Inspiring Journey of Sagar Gupta | २२ व्या वर्षी ६०० कोटींचा व्यवसाय

आजकाल बहुतेक तरुण नोकरीच्या शोधात असतात आणि शिक्षण पूर्ण करून चांगल्या पगाराची नोकरी मिळवून आयुष्य सेटल करावं अशी त्यांची इच्छा असते. मात्र काही तरुण या पारंपारिक विचारांना तडा देत पूर्णतः स्वतःच्या हिंमतीवर वाटचाल करण्याचा निर्णय घेतात. ते नवा विचार, नव्या दृष्टिकोनातून कार्य करत, आपल्या कष्टांवर विश्वास ठेवून अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवतात. नोएडातील सागर गुप्ता हा याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. त्याने पारंपारिक मार्गापेक्षा वेगळं काही करण्याचा ठरवलं आणि त्यासाठी लागणारी मेहनत, दूरदृष्टी आणि आत्मविश्वास याचा त्याने वापर केला.
केवळ २२ व्या वर्षी सागरने आपल्या व्यावसायिक प्रवासाला सुरुवात केली. आपल्या कौशल्यावर आणि दूरदृष्टीवर विश्वास ठेवून, त्याने चार वर्षांच्या कालावधीत आपल्या व्यवसायाला ६०० कोटी रुपयांच्या टर्नओव्हरपर्यंत पोचवलं. त्याचा हा प्रवास सिद्ध करतो की, आपल्या मेहनतीला जर योग्य दिशा मिळाली, तर काहीही शक्य आहे.
आजच्या लेखात आपण सागर गुप्ताच्या याच प्रेरणादायक प्रवासावर एक नजर टाकणार आहोत.
सुरुवातीचे दिवस व शिक्षण
सागर गुप्ताचा जन्म आणि शिक्षण दिल्लीमध्येच झाले. लहानपणापासूनच त्याला शिक्षणात आवड होती. त्याने श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून बी.कॉम. केलं. त्याच्या वडिलांची इच्छा होती की, सागर चार्टर्ड अकाउंटंट बनावा. यासाठी त्याने सीए परीक्षेची तयारी सुरू केली आणि कोचिंग घेतलं, परंतु नियतीने त्याच्यासाठी वेगळा मार्ग ठरवला होता.
सागरला सीए होण्यापेक्षा व्यवसायात अधिक रुची होती. वडिलांचा व्यवसाय असल्यामुळे, शिक्षण घेत असतानाच त्याला उद्योग क्षेत्राची गोडी लागली.
सुरुवातीचे दिवस व शिक्षण
२०१७ मध्ये सागरने आपल्या वडिलांसोबत एलईडी टेलिव्हिजन उत्पादन क्षेत्रात प्रवेश केला. भारतात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ होत होती, पण चीनच्या कंपन्यांचं उत्पादन बाजारात वर्चस्व गाजवत होते. अशा स्पर्धात्मक बाजारात आपलं स्थान निर्माण करणं हे एक मोठे आव्हान होतं. सागरने एक धाडसी निर्णय घेतला आणि ‘एक्का इलेक्ट्रॉनिक्स’ ही कंपनी सुरू केली. त्याला ठाऊक होतं की, या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी काहीतरी वेगळं आणि उत्तम करावं लागेल.
सागरच्या कुटुंबात कोणीही मोठा व्यावसायिक नव्हतं, त्यामुळे व्यवसायाच्या तांत्रिक आणि व्यावसायिक बाबतीत त्याला कमी अनुभव होता. पण त्याने मेहनत, योग्य नियोजन, आणि बाजारपेठेचं बारकाईने निरीक्षण केलं आणि ‘एक्का इलेक्ट्रॉनिक्स’ला यशाच्या मार्गावर नेलं. अनेक अडचणी येत होत्या, पण सागरने प्रत्येक अडचणीला संधी मानून त्यावर काम केलं.
त्याला एक मोठं आव्हान होतं, ते म्हणजे चीनच्या उत्पादनांच्या तुलनेत भारतीय उत्पादने महाग होती. चीनच्या कंपन्यांची उत्पादने स्वस्त आणि सहज उपलब्ध होती, तर भारतीय ग्राहकांना स्थानिक उत्पादनांचा स्वीकार करवून घेणं खूप कठीण होतं. पण सागरने ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचा लाभ घेत, उत्पादनांची गुणवत्ता वाढवली आणि विश्वासार्हता निर्माण केली. यामुळे त्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढला आणि त्याने भारतीय बाजारपेठेत आपलं स्थान निर्माण केलं.
एक्का इलेक्ट्रॉनिक्स – विस्तार आणि यश
आज ‘एक्का इलेक्ट्रॉनिक्स’ कंपनी एलईडी टीव्ही, स्मार्टवॉच, इअरफोन, हेडफोन, वॉशिंग मशीन यासारखी विविध उत्पादने तयार करते. भारतातील १०० हून अधिक व्यावसायिक या कंपनीकडून उत्पादने घेत आहेत. कंपनीने आपली गुणवत्ता, विश्वसनीयता आणि इतर गुणात्मक वैशिष्ट्यांमुळे बाजारात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे.
कंपनीचे मुख्य उत्पादन केंद्र सोनीपत, हरियाणा येथे स्थित आहे, जिथे १,००० हून अधिक कुशल कामगार आणि अभियंते कार्यरत आहेत. कंपनीत दर महिन्याला १ लाखाहून अधिक एलईडी टीव्हीचे उत्पादन केले जाते. २०२२-२३ मध्ये कंपनीने ६०० कोटी रुपयांचा महसूल गाठला, जो त्याच्या व्यवसायातील मोठ्या यशाचं प्रतीक आहे.

सागर आणि त्याच्या वडिलांनी आता नोएडामध्ये १,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करून नवीन उत्पादन सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सुरुवातीला ४०० कोटी रुपये गुंतवले जाणार आहेत. या प्रकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन प्रक्रियेचे सुधारणा केली जाईल. ‘एक्का इलेक्ट्रॉनिक्स’ने देशांतर्गत उत्पादनाला चालना दिली आहे, आणि आज भारतात तयार होणारी उत्पादने जागतिक दर्जाची बनली आहेत. त्यामुळे, त्यांची उत्पादने आता परदेशी कंपन्यांना टक्कर देत आहेत.
मित्रांनो, सागर गुप्ता याचा प्रवास हा केवळ एक व्यवसायिक यशोगाथा नाही, तर तो अनेक तरुणांसाठी एक प्रेरणा आहे. त्याने सिद्ध केलं आहे की योग्य संधीचा लाभ घेतल्यास आणि कठोर परिश्रम केल्यास कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करता येतं.
आणखी वाचा:
- युगप्रवर्तक उद्योजक “नारायण मूर्ती”
- “रंकाचा राजा’’ संघर्षातून उभारले यशस्वी साम्राज्य, लॅरी एलिसन यांचा प्रेरणादायी प्रवास
- भारताला अंतराळात घेऊन जाणारे शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. विक्रम साराभाई…