जाणून घ्या, व्यवसाय वाढीसाठी परिणामकारक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आणि यशस्वी उदाहरणे

व्यवसाय यशस्वी करण्यासाठी प्रभावी मार्केटिंग स्ट्रॅटेजी महत्त्वाची असते. मात्र, अनेक नव्याने सुरू झालेल्या व्यवसायांना योग्य मार्केटिंग कसं करावं याची स्पष्ट माहिती नसते. त्यामुळे त्यांना ग्राहक मिळण्यात अडचणी येतात आणि हळूहळू व्यवसाय वाढण्याऐवजी तो थांबण्याची शक्यता निर्माण होते. प्रत्येक मार्केटिंग स्ट्रॅटेजीचे उद्दिष्ट आणि कार्यपद्धती वेगळी असते, त्यामुळे आपल्या व्यवसायासाठी योग्य रणनीती निवडणे गरजेचे असते.
या लेखात आपण विविध प्रकारच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आणि त्यांची उदाहरणे पाहणार आहोत. यामुळे तुम्हाला मार्केटिंगच्या संकल्पना समजून घेण्यास आणि आपल्या व्यवसायासाठी योग्य धोरण ठरवण्यास मदत होईल.
1. मार्केट पेनिट्रेशन स्ट्रॅटेजी
या स्ट्रॅटेजी मध्ये सध्याच्या बाजारपेठेत आपल्या उत्पादनांचा किंवा सेवांचा वाटा वाढवला जातो. यासाठी ग्राहकांना आकर्षित करण्याचे विविध उपाय केले जातात.
कशा प्रकारे करता येते?
- सवलती आणि खास ऑफर्स देणे .
- प्रभावी जाहिराती करून उत्पादनाची प्रसिद्धी करणे .
- अधिक वितरक आणि विक्री केंद्रे उघडणे .
उदाहरण: Reliance Jio
Jio ने बाजारात येताना सुरुवातीला मोफत डेटा आणि कॉलिंग सेवा दिली. यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले आणि Jio चे नेटवर्क झपाट्याने वाढले. या धोरणामुळे Jio ला बाजारात मजबूत स्थान मिळाले आणि इतर टेलिकॉम कंपन्यांना मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागले.
2. डिफरेंशिएशन मार्केटिंग स्ट्रॅटेजी

या स्ट्रॅटेजीमध्ये उत्पादन किंवा सेवा इतरांपेक्षा वेगळी आणि खास बनवली जाते, जेणेकरून ग्राहकांमध्ये त्याची वेगळी ओळख निर्माण होईल. यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यास आणि ब्रँडला मजबूत करण्यास मदत होते.
कशा प्रकारे करता येते?
- प्रीमियम गुणवत्ता आणि खास वैशिष्ट्ये जोडणे.
- विविध ग्राहकवर्गासाठी वेगवेगळे डिझाइन किंवा पॅकेजिंग वापरणे.
- प्रभावी ब्रँडिंग आणि इमेज बिल्डिंग करणे.
उदाहरण: Cadbury 5 Star
Cadbury 5 Star चॉकलेटने इतर चॉकलेट्सपेक्षा वेगळा फ्लेवर दिला, जो ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर स्वीकारला. तसेच, “Jo Khaye Kho Jaye” ही मजेशीर टॅगलाइन आणि विनोदी जाहिरातींमुळे ब्रँडने वेगळी ओळख निर्माण केली आणि बाजारात आपले खास स्थान मिळवले.
3. कॉस्ट लीडरशिप मार्केटिंग स्ट्रॅटेजी

यात उत्पादनाचा खर्च कमी ठेवून ग्राहकांना स्वस्त दरात वस्तू किंवा सेवा दिली जाते. यामुळे मोठ्या प्रमाणावर विक्री होते आणि स्पर्धात्मक किंमत ठेवून बाजारात मजबूत स्थान मिळवता येते.
कशा प्रकारे करता येते?
- उत्पादन प्रक्रियेत अनावश्यक खर्च कमी करणे
- मोठ्या प्रमाणात उत्पादन (Mass Production) करून प्रति युनिट खर्च घटवणे
- लॉजिस्टिक्स आणि वितरण व्यवस्थापन अधिक प्रभावी बनवणे
उदाहरण: Parle-G बिस्किट्स
Parle-G बिस्किटे किफायतशीर किंमतीत आणि सातत्यपूर्ण गुणवत्तेसह बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे ते प्रत्येक घरात सहज पोहोचले. महागाई वाढली तरीही त्याची किंमत तुलनेने कमी ठेवण्यात आली, ज्यामुळे सर्व स्तरातील ग्राहकांनी हे बिस्किट मोठ्या प्रमाणावर स्वीकारले आहेत.
4. मार्केट डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी

