लेखजिंकलंस भावा!प्रेरणादायी

१३ व्यवसायांत अपयश, डोक्यावर ८७ लाखांचे कर्ज, पण जिद्दीने उभारला कोट्यवधींचा व्यवसाय!

यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम जितके महत्त्वाचे असतात, तितकंच महत्त्वाचं असतं संकटांचा जिद्दीने सामना करणं. कोणत्याही व्यवसायात अपयश हे अपरिहार्य असतं, पण जो अपयशाने खचून जात नाही आणि त्याचा धैर्याने सामना करतो तो एक दिवस नक्कीच यश प्राप्त करतो. व्यवसायाच्या वाटचालीत अनेक अडथळे येतात, अनेकदा सर्व काही नियोजनानुसार होत नाही, पण खचून जाण्याऐवजी उभं राहून संघर्ष करणं हेच यशाचं खरं गमक असतं.

“डोसा क्रश” या फूड स्टार्टअपचे संस्थापक अंचल कुमार चौरसिया हे या गोष्टीचं उत्तम उदाहरण आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी व्यवसायात एक-दोन नव्हे, तर तब्बल १३ वेळा अपयश अनुभवलं. त्यांच्या प्रत्येक प्रयत्नाच्या सुरुवातीला अपेक्षित यश मिळाल नाही. पण त्यांचा आत्मविश्वास डगमगला नाही. अपयशाने खचण्याऐवजी त्यांनी त्यातून शिकण्याचा आणि अधिक जोमाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला.

आजच्या लेखात आपण अंचल कुमार चौरसिया यांचा हा प्रेरणादायी प्रवास जाणून घेणार आहोत. 

प्रारंभिक जीवन 

अंचल कुमार चौरसिया यांचा जन्म ११ मे १९९३ रोजी मध्यप्रदेशमधील जबलपूर येथे झाला. त्यांचं बालपण अत्यंत साध्या आणि संस्कारक्षम वातावरणात गेलं. लहानपणापासूनच ते अभ्यासू आणि कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांच्या कुटुंबात आई-वडील आणि दोन बहिणी होत्या. घरातील सर्वांनी शिक्षणाला महत्त्व दिलं, त्यामुळे अंचल यांनीही शिक्षणात चांगली प्रगती केली.

त्यांनी वाणिज्य शाखेतून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. मात्र, त्यांना सुरुवातीपासूनच नोकरी करण्याची इच्छा नव्हती. स्वतःचा व्यवसाय सुरू करून यश मिळवायचं, हे त्यांचे ध्येय होतं. मोठ्या उद्योगपतींच्या यशोगाथांनी त्यांना नेहमीच प्रेरित केलं. त्यामुळे पदवी शिक्षण पूर्ण होताच त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. 

अपयशाची कहाणी

अंचल कुमार यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी २००९ मध्ये आपला पहिला व्यवसाय सुरू केला. मात्र त्यात अपयश आलं. त्यानंतर मोबाईल शॉप्स, पोल्ट्री फार्म यांसारखे अनेक व्यवसाय उभारले. मात्र, प्रत्येक वेळी काही काळाने व्यवसाय अडचणीत येत होत्या आणि त्यांना तो व्यवसाय बंद करावा लागायचा. सतत अपयश पदरी पडत असतानाही त्यांनी धीर सोडला नाही, पण आर्थिक नुकसान वाढत गेलं. अखेर, १३ व्यवसाय अपयशी ठरल्यानंतर त्यांच्यावर ८७ लाख रुपयांचं कर्ज झालं आणि त्यांची संपूर्ण आर्थिक घडी विस्कटली.

या संघर्षमय काळात त्यांच्या कुटुंबावर आणखी मोठं संकट कोसळलं. ते म्हणजे त्यांच्या बहिणीच्या लग्नाच्या अवघ्या दोन दिवसांनी त्यांच्या वडिलांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. या धक्क्याने अंचल कुमार पूर्णतः खचले, पण त्यांच्या आईने त्यांना आधार दिला. आईच्या विश्वासामुळे त्यांनी पुन्हा प्रयत्न सुरू ठेवले आणि अपयशावर मात करण्याचा निर्धार केला. मात्र, दुर्दैवाने वडिलांच्या निधनानंतर अवघ्या सहा महिन्यांत त्यांच्या आईचंही निधन झालं. एकाच वर्षात दोन्ही पालकांना गमावल्यामुळे त्यांचं मानसिक आणि आर्थिक संतुलन पूर्णतः ढासळलं होतं.

