उद्योजकताबिझनेस स्टोरीझ

3 वर्षे शेती करून उभी केली 1200 कोटींची कंपनी जाणून घ्या या “ॲग्री स्टार्टअप” ची कहाणी

अलिकडच्या काळात शेती क्षेत्रात सातत्यानं बदल होत आहेत. अनेक तरुण करिअर म्हणून देखील शेतीकडे पाहू लागले आहेत. बरेचसे शिक्षित तरुण आधुनिक शेतीची माहिती घेऊन शेतीकडे वळत आहेत व पारंपरिक शेतीपेक्षा कित्येक पटींनी अधिक उत्पन्न घेत आहेत. राजस्थानच्या जयपूरमध्ये राहणाऱ्या ऋतुराज शर्मा या 33 वर्षाच्या तरुणाने देखील शेतीत नवनवीन प्रयोग केले आहेत. शेतीच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधत या तरुणाने करोडो रुपयांची Zettafarms नावाची कंपनी स्थापन केली आहे.  

गुडगावमध्ये ही कंपनी असून कॉर्पोरेट शेतीमध्ये कार्यरत आहे. कंपनी भाडेतत्त्वावर जमीन घेते आणि त्यात धान्य, फळं आणि भाजीपाला पिकवते. या कंपनीचे संस्थापक ऋतुराज शर्मा यांनी B.Tech आणि MBA केल्यानंतर नोकरीऐवजी स्वत:चं Startup सुरू केलं.  कंपनीचा उद्देश शेती अधिक फायदेशीर बनवणे आणि शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे आहे. शेतकऱ्यांच्या तांत्रिक आणि आर्थिक समस्या कमी करून आधुनिक शेती पद्धतीचा वापर करून शेतीचे उत्पादन अधिक वाढवणे हा कंपनीचा मुख्य उद्देश आहे

Zettafarms चे काम कसे चालते? 

Zetta Farms शेतीला एका व्यावसायिक कंपनी प्रमाणे चालवते. एका कॉर्पोरेट कंपनीप्रमाणे  फायनान्स, ऑपरेशन्स, IT अशी सर्व खाती या कंपनीत देखील आहेत. मोठ्या प्रमाणावर शेतजमीन भाडेतत्वावर घेऊन सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्यावर शेती केली जाते. कुठले पीक किती प्रमाणात घ्यावे. कुठल्या पिकाला अधिक भाव मिळेल या सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच पिके घेतली जातात. शेती करण्यासाठी कंपनीने शेतकऱ्यांनाच नोकरीवर ठेवले आहे, ज्याच्या बदल्यात त्यांना प्रत्येक महिन्याला ठराविक पगार मिळतो. कंपनी कायदेशीर असल्यामुळे शेतकऱ्यांचा PF देखील जमा होतो. याशिवाय कंपनी शेतकऱ्यांना मोफत इन्शुरन्स देखील देते. आज रोजी कंपनीमध्ये जवळपास २९०० कर्मचारी काम करतात.

Zettafarms चा 15 राज्यांमध्ये विस्तार 

Zettafarms ही कंपनी करारावर किंवा भाडेतत्त्वावर शेती करते. ज्यामध्ये ते किमान 50 एकर जमीन एका व्यक्तीकडून आणि 100 एकर जमीन एका गटाकडून भाडेतत्त्वावर घेतात. त्यानंतर त्या जमिनीवर ते शेती करतात. झेटाफार्म्स सध्या 15 राज्यांमध्ये 20 हजार एकर जमिनीवर शेती करत असून ६० पेक्षा जास्त पिकांचे उत्पादन घेते. पिकांमध्ये ते गहू, हरभरा, धान, कडधान्ये, भाजीपाला, फळे, चहा आणि कॉफीच्या मळ्यासह सर्व प्रकारची शेती केली जाते.

ऋतुराजने शेती हा यशस्वी व्यवसाय कसा बनवला?

ऋतुराज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतीमध्ये व्यवसाय, अर्थशास्त्र, गणित आणि विज्ञान यांचा समावेश केला, तर तो कोणत्याही परिस्थितीत फायदेशीर व्यवसाय आहे. या विचाराने ऋतुराजने शेतीमध्ये पाऊल टाकले. सुरुवातीला ऋतुराजने फक्त 2 एकर शेती करायला सुरूवात केली. हळूहळू भाडेतत्त्वावर आणि करारावर जमीन घेऊन व्यवसाय वाढवायला सुरुवात केली. ऋतुराजच्या कंपनीला पहिल्या वर्षी फक्त 1 लाख रुपयांचा नफा झाला, पण नंतर त्यांनी झपाट्याने काम वाढवले. 

Zettafarms

Zettafarms चे यशाचे रहस्य काय?

एका ठिकाणी केवळ एकाच पिकाची शेती हानीकारक असू शकते. या विचारसरणीवर काम करत Zettafarms हे पीक विविधतेवर काम करते. ते वेगवेगळ्या भागात विविध प्रकारची शेती करतात. शेतीसाठी ते नवीन तंत्रज्ञान वापरतात ज्यामध्ये ते माती परीक्षणापासून इतर गोष्टींपर्यंत आवश्यक माहिती गोळा करतात. तंत्रज्ञानामध्ये, ते हवामान apps आणि क्रॉप मॉनिटरिंगसह विविध प्रकारच्या माहितीचे विश्लेषण वापरतात. झेटाफार्म्स गरजेनुसार सिंचन तंत्रज्ञानाचा वापर करतात, कुठे ठिबक सिंचनाची गरज भासल्यास तिथेही तेच काम केले जाते. याशिवाय कुठे पाणी कमी असल्यास कमी पाण्यात पिके घेण्याच्या नियोजनावर काम केलं जातं 

ते संसाधनांचा योग्य वापर करतात. ज्यामुळं उत्पादन वाढते आणि नफाही वाढतो. पीक विविधीकरणाव्यतिरिक्त ते Risk Management वर देखील काम करतात.

औषधे, खते किंवा किटकनाशके वापरताना ते कीटक व्यवस्थापनाच्या पद्धती देखील अवलंबतात. ज्यामुळं खर्च कमी होतो आणि शेतीमध्ये कमी रसायने वापरली जातात. 

भविष्यातील वाटचाल : 

ऋतुराज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतीला ते एक यशस्वी व्यवसाय म्हणून समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या व्यवसाय मॉडेलद्वारे ते लोकांना सांगू इच्छित आहेत की, शेतीतूनही करोडोंची कमाई केली जाऊ शकते. आयटी, फायनान्स आणि इतर क्षेत्रात काम करणे ज्याप्रमाणे लोक अभिमानाची गोष्ट मानतात, त्याचप्रमाणे लोकांना शेती आणि शेतकऱ्यांबद्दल आदराची भावना निर्माण झाली पाहिजे. 2030 पर्यंत 50 हजार एकरांवर शेती करण्याचे ऋतुराज शर्मा यांचे ध्येय आहे. शेतकरी, जमीनीचे मालक, स्टार्टअप्स, शेती पूरक व्यवसाय आणि शेती उपकरणे पुरवठादार यांना जोडणारे कृषी अर्थव्यवस्थेचे केंद्र बनून झेट्टा फार्म्स कृषी क्षेत्रात स्वतःच्या कार्याने बहुमूल्य योगदान देत आहेत. 

आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button