या स्ट्रॅटेजीत नवीन बाजारपेठांमध्ये उत्पादनाची विक्री वाढवली जाते. यासाठी नवीन ग्राहक शोधणे, भौगोलिक विस्तार करणे आणि उत्पादनाचा वेगळ्या प्रकारे प्रचार करणे महत्त्वाचे ठरते.
कशा प्रकारे करता येते?
- नवीन ग्राहक वर्ग आणि भौगोलिक विस्तार करणे
- नवीन वितरण वाहिन्या तयार करून उत्पादन सहज उपलब्ध करणे
- उत्पादनाच्या नवीन उपयोगांसाठी जाहिरात आणि प्रचार करणे
उदाहरण: McDonald’s India
McDonald’s ने भारतीय ग्राहकांची आवड लक्षात घेऊन खास ‘McAloo Tikki’ आणि ‘Paneer Wrap’ सारखे शाकाहारी पर्याय आणले. यामुळे त्यांनी भारतीय बाजारपेठेत आपली पकड मजबूत केली आणि अधिक ग्राहकांना आकर्षित करून विक्री वाढवली.
5. प्रॉडक्ट डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी

या स्ट्रॅटेजीत सध्याच्या ग्राहकांसाठी नवीन उत्पादने किंवा सेवांची निर्मिती केली जाते. जुन्या उत्पादनांना परत अपडेट करून सादर केले जाते. यामुळे ग्राहकांचा ब्रँडवर विश्वास वाढतो आणि बाजारातील स्पर्धेत टिकून राहता येते.
कशा प्रकारे करता येते?
- नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सुधारित उत्पादने आणणे
- ग्राहकांच्या गरजेनुसार नवीन व्हेरिएंट सादर करणे
- उत्पादनाच्या गुणवत्तेत सातत्य ठेवणे आणि नाविन्यपूर्ण बदल करणे
उदाहरण: Apple iPhone Series
Apple दरवर्षी नवीन iPhone मॉडेल्स आणि सुधारित फीचर्स सादर करून ग्राहकांना नवा अनुभव देते. यामुळे ब्रँड लॉयल्टी वाढते आणि ग्राहकांकडून सातत्याने चांगला प्रतिसाद मिळतो, ज्यामुळे कंपनीची बाजारपेठेतील पकड कायम राहते.
6. रिलेशनशिप मार्केटिंग स्ट्रॅटेजी

या स्ट्रॅटेजीमध्ये ग्राहकांसोबत दीर्घकालीन नाते निर्माण करून ब्रँडप्रती विश्वास आणि निष्ठा वाढवली जाते. यामुळे ग्राहक सतत त्या ब्रँडशी जोडलेले राहतात आणि नियमित खरेदी करतात.
कशा प्रकारे करता येते?
- उत्कृष्ट ग्राहक सेवा देऊन समाधान वाढवणे
- वैयक्तिकृत ऑफर्स, कॅशबॅक आणि सवलती देणे
- लॉयल्टी प्रोग्रॅम आणि सबस्क्रिप्शन मॉडेलद्वारे ग्राहकांना ब्रँडशी जोडून ठेवणे
उदाहरण: Amazon Prime
Amazon Prime सदस्यत्व घेतल्यास ग्राहकांना फास्ट डिलिव्हरी, एक्सक्लुसिव्ह डील्स आणि Prime Video सारख्या सेवा मिळतात. यामुळे ग्राहक दीर्घकाळ Amazon सोबत जोडले जातात आणि वारंवार खरेदी करतात.
7. सोशल मीडिया मार्केटिंग स्ट्रॅटेजी

या मार्केटिंग स्ट्रॅटेजी मध्ये सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून ग्राहकांपर्यंत पोहोचले जाते आणि त्यांना ब्रँडशी जोडले जाते. यामुळे ब्रँडची लोकप्रियता वाढते आणि ग्राहक ब्रँडसोबत जोडलेले राहतात.
कशा प्रकारे करता येते?
- फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर यासारख्या प्लॅटफॉर्म्सवर सक्रिय राहणे
- प्रभावशाली व्यक्ती (इन्फ्लुएन्सर्स) मार्फत उत्पादनाचा प्रचार करणे
- व्हायरल कंटेंट तयार करून ब्रँडबद्दल चर्चा निर्माण करणे
उदाहरण: Zomato & Swiggy
Zomato आणि Swiggy सोशल मीडियावर मजेशीर आणि क्रिएटिव्ह पोस्ट्स शेअर करून आपली वेगळी ओळख निर्माण करतात. ग्राहकांच्या कमेंट्सला त्वरित प्रतिसाद देऊन आणि फीडबॅक लक्षात घेऊन त्यांनी ग्राहकांसोबत उत्तम नाते निर्माण केले आहे.
8. गुरिल्ला मार्केटिंग स्ट्रॅटेजी

