उद्योजकताबिझनेस स्टोरीझ

घरच्या जबाबदारीसह यशस्वी व्यवसाय: महिलांच्या प्रेरणादायी यशोगाथा | Women Entrepreneurs

“नारी समाजस्य कुशलवास्तुकारा” या उक्तीप्रमाणे नारी ही समाजाची कुशल वास्तुकार आहे आणि आपली संस्कृती स्त्रीला देवी मानणारी आहे, आपल्या महिला आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. यातीलच एक क्षेत्र आहे व्यवसाय क्षेत्र.

आज आम्ही तुम्हाला अशा 5 महिलांचा व्यवसाय प्रवास सांगणार आहोत, ज्यांनी घर-परिवार सांभाळत, छोटे व्यवसाय सुरू केले आणि त्यांना यशस्वी करून दाखवलं. या प्रेरणादायी कहाण्या तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील आणि तुम्हालाही  काहीतरी मोठं करण्याची प्रेरणा देतील.

१) निर्मला हेगडे 

निर्मला हेगडे यांचा जीवनप्रवास अनेक भारतीय स्त्रियांच्या प्रवासासारखाच आहे. २२ व्या वर्षी त्यांचे  लग्न झाले आणि त्या कर्नाटकातून मुंबईत आल्या. दोन वर्षांत त्यांनी एका मुलाला जन्म दिला आणि २४ व्या वर्षी त्या आई झाल्या. त्यानंतर घर आणि मुलाची जबाबदारी त्यांच्यावर आली आणि या जबाबदारी सांभाळण्यातच त्याचं वय झालं असं त्या सांगत असतात.

Untitled 1

निर्मला यांचं वय ६४ वर्षे आहे, त्या  एक शेफ आहेत आणि त्यांनी या वयात आपल्या स्टार्टअपची सुरुवात केली आहे, आणि त्याचं नाव ठेवलं “आई’ज किचन”’. मुंबईत, निर्मला हेगडे आपल्या मुलासोबत एक फूड किचन चालवतात, जिथून आपण घरच्या स्वादिष्ट जेवणाची ऑर्डर देऊ शकता.

निर्मला हेगडे यांच्या किचनची सुरुवात लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या बिल्डिंगमधील सुरक्षारक्षकांना जेवण देण्यापासून झाली. कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत गार्ड ड्यूटीवरून बाहेर जाऊ शकत नव्हते. निर्मला यांनी स्वतः त्यांच्या जेवणाची जबाबदारी घेतली आणि त्यांना घरगुती चवीचे जेवण देण्यास सुरुवात केली, जेणेकरून गार्ड यांची गैरसोय होऊ नये आणि त्यांना उत्तम जेवण मिळावे.

आई’ज  किचनमध्ये तुम्ही महाराष्ट्रीयन, गोवा आणि कर्नाटकी जेवण ऑर्डर करू शकता. ऑर्डर घेणे, पॅकिंग करणे आणि डिलिव्हरीचे काम गौतमच्या (मुलगा) समर्थनामुळे सुरळीत पार पडते.

शेवटी, इतरांसाठी त्यांचे काही प्रेरणादायक शब्द आहेत: “तुम्हाला ज्या गोष्टींची आवड आहे, त्या गोष्टींच्या संपर्कात राहण्याचे मार्ग नेहमी शोधा. व्यवसाय करण्यासाठी तुमचे वय कधीही तुम्हाला थांबवत नाही.”

२) उर्वशी  पाटील 

नाशिकच्या उर्वशी पाटील यांनी MBA केलं असून, सध्या त्या “MBA दाबेली” नावाने एक लोकप्रिय फूड वॅन चालवतात. लग्नानंतर उर्वशी यांच्याकडे चांगल्या पगाराची नोकरी होती, परंतु गरोदरपणात  त्यांनी ती सोडली. त्यांच्या पतीचा व्यवसाय सुरळीत चालू होता, परंतु अचानक त्यात मोठं नुकसान होऊन तो व्यवसाय बंद पडला. उर्वशी यांना लहान बाळ सांभाळायचं असल्याने नोकरी करणं शक्य नव्हतं. घरात आर्थिक अस्थिरता वाढत होती, त्यामुळे त्यांनी या संकटातून मार्ग काढण्याचा निर्णय घेतला.

