लेखउद्योजकताबिझनेस महारथी

Qimat Rai Gupta: फक्त १०००० रुपयांपासून व्यवसाय सुरू केला, ९७००० कोटी रुपयांचा ब्रँड बनवला… 

यश मिळवण्यासाठी मोठं शिक्षण, मोठं भांडवल किंवा मोठ्या ओळखीचं नेटवर्क लागतं, असं अनेकजण मानतात. पण काही लोक आपल्या मेहनतीच्या जोरावर हे चुकीचं ठरवतात. त्यापैकीच एक नाव म्हणजे ‘हॅवेल्स’ या जगभर प्रसिद्ध असलेल्या इलेक्ट्रिकल ब्रँडचे शिल्पकार किमत राय गुप्ता. 

केवळ १०,००० रुपयांपासून सुरू केलेला हा व्यवसाय मेहनत, दूरदृष्टी आणि योग्य निर्णयांच्या जोरावर एका मोठ्या ब्रँडमध्ये रूपांतरित झाला. उत्कृष्ट उत्पादने, ग्राहकांचे समाधान आणि सुयोग्य व्यवस्थापन यामुळे हॅवेल्सने विश्वासार्हता मिळवली आणि आज तो जगभर लोकप्रिय ब्रँड म्हणून ओळखला जातो. मात्र, हे यश सहज मिळालं नाही. त्यामागे संघर्ष, कठोर मेहनत आणि ध्येयासाठी दिलेली अनेक वर्षे आहेत. या लेखात आपण त्यांचा हा शून्यातून शिखरापर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत.

बालपण आणि सुरुवातीचा प्रवास 

किमत राय गुप्ता यांचा जन्म १९३७ साली तत्कालीन अविभाजित पंजाबमधील एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. लहानपणापासूनच भारतीय तत्त्वज्ञान, विशेषतः भगवद्गीतेच्या शिकवणींचा त्यांच्या विचारांवर खोल प्रभाव पडला. शिक्षण घेत असतानाच त्यांना जाणवलं की, परिस्थिती बदलायची असेल, तर स्वतःच स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागेल. घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काहीतरी मोठं करण्याची जिद्द त्यांच्या मनात होती. त्यांनी निर्धार केला की केवळ शिक्षणावर अवलंबून न राहता, स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर यश संपादन करायचं.

१९५८ साली, वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी त्यांनी शिक्षण अर्धवट सोडून दिल्ली गाठली. त्यांच्याकडे १०,००० रुपये होते आणि मनात असंख्य स्वप्नं आणि पुढे जाण्याची अपार जिद्द होती. दिल्लीत पोहोचल्यावर त्यांनी भारतातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिकल मार्केट, भागीरथ पॅलेसमध्ये गुप्ताजी अँड कंपनी नावाने एक छोटंसं दुकान सुरू केलं. सुरुवातीला व्यवसाय छोटा होता, पण मेहनत, जिद्द आणि योग्य दृष्टिकोन यांच्या जोरावर त्यांनी हळूहळू बाजारात आपली ओळख निर्माण केली.

व्यवसाय उभारणीची खडतर वाटचाल

सुरुवातीला किमत राय गुप्तांनी छोटे-छोटे इलेक्ट्रिकल पार्ट्स विकण्यास सुरुवात केली. ते स्वतः दुकानात बसून ग्राहकांशी संवाद साधायचे, त्यांची गरज समजून घ्यायचे आणि अनेकदा त्यांच्यासाठी वस्तू दुरुस्तही करायचे. त्यांच्या मेहनतीमुळे ग्राहकांचा विश्वास वाढू लागला. त्यांनी केवळ व्यापार केला नाही, तर नातेसंबंध जपले आणि विश्वासार्हता निर्माण केली. सातत्यपूर्ण मेहनतीमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला, आणि त्यांचा व्यवसायही विस्तारू लागला.

१९७१ हे वर्ष किमत राय गुप्ता यांच्या आयुष्याला एक महत्त्वपूर्ण वळण देणारं ठरलं. दिल्लीतील व्यापारी हवेली राम गांधी आर्थिक अडचणीत सापडले होते आणि त्यांना आपली ‘हॅवेल्स’ (Havells) कंपनी विकावी लागणार होती. ही संधी ओळखून किमत राय गुप्तांनी मोठ्या जिद्दीने ७ लाख रुपये उभे करून ‘हॅवेल्स’ विकत घेतली. मात्र, कंपनीची स्थिती अत्यंत खराब होती. उत्पादन, व्यवस्थापन आणि बाजारातील ओळख या सर्वच बाबतीत मोठ्या अडचणी होत्या. पण किमत राय गुप्ता हार मानणारे नव्हते. त्यांनी अपार मेहनत, योग्य नियोजन आणि चिकाटीच्या जोरावर ‘हॅवेल्स’ला पुन्हा उभं करण्याचा निर्धार केला.

