अर्थजगतआर्थिक

पैशांच्या स्मार्ट व्यवस्थापनाच्या या 10 Master Tricks तुम्हाला माहीत आहेत का?

बहुतेक जणांना असे वाटते, की कमाई चांगली असेल तर आर्थिक नियोजनाची काही गरज नाही; पण पैसा कसा हाताळायचा किंवा गुंतवायचा हे कळत नसेल, तर उद्या हजारांत काय लाखांचे पॅकेज जरी मिळाले तरी ते पुरणार नाही हे वास्तव आहे. मित्रांनो, लक्षात घ्या पैशाचे स्मार्ट व्यवस्थापन जर तुम्ही करणार नसाल तर तुम्हाला तुमच्या भविष्यातील आर्थिक ध्येयांना गुंडाळण्याची वेळ येऊ शकते आणि कर्जाचा मोठा डोंगर तुमच्या पुढे उभा राहू शकतो. यासाठी उत्पन्न कितीही असलं तरी त्या पैशांचे योग्य व्यवस्थापन करता येणे गरजेचे ठरते. 

आज आपण पैशांच्या स्मार्ट व्यवस्थापनाच्या 10 Master Tricks पाहूया: 

  • महिन्याच्या आणि वार्षिक खर्चाचे अंदाजपत्रक बनवा. त्यामध्ये होणाऱ्या खर्चाची विभागणी वेगवेगळी करा. यातून तुम्हाला आवश्यक गोष्टीवर होणारा खर्च, हॉटेलिंगवर होणारा खर्च, मुलांच्या शिक्षणावर होणारा खर्च याचा अंदाज येईल.
  • तुमच्या गरजा आणि इच्छा यामधला फरक समजून घ्या. बहुतेक जण यामध्ये गल्लत करतात. गरजेनुसार खर्च करा, इच्छेनुसार नको.
  • तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करू नका. हा एक महत्वाचा नियम आहे. बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये असणारे बहुतेकजण यामध्ये अडकलेले असतात.
  • महिन्याची बिले, कर्जाचे हप्ते वेळेवर भरा. यामुळे तुमची पत सुधारायला मदत होते. ECS (Electronic Clearing Service) मुळे आज बिल भरणे, कर्जाचे हप्ते भरणे खूप सोपे झाले आहे.
  • क्रेडिट कार्डचा योग्य वापर करा. आज बाजारात क्रेडिट धारकांसाठी खूप योजना येतात आणि त्या सापळ्यात अडकणारेही बरेचजण आहेत. क्रेडिट कार्डचे स्मार्ट उपयोगही आहेत ते समजून घेणे गरजेचे आहे.
  • स्मार्ट कर्जं आणि वाईट कर्जं घ्या. स्मार्ट कर्ज म्हणजे अशी कर्ज ज्यामध्ये आपल्याला कर नियोजनास मदत होते आणि स्वस्त दरात उपलब्ध होतात. जसे की गृहकर्ज आणि शैक्षणिक कर्ज यावर कर सवलती असतात, याविरुद्ध वाईट कर्ज म्हणजे अशी कर्जं जी महाग दराने मिळतात उदा. वाहन कर्ज, क्रेडिट कार्ड.
  • तुमच्या अडचणीच्या काळासाठी ३-६ महिन्याच्या खर्चाची तरतूद करून ठेवा. आपल्याला उद्या कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल सांगता येत नाही. नोकरी-धंद्यामध्ये येणाऱ्या चढउताराला सामोरे जाण्यासाठी ही तरतूद खूप महत्त्वाची आहे.
  • तुमचे महिन्याचे बँक, कर्जाचे स्टेटमेंट चेक करत चला. खूपवेळा आपण याकडे न बघताच रद्दीमध्ये टाकतो. जेव्हा तुम्ही ती काळजीपूर्वक पाहता, तेव्हा तुम्हाला त्यातील बारकावे लक्षात येतात.
  • तुमच्या परिवाराला, घरातील मोठ्या मुलांना पैशाचे महत्व, तुम्ही केलेल्या गुंतवणूका समजून सांगा, जेणेकरून भविष्यात या गुंतवणूका त्यांना समजायला वेळ लागणार नाही.
  • आर्थिक नियोजन, विमा, गुंतवणूक यासाठी त्या त्या क्षेत्रातील व्यावसायिक लोकांचा सल्ला घ्या.

लक्षात घ्या; एक छोटेसे छिद्रही जहाजाला बुडवू शकते, त्यामुळे आपल्या आर्थिक जीवनाला शिस्त आणण्यासाठी पैशाचे स्मार्ट व्यवस्थापन गरजेचे आहे आणि त्याची सुरुवात कमाई सुरू झाल्यापासून करणे गरजेचे आहे. ज्याला पैसा कमावता येतो, त्याला तो सांभाळताही आला पाहिजे आणि वाढवताही आला पाहिजे.

आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button