एकदा रस्त्यावरून जाताना उर्वशी यांना एक फूड वॅन दिसली आणि त्यातून त्यांना व्यवसायाची कल्पना सुचली. त्यांनी आधी दाबेली कशी बनवायची हे शिकून घेतलं आणि “MBA दाबेली” या नावाने व्यवसायाची सुरुवात केली. हळूहळू त्यांच्या मेहनतीचं फळ मिळू लागलं आणि व्यवसायाने भरभराट घेतली.

आज उर्वशी पाटील या नोकरीपेक्षा कित्येक पटीने अधिक उत्पन्न मिळवत आहेत. त्यांची दाबेली खाण्यासाठी ग्राहक दूरवरून येतात आणि त्यांच्या वॅनवर नेहमीच गर्दी असते.

मित्रांनो, ही कहाणी आपल्याला शिकवते की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार मानता कामा नये. उर्वशी पाटील यांची संघर्षमय वाटचाल आणि जिद्द आपल्याला खूप काही शिकवते. संकटं आणि परिस्थिती आपल्याला कितीही खचवण्याचा प्रयत्न करत असली, तरी त्यावर मात करून यश मिळवणं हेच खऱ्या आयुष्याचं यश आहे.

३) चंद्रप्रभा परिहार 

वयाच्या अशा  टप्प्यावर, जेव्हा बहुतांश लोक निवृत्तीचा विचार करतात, 70 वर्षीय चंद्रप्रभा परिहार आज आपल्या व्यवसायात यशस्वीपणे पुढे वाटचाल करत आहेत. चंद्रप्रभा यांना प्रेमाने ‘आबा’ म्हटलं जातं. मुंबईत राहणाऱ्या आबांनी दीड वर्षांपूर्वी क्रोशिया कलेचा वापर करून बॅग्स, टोप्या, घरातील सजावटीच्या वस्तू आणि राख्या बनवायला सुरुवात केली आणि ‘नेहर’ या नावाने आपल्या ब्रँडची ओळख निर्माण केली.

आबांनी आपल्या आयुष्यातील 70 वर्षे कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्यात घालवली. त्यांना लहानपणापासूनच विणकामाची आवड होती, पण त्या कलेला व्यवसायात रूपांतर करण्याचा विचार त्यांनी कधीच केला नव्हता. त्यांनी 20 वर्षांपूर्वी या कलेत डिप्लोमा घेतला होता, पण कुटुंबाच्या गरजांमध्ये स्वतःचे स्वप्न साकार करण्याची संधी त्यांना कधी मिळाली नाही. मात्र, त्यांच्या सून स्वाती यांनी पाठिंबा दिल्यामुळे हे स्वप्न प्रत्यक्षात आणता आले.

सुरुवातीला, सासु-सुनेच्या जोडीने हे फक्त छंद म्हणून हे सगळं सुरु सुरू केलं. स्वाती नवीन डिझाइन्स शोधून आबांना द्यायची आणि आबा त्या डिझाइन्स बनवून ओळखीच्या लोकांमध्ये वाटायच्या. व्यवसायाचा विचार तेव्हा सुरू झाला जेव्हा आबांच्या भाचीने त्यांच्या बनवलेल्या बॅग्स ऑफिसमध्ये नेल्या आणि सहकाऱ्यांनी अशाच बॅग्स बनवण्याची मागणी केली.

या मागणीने त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि लवकरच त्यांना ऑस्ट्रेलियातून मोठं ऑर्डर मिळाली. यानंतर स्वातीने कंपनीची अधिकृत नोंदणी केली आणि वेबसाइट व इंस्टाग्राम पेज सुरू केले.

आज आबा स्वतः प्रत्येक ऑर्डरवर काम करतात आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून पुढे येत आहेत. तुम्हाला देखील आबांच्या या वस्तू  खरेदी करायच्या असतील , तर त्यांच्या वेबसाइट www.nayher.com वर जाऊन त्यांच्या हातांनी बनवलेल्या वस्तू खरेदी करू शकता.

४) सायली कासले 

Untitled 2

जर एखाद्या व्यक्तीनं  काही करायचं ठरवलं, तर तिला कोणीही थांबवू शकत नाही, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सायली कासले. घरातूनच व्यवसाय सुरू करणाऱ्या सायली आज जवळजवळ 100 हून अधिक प्रकारचं उत्पादनं विकतात आणि दरमहा 2 लाख रुपयांपर्यंत नफा कमावतात.

