उभारी देणारं असं काहीप्रेरणादायीरंजक-रोचक माहिती

संख्येने कमी मात्र अब्जाधीशांमध्ये अव्वल; काय आहे पारशी समाजाची गोष्ट?

पारशी समाजाचा उगम कसा झाला?

आजच्या घडीला केवळ देशातच नाही, तर विदेशात देखील भारताचे नाव गाजवत असलेली कंपनी म्हणजे टाटा समूह किंवा Tata Group of Industries आणि या कंपनीचे सर्वेसर्वा रतन टाटा. मात्र तुम्हाला माहिती आहे का हे रतन टाटा देखील पारशीच आहेत. कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आज भारतीय व्यावसायिक क्षेत्रात सर्वोच्च  कामगिरी बजावणारा हा पारशी समाज मूळचा भारतीय नाही. सध्याच्या काळात जो देश इराण म्हणून ओळखला जातो त्याचं जुनं नाव होतं पर्शिया आणि म्हणून तिथून उगम पावलेले लोक पारशी म्हणून ओळखले जातात. पारशी समाज इ.स पूर्व ७व्या शतकापासून या भागात पाहायला मिळू लागला. मात्र त्यानंतर इराणवर अरबी मुस्लिमांकडून आक्रमणं व्हायला सुरुवात झाली. या भयावह आक्रमणांना तोंड देणं पारशी समाजाला जमणारं नव्हतं म्हणूनच त्यांनी स्थलांतर करायला सुरुवात केली. 

विविध दिशांना निघालेल्या या जहाजांपैकी कैक जहाजं भारतातील गुजरात राज्याच्या सीमेला येऊन धडकली. परदेशातून आलेल्या या समजाला स्थानिकांशी संवाद मात्र साधता येईना आणि स्थानिक देखील या लोकांबद्दल आणि त्यांच्या भाषेबद्दल अनभिज्ञ होते. परिणामी सर्व खबर स्थानिक राजाच्या कानी घालण्यात आली. आता या अनोळखी लोकांशी संवाद साधायचा तरी कसा या विचारात असलेल्या राजाला अचानक एक कल्पना सुचली, त्याने ताबडतोब एक भरलेला दुधाचा पेला पारशी समूहासमोर आणून ठेवला. या काठोकाठ भरलेल्या पेल्याचा अर्थ काय? याचा अर्थ असा, की राज्याची लोकं सामावून घेण्याची मर्यादा संपली आहे आणि यात आणखी लोकांना सामावून घेता येणार नाही. 

राजाच्या या निर्णयावर हताश न होता पारशी लोकांनी संयम बाळगला आणि त्यानंतर पारशी लोकांकडून आलेलं उत्तर सर्वांना अचंबित करणारं होतं. पारशी लोकांनी त्याच दुधाने भरलेल्या पेल्यात काहीशी साखर मिसळली आणि तो पेला पुन्हा राजासमोर ठेवला. राजा या उत्तरावर खुश झाला, तुमच्या समाजामध्ये आम्ही साखरेप्रमाणे विरघळून जाऊ असा मतितार्थ समोर ठेऊन पारशी लोकांनी त्यांच्या डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर या स्वभावाचं उदाहरण प्रस्तुत केलं आणि  सर्वांना क्षणार्धात जिंकूनही घेतलं. बुद्धिमान, हुशार, मेहनती आणि शेतीचा अनुभव असलेल्या पारशी समाजाने दिलेल्या शब्दाचं  पालन केलं. ते राजाच्या छत्रछायेत आनंदाने राहू लागले  मात्र काही काळानंतर आलेल्या दुष्काळाने त्यांना देशाटन करायला भाग पडलं. त्याकाळात आपल्या भारतात विविध राज्यांमध्ये आपापसात युद्धं व्हायची, मात्र पारशी लोकांनी कधीही अशा युद्धांमध्ये भाग घेतला नाही, याउलट नेहमीच सर्व राज्यांशी जुळवून घेत व्यवसाय सुरु ठेवला. 

45037151 2305641402992949 1628658427641200640 n 1

इंग्रजांची सत्ता आणि पारशी समाज

पारशी समाज भारतात मुख्यत्वेकरून दलालीचा व्यवसाय (Brokerage business) करायचा. सर्वांशी जुळवून घेत ते व्यापार वाढवतच होते आणि अशातच व्यापाराच्या उद्देशाने काही मत्सरी पाऊलं भारतात उमटली. साधारण १६०८ साली इंग्रजांनी मसाल्याच्या व्यापाराचे निमित्त साधून भारतीय बाजारात आणि भूमीत प्रवेश मिळवला. भारताचे वैभव पाहून त्यांचे डोळेच दिपले आणि या संधीसाधू माणसांनी भारतावर राज्य करण्याचा निर्णय पक्का केला. काही स्वकीयांच्या धूर्त, फितूर आणि लालची स्वभावामुळे ते यशस्वी देखील झाले. इंग्रजांच्या जुलमी राजवटीखाली भारतीय जनता होरपळून निघत होती, मात्र पारशी समाजाने या संधीचं सोनं करून दाखवलं. सर्वात अगोदर पारशी लोकांनी इंग्रजांची भाषा शिकून घेतली, कारण भाषा हीच संवाद साधण्याचं महत्वाचं साधन आहे. पारशी लोकांनी इंग्रजी भाषेचा अभ्यास केल्याने इंग्रजांना देखील स्थानिकांशी संवाद साधण्यासाठी मदत मिळू लागली. इंग्रजी राजवटीत पारशी लोकं इंग्रजांकडे नोकरी करायचे आणि म्हणूनच त्याकाळात अनेक पारशी लोकं सरकारी कर्मचारी म्हणून पाहायला मिळत. पारशी लोकांच्या या स्वभावगुणांमुळे त्यांनी इंग्रजी राजवटीचा केंद्रबिंदू असलेल्या आणि व्यापाराच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरलेला मुंबई/बॉम्बे मध्ये जम बसवला. 

