अर्थजगतआर्थिकलेख

लवकर गुंतवणूक का सुरू करावी? | Why start investing early?

तुमचे उत्पन्न किती आहे यापेक्षा अधिक मिळवलेल्या पैशाचा विनियोग तुम्ही कसा करावा, योग्य आर्थिक नियोजन करून विविध ध्येय कशी साध्य करावी, तुमच्यावर असलेल्या कर्जाचे, तुम्ही काढलेल्या विम्याचे  व्यवस्थापन कसे करावे, सुयोग्य गुंतवणूक करून तुमच्या बचतीच्या पैशाला कसे कामाला लावावे, ही आर्थिक साक्षरता आत्ताच्या काळासाठी नितांत गरजेची आहे.

भविष्यात अधिकचा नफा मिळविण्याच्या उद्देशाने वर्तमानात केलेले पैशांचे सुयोग्य व्यवस्थापन म्हणजे गुंतवणूक म्हणता येईल.

जेव्हा एखादी वस्तू किंवा मालमत्ता कमी किमतीत खरेदी करून ठराविक कालावधीनंतर जास्त किमतीला विकून त्यावर मिळणारा भांडवली नफा हा त्या गुंतवणुकीचा सर्वात महत्त्वाचा फायदा होय. 

अल्पकालीन गुंतवणूक आणि दीर्घकालीन गुंतवणूक अशा दोन प्रकारात आपल्याला गुंतवणूक करता येते.

गुंतवणूक ही आपले आर्थिक भवितव्य अधिक आणि लवकर  सुरक्षित करण्याचा सर्वांत प्रभावी मार्ग असूनही अनेकजण गुंतवणूक उशिरा सुरु करतात. पहिल्यांदाच नोकरीला लागलेले तरुण भविष्याचे नियोजन करण्याऐवजी आधी आपल्या जीवनशैलीत सुधारणा करताना जास्त आढळून येतात. गुंतवणूक सुरु करण्यास खरंतर उशीर कधीच होत नसतो, पण तरीसुद्धा लवकर गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे असतात. याशिवाय आयुष्यात लवकर गुंतवणूक केल्याने तरुण गुंतवणूकदारांना जास्त बचत करता येते, कारण त्यांच्या Professional Life च्या  सुरुवातीला त्यांच्याकडे खूप कमी जबाबदाऱ्या असतात.  

आपल्या संस्कृतीमध्ये असं म्हणतात की माणसाने जर १ रुपया कमावला तर त्यातले २५ पैसे खर्च करावेत, २५ पैसे दान करावेत, २५ पैसे मुलांसाठी आणि उरलेले २५ पैसे गुंतवणूक करण्यासाठी वापरावेत. म्हणजेच थोडक्यात आपल्या कमाईचा २५% हिस्सा आपण गुंतवणुकीसाठी वापरायला हवा. गुंतवणूक म्हणजे आपल्या भविष्यकाळाची तरतूद असते. बहुतांश लोक लवकर गुंतवणूक करत नाहीत, कारण आयुष्यात लवकर गुंतवणूक करण्याचे महत्त्व त्यांना ठाऊक नसते ; परंतु लवकर गुंतवणूक करणे नेहमीच आपल्या हिताचे ठरते.

लवकर म्हणजे नक्की कधी?

वॉरन बफे म्हणतात की ‘मी वयाच्या ११ व्या वर्षापासून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. मी तोपर्यंत माझे आयुष्य वाया घालवत होतो.’

आपण आपल्या पहिल्या पगारापासून आपली गुंतवणूक सुरू करावी याचा अर्थ कमाई सुरू झाल्यावर साधारणतः २२ ते २५ वयोगटाच्या आसपास आपण गुंतवणूक सुरु करायला हरकत नाही.

तरुण वयात चांगली कमाई होत असताना योग्य बचत न करता खर्चाची सवय लागल्यास पुढील आयुष्यातील आर्थिक जबाबदाऱ्या निभावणे कठीण होते. त्यापेक्षा शुभस्य शीघ्रम् ! आता गुंतवणूक सुरु करा. आपल्याकडे अजूनही वेळ आहे. त्या वेळेचा कसा वापर करायचा हे आपल्या हातात आहे. लवकर गुंतवणूक केल्यास तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. जर आपण लवकर प्रारंभ केला नसेल तर त्याचे दुःख करत बसण्यापेक्षा आता गुंतवणूक सुरू करा.

 म्हातारपणातही ज्यांच्याकडे पैसा आहे, ते तरुण राहतात. याउलट, आर्थिकदृष्ट्या कमकुवत व्यक्ती मात्र तरुणपणातच वृद्ध होतात.

थोडक्यात काय तर जेव्हा आपण कमवायला सुरुवात करू तेव्हा आपल्या उत्पन्नाचा काही भाग हा आपल्याला झेपेल त्या प्रकारात आपण गुंतवलाच पाहिजे, ज्या गुंतवणूक प्रकाराचा आपल्याला भविष्यात लाभ होईल.

लवकर गुंतवणूक सुरू करण्याचे विविध फायदे :

1. संपत्ती : 

 लवकर गुंतवणूक केल्याने तुम्हाला तुमच्या संपत्तीला वेळ देऊन ती वाढवता येते. त्यामुळे तुम्ही भविष्यात मोठ्या रकमेचा स्वतःसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी फायदा मिळवू शकता. भविष्यातील ध्येयनिश्चिती करू शकता. काय योग्य ? काय अयोग्य? हे ओळखून कुठं गुंतवणूक करायची ? कशी आणि किती करायची हे आर्थिक शहाणपण कमी जबाबदारी असलेल्या वयातच येतं.

2. कम्पाउंड इंटरेस्ट :

गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम तुमच्या मूळ गुंतवणुकीच्या व्याजावर व्याज म्हणून वाढते, ज्यामुळे तुम्हाला त्याचा अधिक फायदा होतो.

3. सहनशीलता : 

लवकर गुंतवणूक केल्यामुळे तुम्हाला बाजारातील उतार-चढावांशी सामना करण्यासाठी अधिक वेळ मिळतो आणि तुम्ही अधिक शांतपणे गुंतवणूक करु शकता. संयम ठेवायला शिकता येतं. एक गुंतवणूकदार म्हणून आपली Risk Taking Capacity वाढते. त्या तणावाचं योग्य व्यवस्थापन देखील आपल्याला करता येतं.

4. आर्थिक स्वातंत्र्य : 

जेव्हा तुम्ही तुमच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी गुंतवणूक, बचत, आणि इतर आर्थिक योजना आखता, आर्थिक ध्येयनिश्चिती करता,  तेव्हा अप्रत्यक्षपणे तुम्ही तुमच्या जीवनात भविष्यातील आर्थिक संकटांची चिंता कमी करत असता.

सुरुवातीला कमी गुंतवणूक केल्याने तुम्ही भविष्यात आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकता आणि तुमची दिर्घकालीन उद्दिष्टे साध्य करू शकता.

5. सातत्यपूर्ण बचत :

लवकर गुंतवणूक सुरू केल्याने तुम्हाला आर्थिक नियोजनाची आणि बचतीची सवय लागते. आपल्या उत्पन्नाच्या काही रकमेची आपल्याला बचत करायचीच आहे ही सवय लागून जाते.

यामुळे लवकर गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत, जे तुम्हाला भविष्यात मोठ्या लाभाची, मोठ्या परताव्याची संधी देतात. 

म्हणून आजच श्रीगणेशा करा तुमच्या गुंतवणुकीचा !

हे पण वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button