लेखआर्थिकसरकारी योजना (शेती)

Kisan Card: काय आहे किसान क्रेडिट कार्ड योजना? कसा कराल अर्ज? जाणून घ्या संपूर्ण माहिती

सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड (KCC), जी शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक भांडवल उपलब्ध करून देते. या योजनेद्वारे शेतकरी कमी व्याजदरात कर्ज घेऊ शकतात आणि त्याचा उपयोग बियाणे, खते, कीडनाशके, शेती उपकरणे आणि इतर कृषी संबंधी गरजांसाठी करू शकतात. अलीकडेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ३ लाखांवरून ५ लाखांपर्यंत वाढवली, ज्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त २ लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे.

या योजनेचे विविध फायदे असून, अल्प व्याजदर, परतफेडीवर सवलत आणि त्वरित निधी उपलब्ध होणे हे योजनेचे मुख्य आकर्षण आहेत. मात्र, अनेकांना या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, पात्रता निकष कोणते आहेत याची पुरेशी माहिती नसते. या लेखात किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष आणि योजनेचे संपूर्ण फायदे समजून घेऊया.

काय आहे किसान क्रेडिट कार्ड योजना ?

शेतीसाठी आवश्यक भांडवल मिळावे आणि पेरणीपूर्व अडचणींवर मात करता यावी, यासाठी भारत सरकारने १९९८ मध्ये किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बँकांकडून कमी व्याजदरात कर्ज मिळते, जे खते, बियाणे, कीटकनाशके तसेच शेतीच्या इतर गरजांसाठी वापरता येते. गरज पडल्यास शेतकरी या कार्डद्वारे रोख रक्कमही काढू शकतात, ज्यामुळे शेतीचा खर्च सहज भागवता येतो.

ही योजना वेळोवेळी सुधारली गेली आहे. २००४ मध्ये यामध्ये गुंतवणूक कर्ज, दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन आणि पशुपालन यांसारख्या उपक्रमांचा समावेश करण्यात आला.२००६-०७ मध्ये व्याज अनुदान योजना (ISS) सुरू करण्यात आली, ज्यामुळे अल्पकालीन कृषी कर्ज शेतकऱ्यांना केवळ ७% व्याजदराने मिळू लागले आणि आर्थिक ओझे कमी झाले. २०१२ मध्ये डिजिटल युगाची कास धरत इलेक्ट्रॉनिक किसान क्रेडिट कार्ड (e-KCC) सुरू करण्यात आले, ज्यामुळे व्यवहार अधिक सोपे, वेगवान आणि पारदर्शक झाले. तसेच आता योजेनची मर्यादा वाढवली गेली, ज्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त २ लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे. 

अर्ज करण्याची प्रक्रिया आणि फायदे 

किसान क्रेडिट कार्ड योजना सरकारी आणि खासगी बँकांमार्फत राबवली जाते. राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका (RRBs), सहकारी बँका आणि प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हे कार्ड मिळू शकते. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या अधिकृत बँकेत जाऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरावा लागतो. अर्ज मंजूर झाल्यानंतर किसान क्रेडिट कार्ड दिले जाते, ज्यामुळे शेतकरी आपल्या गरजेनुसार ठराविक मर्यादेत कर्ज घेऊ शकतात.

किसान क्रेडिट कार्डमुळे शेतकऱ्यांना सहज आणि कमी व्याजदरात कर्ज मिळते. हे कर्ज खते, बियाणे, कीटकनाशके आणि शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी वापरता येते. गरज भासल्यास शेतकरी या कार्डद्वारे रोख रक्कम काढू शकतात, त्यामुळे तातडीच्या खर्चासाठी मदत होते. व्याज अनुदान योजनेमुळे कर्जाचा आर्थिक बोजा कमी होतो, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळते आणि शेतीची उत्पादकता वाढते.

निकष आणि आवश्यक कागदपत्रे 

या योजनेत अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असावे लागते , मात्र कमाल वयाची कोणतीही मर्यादा नाही. या योजनेत 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते, आणि हे कर्ज पाच वर्षांच्या आत परतफेड करता येते. किसान क्रेडिट कार्डाची वैधता देखील पाच वर्षे असते.

किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडे काही आवश्यक कागदपत्रे असावी लागतात. ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, वीज बिल किंवा पाणी बिल यापैकी कोणतेही एक कागदपत्र लागते. तसेच, शेतकऱ्याने जमिनीचा मालकी हक्क किंवा भाडेकराराचे दस्तऐवज सादर करणे आवश्यक आहे. जर जमीन स्वतःच्या नावावर असेल, तर खतौनी, जमाबंदी किंवा पट्टा यासारखे कागदपत्र चालतात. जर शेतकरी भाडेकरू असेल, तर वैध भाडेकराराची कागदपत्रे द्यावी लागतात.

मित्रांनो, किसान क्रेडिट कार्ड योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आर्थिक मदत योजना आहे. या जर तुम्ही सुद्धा शेतकरी असाल आणि या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर आपल्या जवळच्या बँकेत जाऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करा आणि कमी व्याजदरात कर्ज मिळवण्याची ही संधी गमावू नका. 


आणखी वाचा:

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button