उभारी देणारं असं काहीप्रेरणादायी

सततची टीका आणि मानसिक त्रासाला वैतागलेल्या उद्योजकांसाठी…

व्यवसाय का बंद केला विचारले तर म्हणाला, त्याच्या बरोबरचे मित्र चिडवतात. डिप्लोमा इंजिनियर असूनही कुरिअर चालवतो. वेळ पडली तर स्वतः डिलिव्हरी करत हिंडतो. मामा तर म्हणाला, “चांगली नोकरी करायची सोडून लोकांची दारं पुजत फिरतो. भिकेचे डोहाळे लागलेत याला.” आई काही बोलत नाही, पण नुसती रडत असते. मी व्यवसाय नाही, तर काही गुन्हा करतोय असे सगळे वागत होते. व्यवसायाच्या सुरुवातीच्या दिवसात कमावलेले सगळे पैसे पुन्हा व्यवसायातच पुन्हा गुंतवावे लागतात, पण हे सांगून कुणालाही कळत नव्हते. शेवटी बंद केले सगळं आणि सरळ ही नोकरी धरली. पण इथेही लक्ष लागत नाही. नुसती घुसमट होतेय. हे सगळ बोलताना अगदी गुदमरला होता तो. मी थोडा वेळ त्याची सांत्वना केली व निरोप घेतला. त्या रात्री मलाही झोप आली नाही. प्रताप सारखे असे अनेक युवक असतील. स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धडपडत असतील.

मोठ्ठा उद्योजक व्हायचे ध्येय उरी बाळगून प्रामाणिक प्रयत्न करत असतील. पण जवळच्या लोकांच्या टीका, उद्योगात सतत मिळणारे rejections आणि मानसिक त्रासाला वैतागून स्वतःचे स्वप्न विसरून समाजाला मान्य असणाऱ्या सरळ रस्त्याने आयुष्य जगायला लागत असतील.

तसं टीका आणि नकार हे उद्योजकांसाठी काही नवी बाब नाही. अगदी प्रत्येक उद्योजकाला याला सामोरे जावे लागते, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. आणि अनेक उद्योजकांनी, व्यावसायिकांनी याला सामोरे जाण्याचे मार्ग ही शोधले आहेत. पण नवीन उद्योजकांना ते माहित नसतात आणि मग प्रताप सारखा अनेकांचा बळी जातो. प्रतापला टीकांना आणि नकाराला सामोरे कसे जावे सांगायचे होते, पण त्या वेळी तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता आणि ते ठिकाणही नव्हते. वेळही निघून गेली होती. मला एका गोष्टीची खात्री मात्र आहे. प्रताप नोकरी जास्त दिवस करू शकणार नाही. त्याच्यातला उद्योजक पुन्हा उफाळून येईल आणि पुन्हा तो स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करेल. पण बराच वेळ आणि संधी या प्रवासात वाया जाईल. उद्योग, व्यवसाय करु पाहणाऱ्या अनेक प्रतापांचे नुकसान होऊ नये म्हणून हा एक छोटासा प्रयत्न.

१. टीकेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला.

उद्योजक मित्रांनो शेजारील चित्रात कोणाला जख्ख म्हातारी दिसत असेल, तर कुणाला २० वर्षाची तरुणी. चित्र एकच आहे, पण आपण त्या चित्राकडे कसे पाहतो त्यावर आपल्याला काय बोध होतो ते ठरते. याचाच अर्थ असाही होतो की, आपण जे पाहतो ऐकतो, त्याचा आपण कसा अर्थ लावतो, त्यावर त्या घटनेचा आपल्यावर काय परिणाम होईल हे ठरते. उद्योग करत असताना आपल्यावर टीका करणारे बहुतेक आपले आप्तेष्ट किंवा मित्रपरिवारांपैकी असतात. या व्यक्ती जेव्हा तुमच्या स्थितीकडे पाहतात, तेव्हा ते बाहेरून स्थितीकडे पाहत असतात. तुमची आणि त्यांची परिस्थिती कडे पाहण्याची दिशा परस्पर विरोधी असल्याने, बाहेरून आत पाहणाऱ्यांना जे दिसते आणि तुम्ही ज्याठिकाणी उभे राहून पाहता तिथून तुम्हाला दिसणारे दृश्य (Vision ) यात बराच फरक असतो. आणि खरं म्हणजे तुमच्या स्वप्नाबद्दल सर्वात महत्वाच मत जर कुणाचं असेल, तर ते फक्त तुमचाच असू शकतं.

