उद्योगविश्वात नवे मापदंड प्रस्थापित करणाऱ्या यशस्वी भारतीय महिला उद्योजिका.

आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे आणि उद्योगविश्वही त्याला अपवाद नाही. पूर्वी व्यवसाय किंवा उद्योजकता हे फक्त पुरुषप्रधान क्षेत्र म्हणून पाहिलं जात होतं, मात्र ही संकल्पना आता बदलली आहे. महिलांनी आपल्या मेहनत, कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर उद्योगजगतात भक्कम पाय रोवले आहेत. त्यांच्या वाढत्या सहभागामुळे देशात नवनव्या संधी निर्माण होत असून, त्यांचं नेतृत्व रोजगार आणि अर्थव्यवस्था वाढवण्यात मोलाचा वाटा उचलत आहे. तसेच, नव्या पिढीतील उद्योजिकांसाठी त्या प्रेरणादायी ठरत आहेत.
सध्या भारतात सुमारे १४% व्यवसाय महिलांच्या मालकीचे किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली चालवले जात आहेत, आणि हा आकडा झपाट्याने वाढत आहे. कल्पकता, दूरदृष्टी आणि चिकाटीच्या जोरावर अनेक महिला उद्योजिकांनी यशाच्या नव्या वाटा शोधल्या आहेत. केवळ स्वतःपुरते मर्यादित न राहता, त्या इतरांसाठीही रोजगार आणि संधी निर्माण करत आहेत. त्यामुळे महिलांच्या नेतृत्वाखालील व्यवसाय देशाच्या आर्थिक वाढीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.
नुकताच जागतिक महिला दिन झाला. त्या निमित्ताने, आज आम्ही तुम्हाला अशाच यशस्वी भारतीय महिला उद्योजिकांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी आपल्या धैर्य, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर उद्योगविश्वात नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत.
सबीना चोप्रा – यात्रा.कॉमच्या सह-संस्थापक

सबीना चोपड़ा या ‘यात्रा.कॉम’ च्या सह-संस्थापक असून, त्यांनी दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतलं आहे. २००६ मध्ये त्यांनी यात्रा.कॉमची स्थापना केली. ट्रॅव्हल आणि बीपीओ क्षेत्रात २५ वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या सबीना यांनी आरसीआय इंडिया मध्येही महत्त्वाची भूमिका बजावली. यात्रा.कॉममध्ये कार्यकारी उपाध्यक्ष आणि मुख्य ऑपरेटिंग अधिकारी (COO) म्हणून काम करताना त्यांनी कंपनीच्या वाढीत विशेष भूमिका बजावली.
व्यवसायासोबतच त्या समाजसेवेतही सक्रिय आहेत आणि मुलींच्या शिक्षण व सशक्तीकरणासाठी एनजीओच्या माध्यमातून मदत करतात. त्यांचं ट्रॅव्हल इंडस्ट्रीतील मजबूत नेटवर्क आणि व्यावसायिक कौशल्यामुळे यात्रा.कॉमला मोठं यश मिळालं. भारतीय पर्यटन क्षेत्राला नवीन दिशा देणाऱ्या प्रेरणादायी उद्योजिका म्हणून त्यांची ओळख आहे.
विनीता सिंग – ‘शुगर कॉस्मेटिक्स’ च्या सह-संस्थापक