पुन्हा उभारणी आणि मोठे यश

आधीच कर्जात बुडालेल्या अंचल यांना आता कोणीही कर्ज देण्यास तयार नव्हतं. त्यांनी इंदोर येथे एक कॅफे सुरू केला. पण तिथेही त्यांना यश मिळालं नाही. याआधी १३ व्यवसाय अपयशी ठरले होते, त्यामुळे त्यांच्याकडे गमावण्यास काहीच उरलं नव्हतं.  त्यांनी पुन्हा एकदा मेहनतीने फंड गोळा करण्यास सुरुवात केली. आर्थिक अडचणी, सामाजिक दबाव आणि स्वतःच्या अपयशांचा सामना करताना त्यांच्यातील जिद्द मात्र कायम राहिली. हळूहळू त्यांच्या प्रयत्नांना यश मिळायला लागलं. 

शेवटी, २३ जुलै २०१९ रोजी त्यांनी जबलपूर येथे “डोसा क्रश” या ब्रँडचं पहिलं आउटलेट सुरू केलं. अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाल्याने त्यांचा हा प्रयत्न अत्यंत यशस्वी ठरला. त्यांच्या स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पदार्थांनी ग्राहकांना आकर्षित केलं आणि अल्पावधीतच त्यांचा ब्रँड लोकप्रिय होऊ लागला. केवळ तीन महिन्यांत त्यांनी दुसरं आउटलेट सुरू केलं, आणि त्यानंतर परिस्थिती सुधारत गेली. वाढती मागणी लक्षात घेऊन त्यांनी ३ लाख रुपये प्रति फ्रँचायझी दराने नवीन शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे, त्यांनी “डोसा क्रश” या ब्रँडला नव्या जोमाने बाजारात विस्तारायला सुरुवात केली आणि त्याच्या यशस्वी प्रवासाची सुरुवात झाली.

डोसा क्रश: एक लोकप्रिय फास्ट फूड ब्रँड

“डोसा क्रश” ही एक फास्ट फूड फ्रँचायझी आहे, जी पारंपरिक दक्षिण भारतीय पदार्थांना आधुनिक ट्विस्ट देऊन ग्राहकांसमोर सादर करते. या ब्रँडची खासियत म्हणजे दर्जेदार आणि स्वादिष्ट पदार्थ परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध करून देणं. त्यामुळे ग्राहकांना उत्तम चव आणि उत्कृष्ट गुणवत्ता एकाच ठिकाणी मिळते. आज “डोसा क्रश” केवळ दक्षिण भारतीय पदार्थांपुरता मर्यादित न राहता, चायनीज, कॉन्टिनेंटल आणि फास्ट फूडमध्येही विस्तारली आहे. 

नवीन उत्पादने आणि आव्हाने

डोसा क्रश नेहमीच नाविन्यपूर्ण पदार्थ ग्राहकांसमोर आणत आहे. त्यांनी जैन अमेरिकन डोसा, चीज डोसा, पिझ्झा उत्तप्पम आणि स्प्रिंग रोल डोसा यांसारखे नवे आणि आकर्षक पदार्थ सादर केले आहेत, जे ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले आहेत.

Navi Blogs Size 8

कोविड महामारीच्या काळात “डोसा क्रश” च्या अनेक शाखांना स्थलांतर करावं लागलं. मात्र, आधीच अनेक अपयशांचा सामना केलेल्या अंचल कुमार यांच्यासाठी ही परिस्थिती नवीन नव्हती. त्यांनी पुन्हा नव्याने उभारी घेतली आणि व्यवसाय वाढवला. आज छिंदवाडा, सागर, डिंडोरी यांसारख्या मध्य प्रदेशातील शहरांसह त्यांच्या अनेक  ठिकाणी शाखा सुरू आहेत. त्यांच्या मेहनतीमुळे आणि ग्राहकांच्या प्रतिसादामुळे आज “डोसा क्रश” चा वार्षिक व्यवसाय १.५ ते २ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

मित्रांनो, अंचल कुमार चौरसिया यांचा प्रवास सोपा नव्हता. सततच्या अपयशांमुळे आर्थिक अडचणी वाढल्या, मानसिक ताण वाढला, पण त्यांनी परिस्थितीसमोर हार मानण्यापेक्षा आपल्या चुका सुधारण्यावर भर दिला. प्रत्येक अपयशातून शिकत राहिले, नव्या संकल्पना मांडत राहिले आणि अखेर यश संपादित केले. 

त्यांचा हा प्रवास प्रत्येक तरुण उद्योजकासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी सिद्ध करून दाखवलं की अपयश म्हणजे अंत नसतो, तर तो नव्या संधीचा आरंभ असतो. योग्य दिशा, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर कोणताही स्वप्नवत वाटणारा प्रवास यशस्वी होऊ शकतो. 

आणखी वाचा:

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button