यांनी हे स्वप्न साकार केलं. या पुतळ्यातील हावभाव आणि बारकावे अत्यंत काळजीपूर्वक घडवले गेले आहेत, ज्यामुळे सरदार पटेल यांचा व्यक्तिमत्त्वाचा भव्यपणा अधिक ठळक झाला. त्यांच्या या अद्वितीय कामगिरीमुळे भारताच्या शिल्पकलेचा नवा अध्याय लिहिला गेला आहे.
महत्त्वाची शिल्पकृती आणि कारकीर्द
डॉ. राम सुतार हे प्रसिद्ध शिल्पकार असून, त्यांनी आपल्या कलेत नेहमीच गुणवत्ता आणि नावीन्य जपले आहे. त्यांनी कधीही आपल्या कामाशी तडजोड केली नाही. त्यांचा स्टुडिओ आजही अनेक कलाकार, विद्यार्थी आणि अभ्यासकांसाठी प्रेरणास्थान आहे. त्यांची प्रतिभा इतकी अद्वितीय आहे की, त्यांची तुलना जगप्रसिद्ध शिल्पकार मायकेल एंजेलो आणि रोडिन यांच्यासोबत केली जाते.
त्यांनी ७५ वर्षांच्या कारकीर्दीत जगभर २०० हून अधिक व वेगवेगळ्या शिल्पकृती तयार केल्या आहेत. भारताच्या संसद भवन परिसरात त्यांनी शिवाजी महाराज, महात्मा गांधी, सरदार पटेल, पं. नेहरू, इंदिरा गांधी, भगतसिंग आणि महात्मा फुले यांचे १६ भव्य पुतळे साकारले आहेत.
डॉ. सुतार यांनी केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही आपली कला पोहोचवली आहे. त्यांनी टोकियो येथे रवींद्रनाथ टागोर यांचा पुतळा साकारला. तसेच, फ्रान्स, इटली, इंग्लंड, रशिया, अर्जेंटिना आणि अमेरिका यांसारख्या देशांमध्येही त्यांच्या शिल्पकृती पहायला मिळतात. विशेष म्हणजे, त्यांनी महात्मा गांधींच्या ४५० हून अधिक मूर्ती जगभर उभारल्या आहेत.
पुरस्कार आणि सन्मान
डॉ. राम सुतार यांच्या अद्वितीय शिल्पकलेसाठी त्यांना १९९९ मध्ये पद्मश्री, २०१६ मध्ये पद्मभूषण आणि २०१८ मध्ये टागोर सांस्कृतिक सौहार्द पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. त्यांच्या कलेची दखल संपूर्ण जगाने घेतली असून, त्यांनी आपल्या शिल्पकृतींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अमिट छाप उमटवली आहे.
याशिवाय, फ्रान्समधील इकोले सुपीरियर रॉबर्ट डी सोरबोन विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे. त्यांच्या अथक परिश्रमाची आणि कलासाधनेची आणखी एक मोठी पावती म्हणजे महाराष्ट्र भूषण पुरस्कार.
व्यक्तिगत आयुष्य
राम सुतार यांचे पुत्र अनिल सुतार हे देखील प्रसिद्ध मूर्तिकार आणि वास्तुविशारद आहेत. वडिलांच्या मार्गावर चालत त्यांनीही अनेक आंतरराष्ट्रीय प्रकल्प पूर्ण केले आहेत. राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रा. लि. आणि राम सुतार फाइन आर्ट्स प्रा. लि. या त्यांच्या कंपन्या आज जगातील सर्वात मोठ्या शिल्पनिर्मिती फर्म्सपैकी एक मानल्या जातात.
नोएडा आणि गाझियाबाद येथील त्यांच्या अत्याधुनिक स्टुडिओ आणि फाउंड्रीमध्ये जर्मनीतील यांत्रिक रोबोट्स, सीएनसी मशीन यांसारखी आधुनिक साधने वापरून भव्य शिल्पं घडवली जातात. अनिल सुतार यांनी वडिलांसोबत अनेक महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण करून भारतीय शिल्पकलेचा ठसा आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटवला आहे.
मित्रांनो, डॉ. राम सुतार यांचा जीवनप्रवास हा सातत्य, मेहनत आणि कलेसाठी समर्पणाचा उत्तम आदर्श आहे. वयाच्या शंभराव्या वर्षातही ते आपल्या कार्यात सक्रिय आहेत, हे त्यांच्या जिद्दीचं आणि कलेवरील प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान होणं, ही केवळ महाराष्ट्रासाठी नाही, तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांना खऱ्या अर्थाने “भारताचे सच्चे शिल्पकार” म्हणता येईल.
आणखी वाचा:
- तुम्ही भंगार म्हणून जे फेकून देता, त्यातून ‘तो’ महिन्याला लाखो रुपये कमावतो – प्रमोद सुसरे
- फ्लिपकार्ट: भारतातील ई-कॉमर्सची यशाची कहाणी
- आठवी नापास ते हजारो कोटींचा मालक. सीबीआय, रिलायन्स चालतात याच्या इशाऱ्यावर- त्रिशनित अरोरा