सायली यांचं वय 31 वर्ष  आहे आणि त्या वसई येथे राहतात. त्या आपल्या पतीसोबत ‘स्पृहा घरगुती’ या नावाने स्टार्टअप चालवतात. लॉकडाऊनच्या काळात, जेव्हा सगळं काम घरातून चालू होतं, तेव्हा त्यांनी आपल्या स्पेशल ‘ऑल इन वन’ मसाल्याची निर्मिती करून सोसायटीत विक्री सुरू केली. बघता बघता हा मसाला एकदम हिट प्रॉडक्ट बनला.

यानंतर केवळ 25 हजार रुपये गुंतवून मोठी चक्की आणि मिक्सर खरेदी केला. त्यानंतर त्यांनी आटा (पीठ), तूप, लाडू अशी उत्पादनं बनवायला सुरुवात केली. आपल्या मेहनत आणि चवीच्या जोरावर त्यांची उत्पादनं लवकरच प्रसिद्ध झाली. आज त्यांची  स्वतःची एक फॅक्टरी आहे आणि अनेक महिला त्यांच्या बनवलेल्या उत्पादनांची विक्री करून आत्मनिर्भर बनल्या आहेत.

त्यांचा एक सामान्य स्त्री ते बिझनेसवूमन हा प्रवास कित्येक महिलांसाठी प्रेरणादायी आहे.

५) कमलजीत कौर

Untitled 3

कमलजीत कौर या मूळच्या पंजाबच्या आहेत, पण आता त्या मुंबईत राहतात. 51 वर्षीय कमलजीत यांनी आपल्या घरातूनच व्यवसायाची सुरुवात केली. कोविड काळात त्यांना संक्रमण झाले होते आणि परिस्थिती गंभीर होती. डॉक्टरांनी जवळजवळ आशा सोडली होती, पण त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. या प्रसंगानंतर त्यांना आपल्या लहानपणीच्या काळाची आठवण झाली, जेव्हा त्या ताजं दूध, घी, आणि मक्खन यांचं नियमित सेवन करत होत्या, ज्यामुळे त्यांची इम्युनिटी मजबूत होती. त्यांना मुंबईत या गोष्टींची कमतरता जाणवली.

कमलजीत सांगतात की लग्नाआधी लुधियानामध्ये राहात असताना त्या कधीच इतक्या आजारी पडल्या नव्हत्या. पण लग्नानंतर मुंबईत आल्यावर ताजं दूध आणि शुद्ध घी मिळणं थांबलं आणि त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली. या गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी शुद्ध देशी घी बनवण्याचा निर्णय घेतला. तीन महिन्यांच्या संशोधनानंतर 2020 मध्ये त्यांनी  ‘किम्मू किचन’ची स्थापना केली .

सुरुवातीला त्यांनी मुंब्रा (ठाणे) येथेच घी बनवण्यास सुरुवात केली होती, पण दूधाच्या गुणवत्तेची समस्या असल्याने त्यांनी लुधियानामध्ये यासाठी एक युनिट सुरू केलं आणि तिथून मुंबईत घी पाठवण्याचं ठरवलं. आता हे घी लुधियानामधील युनिटमध्ये बनवलं जातं आणि तिथून मुंबईत पाठवलं जातं. कमलजीत सांगतात की कधी त्यांना 100 ऑर्डर मिळतात, तर कधी एकही नाही; पण हे काम करताना त्यांना समाधान मिळतं.

त्यांचा मुलगा हरप्रीत याने लुधियानामध्ये आधीच असलेल्या सेटअपमध्ये थोडेफार बदल करून त्याचा उपयोग केला गेला. या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी 8 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आणि पहिल्याच वर्षात या व्यवसायातून 20 लाख रुपयांपर्यंतची कमाई झाली. कमलजीत यांची कंपनी 220, 500 आणि 1000 एमएलच्या बाटल्यांमध्ये घी विकते, ज्याची किंमत 399 रुपयांपासून सुरू होते.

तर, या सर्व महिलांच्या कहाण्या आपल्याला हेच शिकवतात की, ठरवलं तर काहीच अशक्य नाही. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, आव्हानं कितीही कठीण असली, तरी जिद्द, मेहनत आणि समर्पणाच्या बळावर कोणत्याही स्वप्नाला साकार करता येतं.

आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button