इतरांच्या नकारार्थी टिप्पण्या ह्या त्यांच्या मर्यादांचे प्रतिबिंब असते, तुमच्या नव्हे. दुसरा महत्वाचा भाग असा की टीका टिप्पणी करणाऱ्यांचा हेतू काय आहे हे ही जाणून घेणे गरजेचे आहे. कुणी तुमच्यावरील अति लोभामुळे आणि काळजीपोटी बोलत असेल, तर कुणी तुमच्याबद्दल असणाऱ्या मत्सरामुळे बोलत असेल. इंग्रजीत एक नवीन शब्द आला आहे Frenimy म्हणजेच मित्राच्या रूपातील वैरी. दोन्हीही परिस्थितीत जर टीका टिप्पणीला घाबरून अथवा वैतागून, जर तुम्ही चुकीचे पाऊल उचलले, तर एक तर आप्तेष्टांचे व स्वतःचे नुकसान कराल किंवा वैऱ्याला अपेक्षित कृती कराल.

२. तुम्ही परिपूर्ण (perfect) नाही याची जाणीव बाळगा.

“Nobody is perfect, if you think you are perfect then you are Nobody”

प्रत्येक व्यक्ती मध्ये दोष असतात त्या प्रमाणे तुमचेही काही दोष असू शकतात. स्वप्नवेडे होऊन मार्गक्रमण करताना स्वतःच्या दोषांकडे दुर्लक्ष होण्याची दाट शक्यता असते. अशावेळेला आपल्यावर होणाऱ्या टीका आणि rejections आपणास आपल्या दोषांची जाणीव करून देऊ शकतात. थोडेसे सिंहावलोकन (Introspection) केल्यास आपणास हे दोष जाणवतात आणि एकदा जाणीव झाली की ते सुधारणे सोपे होते. त्यामुळे टीकांना नकारार्थी घेण्याऐवजी त्यातून सुधारण्याचे धडे शिकणे अधिक फायदेशीर ठरेल. बऱ्याचदा टीकांच्या रुपात आलेल्या सुधारणेच्या सूचना परिस्थितीमुळे लगेच अंगीकारणे शक्य नसते. पण आपणास या सुधारणा करायच्या आहेत हा विचार मनात ठेऊन केलेला प्रवास जास्त यशस्वी ठरतो.

३. सगळ्याच गोष्टी मनाला लावून घ्यायच्या नसतात.

अनेकदा सिलेक्टिव्ह लिसनिंग चा वापर अनेक यशस्वी लोकं करतात. याचाच अर्थ आपणास उपयुक्त गोष्टी ऐकणे वर त्यावर अंमलबजावणी करणे आणि ज्या गोष्टी नको असतील त्यांना ऐकणे पण दुर्लक्षित करणे. या युक्तीचा वापर केल्याने आपण स्वतःला निराशेपासून तर वाचवतोच पण अनेक वेळा वादही टाळता येतात. निराशेत अथवा वादावादीत वाय जाणारा वेळ व शक्ती वाचते. अनेकदा एखादी टीका अथवा नकार आपणाला मिळाली की आपण लगेच त्यावर प्रतिक्रिया देतो अथवा तसा सातत्याने प्रयत्न करतो. अनेक अशा परिस्थिती असतात ज्यांचे उपाय काही वेळ जाऊ दिल्यास आपोआपच होतो.

मित्रांनो या जगात काही वेगळं करण्याची इच्छा बाळगणाऱ्यांना नेहमीच टीकांना आणि नकारांना सामोरे जावे लागले.

जे. के. रोलिंग, हॅरी पॉटरची सुप्रसिद्ध लेखिकेला पहिले पुस्तक प्रकाशित होण्याआधी १२ वेळा नाकारला सामोरे जावे लागले. संत ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांना अनेक टीका सहन करतच जगाला ज्ञानेश्वरी द्यावी लागली. संत तुकारामांची गाथा इंद्रायणीत बुडवली गेली. त्यामुळे टीकांना आणि नकारांना घाबरून जाऊ नका. जागरूकपणे जर या टीकांचा स्वीकार करून सुधार घडवले, तर तुमचे स्वप्न सत्यात उतरवणे शक्य आहे

तुमच्या स्वप्नांसाठी हार्दिक शुभेच्छा

आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button