हॅवेल्सचं नव्या दमाचं नवं रूप! 

किमत राय गुप्तांनी ‘हॅवेल्स’ विकत घेतल्यानंतर तिच्या प्रत्येक गोष्टीत सुधारणा करण्यासाठी अपार मेहनत घेतली. त्यांनी केवळ स्विचेसपुरते उत्पादन मर्यादित न ठेवता विविध उत्पादनांची भर घातली. केबल्स, फॅन्स, लाईटिंग, गिझर, किचन अप्लायन्सेस यांसारख्या अनेक इलेक्ट्रिकल वस्तूंचा समावेश करून कंपनीला नव्या उंचीवर नेलं.

ते केवळ व्यवसाय वाढवत नव्हते, तर एक विश्वासार्ह ब्रँड तयार करत होते, जिथे गुणवत्ता, ग्राहक सेवा आणि इनोव्हेशन यांचा उत्तम समतोल होता. त्यांनी भारतभर उत्पादन केंद्रं स्थापन केली आणि प्रत्येक ठिकाणी जागतिक दर्जाचं उत्पादन हेच उद्दिष्ट ठेवलं. त्यांच्या या दूरदृष्टीमुळे हॅवेल्सने इलेक्ट्रिकल क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. 

हॅवेल्स भारतातील मार्केट लीडर बनली, पण हे फक्त उत्पादनामुळे झालं नाही. किमत राय गुप्तांनी ब्रँड बिल्डिंग आणि मार्केटिंगलाही तितकंच महत्त्व दिलं. प्रभावी जाहिराती, इनोव्हेटिव्ह कॅम्पेन्स आणि ग्राहकांशी थेट संवाद यामुळे हॅवेल्सची ओळख संपूर्ण देशभर पोहोचली. त्यांच्या योजनाबद्ध धोरणांमुळे हॅवेल्स केवळ एक उत्पादन करणारी कंपनी न राहता घराघरात विश्वासाने वापरण्यात येणारा ब्रँड बनली.

आजचं हॅवेल्स (Havells)

आज हॅवेल्स केवळ एक इलेक्ट्रिकल कंपनी नसून भारताच्या औद्यगिक विकासाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. ५०,००० हून अधिक डीलर नेटवर्क, १३ अत्याधुनिक उत्पादन केंद्रं आणि ७० पेक्षा जास्त देशांमध्ये आपली उपस्थिती ठेवत हॅवेल्सने जागतिक स्तरावरही स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ग्राहकांचा विश्वास आणि सतत नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब या जोरावर हा ब्रँड प्रत्येक घरात पोहोचला आहे.

Qimat Rai Gupta

किमत राय गुप्तांनी आपल्या व्यवसायात कुटुंबालाही सहभागी करून घेतलं. १९९२ साली त्यांचा मुलगा अनिल राय गुप्ता कंपनीत सामील झाला. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसायाचे बारकावे शिकत त्याने हॅवेल्ससाठी नव्या युगाची वाट तयार केली. २००७ साली, अनिल राय गुप्तांनी जर्मनीतील प्रसिद्ध ‘सिल्व्हेनिया’ लाइटिंग कंपनीचं अधिग्रहण केलं. हा हॅवेल्सच्या आंतरराष्ट्रीय विस्तारातील सर्वात मोठा टप्पा ठरला. २००८ च्या जागतिक आर्थिक मंदीच्या काळातही त्यांनी हॅवेल्सला स्थिर ठेवत व्यवसाय अधिक मजबूत केला.

२०१४ साली, वयाच्या ७७व्या वर्षी किमत राय गुप्तांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मात्र, त्यांनी मागे केवळ एक यशस्वी व्यवसाय नाही , तर एक मजबूत मूल्यव्यवस्था आणि लाखो लोकांसाठी प्रेरणादायी वारसा ठेवला. त्यांच्या मृत्युसमयी त्यांची संपत्ती २ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होती. 

मित्रांनो, हॅवेल्स ही केवळ एक ब्रँडची गोष्ट नाही, तर ती एका सामान्य माणसाच्या स्वप्नाची, त्याच्या परिश्रमांची आणि अपार चिकाटीची कहाणी आहे. किमत राय गुप्ता यांनी एका छोट्याशा दुकानातून सुरू केलेला प्रवास, आज कोट्यवधी ग्राहकांच्या विश्वासाचा आधार बनला आहे. 

आणखीन वाचा:

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button