विनीता सिंग या ‘शुगर कॉस्मेटिक्स’ च्या सह-संस्थापक आणि सीईओ आहेत. त्यांनी IIT मद्रास आणि IIM अहमदाबादमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. २०१५ मध्ये त्यांनी पती कौशिक मुखर्जी यांच्यासोबत ‘शुगर कॉस्मेटिक्स’ची स्थापना केली. हा ब्रँड विशेषतः तरुण महिलांमध्ये लोकप्रिय असून, भारताच्या सौंदर्यप्रसाधन क्षेत्रात त्याने नवी क्रांती घडवली आहे.
विनीता सिंग या भारताच्या आघाडीच्या महिला उद्योजकांपैकी एक मानल्या जातात. त्यांचा ब्रँड ‘शुगर कॉस्मेटिक्स’ दर्जेदार आणि ट्रेंडी उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे. त्या ‘शार्क टँक इंडिया’ या बिझनेस रियालिटी शोमध्येही शार्क म्हणून सहभागी झाल्या असून, नवउद्योजकांना मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या कष्ट, मेहनत आणि दूरदृष्टीमुळे त्या आजच्या तरुणींना प्रेरणा देणाऱ्या उद्योजिका ठरल्या आहेत.
फाल्गुनी नायर – ‘नायका’च्या संस्थापिका

फाल्गुनी नायर या ‘नायका’ (Nykaa) या ब्युटी अँड लाईफस्टाईल उत्पादने विकणाऱ्या मोठ्या ऑनलाइन कंपनीच्या संस्थापक आणि सीईओ आहेत. त्यांनी IIM अहमदाबादमधून शिक्षण घेतलं आणि नंतर कोटक महिंद्रा कॅपिटलमध्ये १८ वर्षे मोठ्या पदावर काम केलं. २०१२ मध्ये त्यांनी आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी नोकरी सोडली आणि ‘नायका’ ची स्थापना केली. आज नायका हा भारताचा सर्वात प्रसिद्ध सौंदर्यप्रसाधन ब्रँड आहे.
फाल्गुनी नायर या स्वतःच्या मेहनतीवर अब्जाधीश झालेल्या भारतातील मोजक्या महिलांपैकी एक आहेत. त्यांना २६ वर्षांचा व्यवसायाचा अनुभव आहे. नायका आज केवळ ऑनलाइनच नाही, तर भारतभर अनेक दुकानांतूनही उपलब्ध आहे. त्यांनी महिलांसाठी उच्च दर्जाची सौंदर्य उत्पादने सहज उपलब्ध करून दिली, त्यामुळे नायका हा लोकांचा आवडता ब्रँड बनला आहे.
राधिका घई अग्रवाल – शॉपक्लूझच्या सह-संस्थापक

राधिका घई अग्रवाल या ‘शॉपक्लूझ’ (ShopClues) या लोकप्रिय ई-कॉमर्स कंपनीच्या सह-संस्थापक आहेत. २०११ मध्ये सिलिकॉन व्हॅलीत त्यांनी ही कंपनी सुरू केली आणि काही वर्षांतच शॉपक्लूझ युनिकॉर्न क्लबमध्ये पोहोचले.
त्यांनी वॉशिंग्टन विद्यापीठातून व्यवस्थापन शिक्षण घेतलं, तसेच स्टॅनफोर्ड विद्यापीठात वेब २.० आणि क्रिएटिव्ह रायटिंगचा अभ्यास केला. त्यांच्या दूरदृष्टी आणि कष्टामुळे शॉपक्लूझ भारतातील मोठ्या ऑनलाइन बाजारपेठांपैकी एक बनले. राधिका भारताच्या पहिल्या महिला उद्योजिकांपैकी एक आहेत, ज्यांची कंपनी युनिकॉर्न बनली आहे.
नमिता थापर – एमक्योर फार्मास्युटिकल्स