Cover2 1

भारतात इंग्रजी सत्ता असताना घडलेला एक महत्वाचा प्रसंग म्हणजे चीन आणि युरोप यांमध्ये वाढलेला व्यापार. चीन युरोपला मोठ्या प्रमाणात चिनी मातीची भांडी, चहा आणि रेशीम पाठवायचा आणि युरोपकडून देखील या वस्तूंसाठी मागणी वाढत होती. दुसऱ्या बाजूला चीन आणि युरोप यांमधले वृद्धिंगत होणारे संबंध इंग्रजांना रुचणारे नव्हते आणि म्हणूनच त्यांनी पारशी लोकांच्या मदतीने चीनमध्ये अफूची निर्यात सुरु केली. येणाऱ्या  प्रत्येक दिवसासोबत चीनमधून अफूची मागणी वाढू लागली, एक वेळ तर अशी आली होती की चीनमध्ये प्रत्येक ४ पैकी ३ माणसं अफूच्या आहारी गेली होती. अफूच्या व्यापाराने इंग्रजांना काय फायदा झाला? एकतर चीनमधील लोकं अफूच्या नशेत असल्याने युरोपसोबतचा व्यापार कमी झाला आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या निर्यातीमुळे धानाचे पेटारे भरू लागले. 

पारशी समाज आणि आज

स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच पारशी समाज भारतात उत्तमरीत्या त्यांचा जम बसवून आहे. इंग्रजांची राजवट असताना देखील त्यांनी अनेक सन्मानित पदं सांभाळली होती. पारशी लोकं त्याकाळी अनेक जहाजांचे मालक होते, डॉक्टर होते आणि सरकारी कचेऱ्यांमध्ये काम देखील करायचे. पारशी लोकांनी जरी भरपूर पैसा कमावला असला तरीही आपण कोणत्या परिस्थितीमधून इथवर आलोय याची जाण त्यांना कायमच होती आणि म्हणूनच कमावलेल्या पैशांमधून त्यांनी मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी हॉस्पिटल्स आणि शैक्षणिक संस्थांची निर्मिती करत समाजाप्रती नेहमीच आपले कर्तव्य निभावलं. स्वातंत्र्योत्तर काळातही आपण जर का यांची संख्या मोजायला गेलो तर ती ०.००५ टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही, मात्र भारतीय अब्जाधीशांच्या यादीत तीन ते पाच नावं ही पारशी समाजातील (टाटा, गोदरेज, पूनावाला, मिस्त्री, वाडिया) आहेत.

एअरलाईन्स, सॉफ्टवेअर, कन्स्ट्रक्शन, फूड, हेल्थ यांसारख्या एक ना अनेक क्षेत्रांमध्ये पारशी समाज अव्वल कामगिरी बजावतोय. देशाची सुरक्षा, मनोरंजन, खेळ किंवा वैज्ञानिक क्षेत्राची समाजातील प्रत्येक क्षेत्रात या लोकांनी नाव कमावलं असल्याने व्यवसायातून झालेली सुरुवात आज अनेक दिशांना पसरलेली आहे. पारशी लोकांची संख्या अत्यंत नगण्य म्हणजे १४२ कोटींच्या देशात फक्त ५७००० असली तरीही सैन्य, मनोरंजन, व्यापार, विज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये पारशी नाव कमावताना दिसतात. समाज थोडा असला तरी कर्तबगारांची संख्या खूप मोठी आहे. फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ, जमशेदजी टाटा, रतन टाटा, होमी भाभा, सायरस पुनावाला, आदी गोदरेज, बोमन इराणी अशी अनेक नावं या समाजाच्या कर्तृत्वाचे उदाहरण प्रस्तुत करतात.

fb52ba bfc2bb9b6d884b34bcd6067456d2940fmv2

आपण पारशी समाजाकडून काय शिकलो?

एखादी गोष्ट वाचल्यानंतर आपण त्यातून काय शिकलो याची जाणीव झाली पाहिजे. पारशी समाज हा हातावर मोजण्याएवढा जरी असला तरीही त्यांच्या शांत आणि मेहनती स्वभावामुळे ते अनेकांवर भारी ठरले आहेत. कदाचित त्यांना जन्मजात हा स्वभाव मिळालाही असेल, मात्र तरीही समोर आलेला प्रसंग कशाप्रकारे आपल्या फायद्याचा ठरू शकतो याचे धडे आपण पारशी समाजाकडून गिरवले पाहिजेत. अनेकवेळा फटकळ बोलण्यामुळे मह्त्वाची कामं होता-होता राहतात, मात्र या समाजात जर का टिकून राहायचं असेल आणि चार-चौघांमध्ये वावरायचं असेल तर तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवता आला पाहिजे. सर्वात शेवटी पारशी समाजाकडून शिकण्याची गोष्ट म्हणजे मेहनती स्वभाव, परिस्थिती कितीही बिकट असली तरीही ती केवळ मेहनतीच्या जोरावर बदल घडवता येतात. 

आणखीन वाचा:

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button