उद्योजकताबिझनेस महारथी

Success Story: एका भांडणानं बनवली कोट्यावधींची संपत्ती, वाचा ‘ओला’ कॅब मालकाची प्रेरक कथा

कामानिमित्त प्रवास करायचा तर ऑटो किंवा टॅक्सीने फिरणं आलंच. त्यातच रिक्शा आणि टॅक्सीने प्रवास करायचा तर खासकरून रिक्शा टॅक्सी चालक आणि प्रवासी यांच्यातली भांडणं आपण दररोज ऐकत असतो किंवा वाचत असतो. कधी आपल्याही वाट्याला असे प्रसंग येतात. आपलंही त्यावेळेस डोकं फिरतं, मात्र काही काळ गेला की आपण शांत होतो आणि मग इतरांना त्याचा कसा त्रास होतोय हे वाचतो आणि सोडून देतो. मात्र एका व्यक्तीने त्याला आलेल्या वाईट अनुभवातून योग्य तो धडा घेतला आणि त्यापासून प्रेरणा घेत त्याने चक्क कोट्यावधी रुपयांचं साम्राज्य उभं केलं. ऐकून थोडं विचित्र वाटेल मात्र आयआयटी पदवीधर भावेश अग्रवाल यांचा हा अनुभव तुम्हालाही इंटरेस्टिंग वाटेल.


अनेकदा टॅक्सीचालक आपल्याला मनमानी भाडं सांगतात. आपण नाईलाज म्हणून ते भाडं देण्यासाठी तयारही होतो. आयआयटी पदवीधर भावेश अग्रवाल आपल्या कामानिमित्त असाच एकदा प्रवास करत असताना टॅक्सीचालकाशी त्यांचं भांडण झालं. भांडणाचं  प्रमुख कारण म्हणजे तो टॅक्सीचालक त्यांच्याकडून जादा भाड्याची मागणी करत होता. 


मात्र हे भांडण झाल्यावर त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं नाही तर देशात लो बजेट फेअर कॅब सर्व्हीसची किती नितांत गरज आहे हे त्यांनी ओळखलं. घरी आल्यावर त्यांनी आपला प्लान कुटुंबाला सांगितला. मात्र ‘आयटीत भरघोस पगाराची नोकरी असताना हे काय मध्येच?’ अशी कुटुंबाची भूमिका होती. भावेश मात्र आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी आपली योजना पूर्णत्वास न्यायची असा चंग बांधला. त्यांना त्यांच्या या बिझनेस प्लानमध्ये त्यांचा मित्र अंकीत भाटी यांची साथ मिळाली आणि मग काय, या दोघांनी मिळून बंगळूरूत ‘ओला’ या टॅक्सी व्यवसायाची सुरूवात केली.


त्यांनी कायम एक खूणगाठ मनाशी पक्की केली होती की काहीही झालं तरीही प्रवाशांना सर्वोच्च सेवा उपलब्ध करून द्यायची. लो फेअर कॅब सर्व्हिसची मुहूर्तमेढ तिथेच रोवली गेली आणि देशात प्रवाशांना आरामदायी आणि खिशाला परवडणारी अशी ‘ओला’ सेवा मिळाली. आज आपल्यापैकी प्रत्येकानं किमान एकदा तरी स्मार्टफोनवरून ही कॅब बुक करून त्याचा आनंद घेतला असेलच.

किती आहे ओला कॅबचं नेटवर्थ?

ओलैा कॅबच्या नेटवर्थबद्दल बोलायचं झाल्यास हा आकडा आजमितीला 4.8 अब्ज डॉलर्स म्हणजेच 39 हजार 832 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.याशिवाय आता कंपनीने ओला इलेक्ट्रिकल्सच्या नावाने सुरू केलेल्या इ टू व्हिलरलाही पसंती मिळतेय. आज याही कंपनीचं नेटवर्थ साधारणपणे 2 हजार 400 कोटी रुपयांच्या घरात पोहोचलं आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button