रंजक-रोचक माहितीलेख

किती सबस्क्राइबर्स नंतर कोणते YouTube प्ले बटण?

आजच्या युगात, सोशल मीडिया हे एक महत्त्वाचे साधन बनलं आहे, ज्याचा वापर लोक आपले विचार आणि क्रिएटिव्हिटी प्रदर्शित करण्यासाठी करतात. यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मवर दररोज कोट्यवधी व्हिडिओ आणि रिल्स शेअर केल्या जातात. विशेषत: तरुण पिढीमध्ये रिल्स आणि व्हिडिओ बनवण्याची प्रचंड क्रेझ आहे, ज्याचं  मुख्य कारण म्हणजे प्रसिद्धी आणि आर्थिक फायदा. जितके जास्त व्ह्यूज, तितकी जास्त कमाई हे या सोशल जगातील साधं गणित आहे. त्यात यूट्यूब सर्वांत प्रभावी प्लॅटफॉर्मपैकी एक आहे, जिथं लाखो लोक आपली प्रतिभा वापरून दररोज कमाई करत आहेत.

आज आपण या लेखात यूट्यूबवरून कमाई कशी केली जाते, यूट्यूब प्ले बटन म्हणजे काय, ते किती प्रकारचे असतात आणि यूट्यूबवर उत्पन्नाचे इतर स्रोत कोणते आहेत, या गोष्टींचा सविस्तर उहापोह करणार आहोत.

यूट्यूब प्ले बटन्स

यूट्यूबकडून कंटेंट क्रिएटर्सना त्यांच्या सब्स्क्रायबर्सच्या संख्येनुसार बक्षीस म्हणून विविध प्रकारचे प्ले बटन्स दिले जातात. या बटन्समुळे क्रिएटर्सना आणि त्यांच्या चॅनल्सना उत्साह मिळतो. यूट्यूबने 2010 पासून या रिवॉर्ड सिस्टमला सुरुवात केली. सुरुवातीला यूट्यूबमार्फत फक्त सिल्व्हर आणि गोल्डन प्ले बटन दिलं जात होतं. मात्र, यूट्यूबवर युजर्सच्या वाढत्या संख्येमुळे आता पाच वेगवेगळ्या पद्धतीचे प्ले बटन्स दिले जातात. हे बटन्स यूट्यूब क्रिएटर्सच्या यशाचे प्रतीक मानले जातात.

सिल्व्हर प्ले बटन

सिल्व्हर प्ले बटन हे यूट्यूबवरील पहिलं रिवॉर्ड आहे, जे एखाद्या चॅनलने १ लाख सब्स्क्राईबर्स पूर्ण केल्यावर  दिलं जातं. यासाठी क्रिएटर्सला १ लाख सब्स्क्राईबर्स झाल्यानंतर यूट्यूबकडे अर्ज करावा लागतो, त्यानंतर हे सन्मानचिन्ह दिलं जातं.

गोल्डन प्ले बटन

गोल्डन प्ले बटन हे यूट्यूबवर १० लाख सब्स्क्राईबर्स पूर्ण झाल्यावर दिलं जातं. हा  यूट्यूबवर एक महत्त्वाचा टप्पा आहे, १० लाख सब्स्क्राईबर्स साध्य करणं क्रिएटरच्या प्रतिभेचं आणि मेहनतीचं मोठं उदाहरण असतं.

डायमंड प्ले बटन

जेव्हा एखादं यूट्यूब चॅनल १ कोटी सब्स्क्राईबर्स टप्पा पूर्ण करतो, तेव्हा त्यांना डायमंड प्ले बटन दिलं जातं. हे एक मोठं लक्ष्य आहे, जे सहजासहजी कोणालाही गाठता येत नाही. ज्यामुळे डायमंड प्ले बटन यूट्यूबवर मोठ्या यशाचं प्रतीक मानलं जातं.

रूबी प्ले बटन

रूबी प्ले बटन हे 5 कोटी सब्स्क्राईबर्स पूर्ण केल्यानंतर दिलं जातं. यूट्यूबवर फार कमी क्रिएटर्स या टप्प्यापर्यंत पोहोचतात, त्यामुळे हे बटन एक अतिशय दुर्मिळ आहे.

रेड डायमंड प्ले बटन

यूट्यूबवर मिळणारं सर्वांत मोठा रिवॉर्ड म्हणजे रेड डायमंड प्ले बटन, जे 10 कोटी सब्स्क्राईबर्स पूर्ण झाल्यावर दिलं जातं. हा एक असामान्य टप्पा असून, आजवर जगातील फक्त १० चॅनेल्सनाच हे बटन मिळालं आहे. 

प्ले बटन्स मिळवण्याची प्रक्रिया

प्ले बटन्स आपोआप मिळत नाहीत. तर जेव्हा एखाद्या यूट्यूब चॅनलने दिलेला सब्स्क्राईबर टप्पा पूर्ण केला, तेव्हा त्यांना प्ले बटन मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो. हा अर्ज चॅनलच्या सेटिंग्समधूनच केला जातो. यूट्यूबकडून दिल्या गेलेल्या अटी आणि शर्थींना पूर्ण केल्यावरच हे बटन्स मिळतात.

यूट्यूबवर कमाई कशी होते?

यूट्यूबवरील कमाई मुख्यतः व्हिडिओवर लागलेल्या जाहिरातींमधून होते. जेव्हा एखादा युजर एखादा व्हिडिओ पाहतो, तेव्हा त्याला जाहिराती दाखवल्या जातात, त्या जाहिरातींमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा एक हिस्सा यूट्यूब  क्रिएटर्सला देत असतं. एकूण व्ह्यूज, व्हिडिओची लांबी, कोणकोणत्या देशात व्हिडीओ बघितला जातो आणि कन्टेंट कोणत्या विषयावरील आहे अशा गोष्टींवर यूट्यूबच्या जाहिरातीमधून मिळणारी रक्कम अवलंबून असते. ज्या क्रिएटर्सकडे सिल्व्हर बटन आहे, त्यांची कमाई महिन्याला जवळपास 1 ते 2 लाखांपर्यंत पोहोचू शकते, तर गोल्डन बटनधारकांची कमाई यापेक्षा अधिक असते.

यूट्यूब क्रिएटर्सना जाहिरातीशिवायही अनेक मार्गांनी कमाई करता येते. यामध्ये ब्रँड प्रमोशन, स्पॉन्सरशिप, एफिलिएट मार्केटिंग आणि प्रोडक्ट प्लेसमेंट यांचा समावेश होतो. काही वेळा मोठ्या कंपन्या आणि ब्रँड्स यूट्यूबर्सला त्यांच्या प्रोडक्ट्सचं प्रमोशन करण्यासाठी पैसे देतात.

यूट्यूब हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून, हे अनेकांसाठी एक प्रभावी करिअर बनलं आहे. यूट्यूबच्या माध्यमातून लाखो लोक त्यांच्या क्रिएटिव्हिटीच्या जोरावर मोठ्या प्रमाणावर कमाई करत आहेत.

मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयावर लेख वाचायला आवडतील, हे सांगायला ही विसरू नका. 

आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button