ॲपलची नोकरी सोडली, लोकांनी वेड्यात काढलं… आज उभा केलाय ९१०० कोटींचा व्यवसाय!

आजच्या काळात अनेक तरुण मोठ्या पगाराच्या नोकऱ्या सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेत आहेत आणि त्यात मोठे यश मिळवत आहेत. नोकरीची सुरक्षितता सोडून व्यवसायात उतरणं म्हणजे मोठा धोका पत्करणं, पण ज्या लोकांकडे नवीन कल्पना आणि प्रबळ इच्छाशक्ती असते, ते या प्रवासात यशस्वी ठरतात. अशाच एका जिद्दी तरुणाची गोष्ट म्हणजे ‘अपना’ ॲप या कंपनीचे संस्थापक निर्मित पारेख यांची.
व्यवसाय सुरू करणं सोपं नव्हतं, त्यात अनेक अडथळे होते. पण त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला आणि “अपना” ही कंपनी सुरू केली. आज या कंपनीचं बाजारमूल्य ९१०० कोटी रुपयांपर्यंत वाढलं आहे. निर्मित पारेख यांचा हा प्रवास केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर हजारो तरुणांसाठीही प्रेरणादायी आहे. आजच्या लेखात आपण त्यांच्या या प्रवासाविषयी सविस्तर जाणून घेऊया.
बालपणापासून तंत्रज्ञानाची आवड
निर्मित पारेख यांचा जन्म मुंबईतील एका सर्वसाधारण व्यावसायिक कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना तंत्रज्ञानाची विशेष आवड होती. वयाच्या केवळ ७ व्या वर्षीच त्यांनी एक डिजिटल घड्याळ तयार केले, तर १३ व्या वर्षी रोबोटिक्स प्रोग्रामिंग शिकण्यास सुरुवात केली. बालपणातच त्यांनी विविध तांत्रिक प्रयोग केले आणि तंत्रज्ञानाच्या गूढ विश्वात स्वतःला झोकून दिले. नवनवीन शोध लावण्याची त्यांची वृत्ती आणि तंत्रज्ञान समजून घेण्याची उत्सुकता यामुळे ते सतत काहीतरी नवीन शिकत राहिले.
पुढे शिक्षणासाठी त्यांनी गुजरातमधील प्रसिद्ध निरमा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे प्रवेश घेतला आणि बी. टेक. पूर्ण केले. या काळात त्यांनी विविध प्रोजेक्ट्सवर काम केले आणि तंत्रज्ञानाचा अधिक मन लावून अभ्यास केला. शिक्षण संपल्यानंतर त्यांनी आपल्या करिअरची स्पष्ट दिशा ठरवली आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्याचा निर्धार केला.
पहिले स्टार्टअप आणि व्यावसायिक सुरुवात
निर्मित पारेख यांनी कॉलेजमध्ये असतानाच ‘इंकॉन टेक्नॉलॉजीज’ नावाचे स्टार्टअप सुरू केले, जे पूर व्यवस्थापनासाठी उपाययोजना विकसित करत होते. लहान वयातच मोठ्या समस्यांवर उपाय शोधण्याची त्यांची प्रवृत्ती होती. बी. टेक पूर्ण केल्यानंतर त्यांनी’“क्रक्सबॉक्स’ नावाची दुसरी कंपनी सुरू केली, जी डेटा अॅनालिटिक्स क्षेत्रात काम करत होती.
त्यांची मेहनत, कल्पकता आणि तांत्रिक कौशल्य पाहून ‘इंटेल’ या आंतरराष्ट्रीय कंपनीने क्रक्सबॉक्स विकत घेतले आणि त्यांना नोकरीची संधी दिली. इंटेलमध्ये त्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले आणि डेटा अॅनालिटिक्स विभागाचे संचालकपद मिळवले. तिथे त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत कंपनीच्या वाढीमध्ये मोठा वाटा उचलला.

उच्च शिक्षण आणि ॲपलमधील नोकरी
निर्मित पारेख यांनी पुढे प्रसिद्ध स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीए पूर्ण केले. या शिक्षणामुळे त्यांना जागतिक बाजारपेठ, व्यवसायातील नवे ट्रेंड्स आणि इनोव्हेशन यांचा सखोल अभ्यास करण्याची संधी मिळाली. एमबीएनंतर त्यांनी ॲपल कंपनीत प्रवेश केला ,तिथे त्यांनी ‘आयफोन प्रॉडक्ट अँड स्ट्रॅटेजी टीम’ मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
मुंबईतील एका साध्या कुटुंबात जन्मलेले निर्मित ॲपल सारख्या मोठ्या कंपनीत उच्च पदावर कार्यरत होते. मोठ्या पगाराची नोकरी असूनही त्यांना समाधान नव्हते, कारण त्यांची खरी ओढ स्वतःचा व्यवसाय उभा करण्याकडे होती.
‘अपना’ अॅपची संकल्पना आणि संघर्ष
अॅपलमध्ये काम करत असताना, निर्मित पारेख यांनी असंगठित क्षेत्रातील मोठी अडचण ओळखली. ब्लू-कॉलर नोकऱ्यांसाठी कोणतेही प्रभावी व्यासपीठ नव्हते. त्यामुळे कामगार (employee) आणि नियोक्ते (employer) यांच्यात मोठी दरी निर्माण झाली होती. ही समस्या सोडवण्याचा निर्धार करत त्यांनी २०१९ मध्ये ‘अपना’ अॅप सुरू करण्यासाठी अॅपलसारखी मोठी नोकरी सोडली. त्यांच्या या निर्णयावर अनेकांनी टीका केली, काहींनी त्यांना वेड्यात काढले, पण त्यांनी कोणाच्याही मतांची पर्वा न करता स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले.
व्यवसाय सुरू करताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मोठ्या कंपनीतील सुरक्षित नोकरी सोडून स्वतःचा मार्ग निर्माण करणे सोपे नव्हते. समाजातील अनेकांनी त्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, पण त्यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर ‘अपना’ ला यश मिळवून दिले.
यशाच्या शिखरावर
कोरोना काळात ‘अपना’ ॲपने मोठी झेप घेतली. अवघ्या २२ महिन्यांत ते १.१ अब्ज डॉलर (९१०० कोटी रुपये) बाजारमूल्य असलेलं युनिकॉर्न स्टार्टअप बनलं! आज अनअकॅडमी, बिगबास्केट, व्हाईटहॅट ज्युनिअर, फ्लिपकार्ट यांसारख्या १.५ लाखांहून अधिक कंपन्या यावर नोंदणीकृत आहेत. लाखो कामगारांना या प्लॅटफॉर्ममुळे रोजगाराच्या संधी मिळाल्या.
निर्मित पारेख यांची कहाणी चिकाटी, मेहनत आणि दृढ निश्चयाचा एक उत्तम आदर्श आहे. त्यांच्या जिद्दीमुळे आज ‘अपना’ लाखो लोकांचे करिअर घडवत आहे. जर तुमच्याकडे कल्पना, जिद्द आणि मेहनतीची तयारी असेल, तर तुम्हीही मोठं यश मिळवू शकता! 🚀
आणखीन वाचा:
- मुंबईची झोपडपट्टी ते दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीय
- ५,००० रुपये उसने घेऊन उभारली १७,००० कोटींची कंपनी: पी. रामचंद्रन यांचा संघर्ष आणि “उजाला” साम्राज्य.
- इडली विक्रेता ते पंचतारांकित हॉटेलांचा मालक- विठ्ठल कामत