अती विचाराच्या रोगापासून दूर राहा
जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विजडम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे अती विचाराच्या रोगापासून दूर राहा…
एक पालक त्यांच्या ३२ वर्षीय अविवाहित पदवीधर मुलीला घेऊन एक सायकॉलॉजिस्टला भेटायला गेले. कुटुंब सुशिक्षित मध्यमवर्गीय होतं; पण अतिविचारामुळे मुलीचं नोकरी, व्यवसायाचं सोडा, पण लग्नाचं वयसुद्धा निघून गेलं होतं. त्या सायकॉलॉजिस्टनं त्यांना विचारलं की, ‘इतके वर्ष का नाही आलात भेटायला?’ तर म्हणाले, ‘आम्ही विचार करत होतो जाऊया की नको.’
जगामध्ये जे लोक यशस्वी आहेत, त्यांच्यात आणि अयशस्वी लोकांत शारीरिक, बौध्दिकदृष्ट्या कोणताही फरक नसतो; फरक असतो तो फक्त विचार करण्याच्या पध्दतीमध्ये. ओव्हर थींकिंगमुळे त्या मुलीने आयुष्यातील शिक्षण, नोकरी, व्यवसाय व विवाह अशा २०हून अधिक संधी सोडल्या होत्या. कधी नोकरीचे ठिकाण दूर आहे, पगार कमी आहे, कंपनी चांगली आहे का? व्यवसायात फायदा होईल का? व्यवसाय सेट झाल्यावर लग्न झाल्यानंतर काय उपयोग? सासरचे चांगले असतील का? मुलगा थोडा सावळाच आहे, उंची बसत नाही, आई वडील वयस्कर आहेत, ननंद जरा भांडखोर दिसते असे काहीही अतिविचारी व वेडपट विचार असल्यामुळे आज ३२ वय झाले, तरी लग्न झाले नव्हते. आता सर्व कुटुंबालाच वेड लागायची वेळ येऊन ठेपली आहे.
ज्यांना कुणाला असा ओव्हर थींकिंगचा प्रॉब्लेम आहे, तो लवकर ओळखा, कारण हा पूर्ण आयुष्य बरबाद करणारा खतरनाक विषाणू आहे. याचे सर्वात पहिले लक्षण म्हणजे कोणत्याही गोष्टीला फाटे फोडणे, इतरांना मत विचारणे व त्यावर पुन्हा विचार करणे, नकारात्मक गोष्टींवर जास्त विचार करणे. याचे दुष्परिणाम म्हणजे कोणत्याही अंतिम निर्णयापर्यंत न पोहचणे, त्यामुळे कोणतीही ॲक्शन न घेणे, गोष्टी उगीचच अवघड करणे, सतत भीतीच्या भावनेत राहणे, आत्मविश्वास कमी कमी होत जाणे, डिप्रेशन वाढणे, शारीरिक थकवा वाढणे व हे अती व सतत काही महिने होत राहिल्यास जीवन निरुत्साही होऊन मनोरुग्ण होण्याचीही शक्यता असते.
ज्याला आयुष्यात उद्योजक व्हायचे आहे, यशस्वी व्हायचे आहे, श्रीमंत व्हायचे आहे, त्याने अतिविचाराच्या रोगापासून दूर रहावे. जे काही करायचं आहे, त्याचा थोडा विचार करा, निर्णय घ्या, झटपट कामाला लागा. हातात काम असेल, तर विचार करायला वेळ मिळत नाही. विचार करत बसला की, हाताला काहीही मिळत नाही, मग आयुष्यभर सुशिक्षित बेकार ही पदवी कायम राहते. त्यामुळे अतिविचार करणे टाळा. काय ते लवकर निर्णय घ्या, ठरवा आणि कामाला लागा. स्वत:चे व इतरांचे डोके खाऊ नका. नाहीतर आयुष्यभर बेकारी व अविवाहितपणा तुमच्या नशिबी नक्कीच आहे. म्हणून रतन टाटा म्हणतात, ‘निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय घेणे, हे सुध्दा कधीकधी अधिक बरोबर ठरते. मी आधी निर्णय घेतो, मग तो खरा ठरवतो.’
तुम्हाला आहे का अशी अतिविचार करायची सवय? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारच्या अनेक गोष्टीतून आयुष्याचे आणि उद्योजकतेचे धडे गिरवण्यासाठी वेबसाईटला भेट देत रहा.
आणखी वाचा
- तुम्ही ज्यांच्या सहवासात असता तसेच तुम्ही बनता…
- यश मिळवण्यासाठी कल्पकता व शांत डोक पाहिजे
- दृष्टीकोन’ बदला आयुष्य बदलेल
- अती विचाराच्या रोगापासून दूर राहा
- फक्त तुम्हीच स्वतःमध्ये बदल घडवू शकता
खूपच छान
हा प्रॉब्लेम मलाही आहे
तरी उपाय सुचवावा