नमिता थापर या एमक्योर फार्मास्युटिकल्स (Emcure Pharmaceuticals) या प्रसिद्ध औषध कंपनीच्या कार्यकारी संचालक आहेत. त्या ‘शार्क टँक इंडिया’ या व्यवसायविषयक कार्यक्रमात ‘शार्क’ म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी फुकुआ स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए केलं असून, त्या चार्टर्ड अकाउंटंट देखील आहेत. २००७ मध्ये सीएफओ म्हणून एमक्योरमध्ये प्रवेश केल्यानंतर, त्यांनी कंपनीच्या भारतीय व्यवसाय विभागाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
त्या इनक्रेडिबल व्हेंचर्स लिमिटेड आणि थापर उद्योजक अकादमीच्या संस्थापक आहेत आणि त्यांनी १०० हून अधिक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांना द इकॉनॉमिक टाइम्स ‘40 अंडर 40’, वर्ल्ड वुमन लीडरशिप काँग्रेस सुपर अचिव्हर अवॉर्ड यांसारखे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत.
श्रद्धा शर्मा – युवरस्टोरीच्या संस्थापक
श्रद्धा शर्मा या ‘युअरस्टोरी’ मीडियाच्या संस्थापक आणि सीईओ आहेत. २००८ मध्ये सुरू केलेलं हे व्यासपीठ नव्या स्टार्टअप्स आणि उद्योजकांसाठी एक महत्त्वाचं माध्यम आहे. या माध्यमातून ७०,००० हून अधिक उद्योजकांच्या यशोगाथा लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. गेल्या १६ वर्षांपासून स्टार्टअप्स आणि उद्योजकांना मार्गदर्शन करून त्यांना पुढे जाण्यासाठी मदत केली आहे.
२०२३ मध्ये भारताने G20 अध्यक्षपद स्वीकारल्यावर, ५२० उपक्रमांच्या सह-अध्यक्ष म्हणून त्यांनी नेतृत्व केलं. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे फॉर्च्यून मासिकाच्या ‘40 अंडर 40’ प्रभावी व्यक्तींच्या यादीत तीन वेळा त्यांचं नाव झळकलं. तसेच, त्यांना २०१८ मध्ये फोर्ब्स पॉवर ट्रेलब्लेझर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. भारतीय स्टार्टअप्सच्या वाढीसाठी त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं ठरलं आहे.
उपासना टाकू – मोबिक्विकच्या सह-संस्थापक
उपासना टाकू या ‘मोबिक्विक’ या डिजिटल पेमेंट कंपनीच्या सह-संस्थापक आहेत. २००९ मध्ये त्यांनी मोबिक्विकची स्थापना केली. भारतात डिजिटल पेमेंट क्रांतीत त्यांचं मोठं योगदान आहे. मोबिक्विकने ई-वॉलेटच्या माध्यमातून ऑनलाइन व्यवहार सोपे आणि सुलभ केले आहेत. त्यांच्या दूरदृष्टीमुळे मोबिक्विक भारतातील प्रमुख फिनटेक युनिकॉर्न कंपन्यांपैकी एक बनली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये, कंपनीने IPO आणत सार्वजनिक लिस्टिंग केली, ज्यामुळे ती आणखी मजबूत झाली.
वंदना लुथरा – VLCC हेल्थकेअरच्या संस्थापिका
वंदना लुथरा या सौंदर्य आणि आरोग्य क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजिका आहेत. १९८९ मध्ये त्यांनी ‘VLCC हेल्थकेअर’ची स्थापना केली, जी आज आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखली जाते आणि त्यांची ही कंपनी १३ हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. VLCC केवळ सौंदर्य उत्पादनांसाठीच नव्हे, तर आरोग्य सेवांसाठीही प्रसिद्ध आहे.
वंदना लुथरा या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेशी जोडलेल्या आहेत. त्या सौंदर्य आणि निरोगीपणा सेक्टर स्किल कौन्सिलच्या (B&WSSC) अध्यक्ष आहेत. २०१४ मध्ये भारत सरकारच्या पाठिंब्याने त्यांची पहिली अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी सौंदर्य आणि आरोग्य उद्योगात कौशल्य प्रशिक्षणाला चालना दिली असून, त्यांचं योगदान या क्षेत्रात खूप महत्त्वाचं आणि अतुलनीय आहे.
मित्रांनो, वरील सर्व महिला उद्योजिकांनी आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने उद्योग क्षेत्रात आपलं स्थान निर्माण केलं आहे. संधी शोधून त्यांचा योग्य उपयोग करत त्यांनी अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांचा आत्मविश्वास आणि दूरदृष्टी आजच्या तरुण पिढीला प्रेरणा देत आहे.