या रणनीतीत कमी बजेटमध्ये क्रिएटिव्ह आणि अनपेक्षित जाहिरातींचा वापर करून ग्राहकांचे लक्ष वेधले जाते. हे मार्केटिंग सामान्य जाहिरातींपेक्षा वेगळे आणि आश्चर्यकारक असते, ज्यामुळे लोकांमध्ये ती लवकर पसरते.
कशा प्रकारे करता येते?
- अनपेक्षित ठिकाणी जाहिरात लावून ग्राहकांना आश्चर्यचकित करणे
- स्ट्रीट कॅम्पेन्स किंवा इव्हेंट्सद्वारे ब्रँडचा प्रचार करणे
- सोशल मीडियावर अनोख्या आणि मजेशीर मोहिमा चालवणे
उदाहरण: Coca-Cola Happiness Machine
Coca-Cola ने काही वेंडिंग मशीनमध्ये आश्चर्यकारक भेटी ठेवून ग्राहकांना आनंदाचा अनुभव दिला. या अनपेक्षित मोहिमेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि ब्रँडची ओळख अधिक वाढली.
9. इनबाउंड मार्केटिंग स्ट्रॅटेजी

या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये ग्राहकांना जाहिरातीद्वारे न आकर्षित करता, त्यांना उपयुक्त आणि माहितीपूर्ण कंटेंटद्वारे आपल्याकडे येण्यास प्रवृत्त केले जाते. यामुळे ग्राहकांचा ब्रँडवरील विश्वास वाढतो आणि दीर्घकालीन संबंध तयार होतात.
कशा प्रकारे करता येते?
- ब्लॉग्स, व्हिडिओ, आणि पॉडकास्ट्सद्वारे उपयुक्त माहिती देणे
- SEO आणि ईमेल मार्केटिंगचा वापर करून योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचणे
- मोफत ई-बुक्स, वेबिनार्स आणि टूल्सद्वारे ग्राहकांना आकर्षित करणे
उदाहरण: HubSpot
HubSpot ने व्यवसायांसाठी मोफत साधने, गाईड्स आणि ब्लॉग्स उपलब्ध करून दिले, ज्यामुळे ग्राहकांना विपणन आणि CRM सोल्यूशन्सबद्दल माहिती मिळाली आणि त्यांची उत्पादने विक्रीसाठी आकर्षित झाली.
10. परफॉर्मन्स मार्केटिंग स्ट्रॅटेजी

या स्ट्रॅटेजीत फक्त चांगला ठोस निकाल मिळाल्यास जाहिरातींवर खर्च केला जातो. यामध्ये जाहिरातींच्या प्रभावावर आधारित पेमेंट केली जाते, त्यामुळे बजेटचा योग्य वापर होतो आणि परतावा (ROI) वाढतो.
कशा प्रकारे करता येते?
- PPC (Pay-Per-Click) जाहिरातींमधून ठराविक क्लिक किंवा विक्रीनुसार पैसे देणे
- एफिलिएट मार्केटिंगद्वारे इन्फ्ल्यूअन्सर्स किंवा वेबसाइट्सच्या मदतीने उत्पादनांचा प्रचार करणे
- सोशल मीडिया प्रमोशन्स आणि स्पॉन्सर्ड पोस्ट्सद्वारे लक्ष्यित ग्राहकांपर्यंत पोहोचणे
उदाहरण: Meesho
Meesho ने एफिलिएट आणि रेफरल मार्केटिंगचा प्रभावी वापर करून भारतभर लघु उद्योजकांना जोडले. कमी गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणावर व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांनी सोशल मीडिया आणि प्रभावशाली व्यक्तींना (Influencers) प्रभावीपणे वापरले.
मित्रांनो, यशस्वी व्यवसायासाठी योग्य मार्केटिंग स्ट्रॅटेजी निवडणे गरजेचे असते. काही ब्रँड्स मार्केट पेनिट्रेशनवर भर देतात, काहींना डिफरेंशिएशन फायदेशीर ठरते, तर काही सोशल मीडिया किंवा इनबाउंड मार्केटिंगला प्राधान्य देतात. योग्य मार्केटिंग स्ट्रॅटेजी निवडून व्यवसाय वाढीस चालना दिली जाऊ शकते. तुम्ही सुद्धा अशा वेगवेगळ्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरून आपल्या व्यवसायाला एका वेगळ्या उंचीवर नेऊ शकता.