उभारी देणारं असं काहीप्रेरणादायी

ना घरच्यांचा आधार, ना समाजाची मदत तरीही उभा केला करोडोंचा व्यवसाय… 

आपण भारतीय म्हणून एकत्रितपणे जगात भारताचा झेंडा फडकावण्याच्या तयारीत आहोत आणि म्हणूनच इथे आपापसात असलेल्या स्पर्धेला जागा नाही. भातातील अनेक महिला सध्या उद्योजकतेच्या मार्गावर यशस्वीपणे मार्गक्रमण करीत आहेत, पैकी झिवामेच्या सर्वेसर्वा म्हणजेच रिचा कर यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. रिचा कर या केवळ यशस्वी उद्योजिका आहेत म्हणून त्यांचा प्रवास जाणून घ्यावा का? नाही! रिचा यांनी सुरु केलेला व्यवसाय कोणत्या क्षेत्रातील आहे, हा प्रवास खडतर का होता, त्यांनी किती खस्ता खाल्ल्या आहेत हे समजून घेण्यासाठी त्यांचा प्रवास जाणून घेतला पाहिजे. 

रिचा कर: बालपण आणि शिक्षण

रिचा कर यांचा जन्म १७ जुलै १९८० रोजी झारखंडमधल्या जमशेदपूर या शहरात झाला. इतर मध्यमवर्गीय घरांप्रमाणेच रिचा यांचे वडील नोकरी करायचे, तर आई घर सांभाळत असे, मात्र तरीही हे कुटुंब शिक्षणाचे महत्व जाणून होतं आणि रिचावर देखील हेच संस्कार करण्यात आले. परिणामी लहानपणापासूनच रिचाला शिक्षणाप्रती आदर वाटायचा आणि म्हणूनच त्यांनी BITS पिलानीमधून पदवी मिळवली. शिक्षण पूर्ण झाल्यावर रिचा यांनी अभियांत्रिकी कंपनीमध्ये सॉफ्टवेअर ऍनालिस्ट (Software Analyst) म्हणून कामाला सुरूवात केली. नोकरी पत्करली असली तरीही नेहमीच त्यांच्या मनात Out of the Box जाऊन नाव कमावण्याची इच्छा होती. इतरांप्रमाणे ९ ते ६ काम करून खुश होणाऱ्यांपैकी त्या नव्हत्या आणि म्हणूनच नोकरीसोबत त्यांनी NMIMS मधून MBAची पदवी मिळवली. ही पदवी मिळवल्यानंतर अपेक्षित अनुभव देखील मिळवला. व्यवसाय म्हणजे काय? व्यवसाय कसा करावा? व्यवसाय करताना कोणते धोके येऊ शकतात? अशी बरीच महत्वाची माहिती मिळवून जन्म झाला तो झिवामेचा (Zivame)

झिवामेचा खडतर प्रवास:

झिवामेचा प्रवास इतरांपेक्षा खडतर का? कारण झिवामे हा ब्रँड महिलांसाठी बनणाऱ्या अंडरगार्मेंन्ट्सची (Undergarments) ऑनलाईन विक्री करतो. समाज कितीही बदलला असला तरीही काही बदल जोपर्यंत प्रत्येक माणूस मनापासून  समजून आणि उमजून करत नाही तोपर्यंत समाज बदलणार नाही. अंडरगार्मेंन्ट्स म्हटलं की, उगाच शरमेने आपण त्याबद्दल बोलायचे बंद होतो आणि विशेषकरून महिलांच्या अंडरगार्मेंन्ट्स बद्दल कुठेही चर्चा केली जात नाही. अशा प्रकारच्या सामाजिक चौकटीत रिचा यांनी मात्र सर्व बंधनं तोडून पुढे जाण्याचा विचार पक्का केला होता. 

२००० रुपये उधार घेऊन सुरू केला व्यवसाय आज आहे २६०००० कोटींची कंपनी 1 1

व्यवसाय म्हटलं की किती पैसे गुंतवले जाणार? गुंतवलेली रक्कम परत मिळेल का? व्यवसाय यशस्वी होईल का? असे प्रश्न उपस्थित केले जातात मात्र रिचा कर यांनी सुरु केलेल्या व्यवसायासमोर असलेली प्रश्नपत्रिका वेगळीच होती. समाजाने या व्यवसायावर प्रश्नचिन्ह उभं करण्याआधीच त्यांच्या घरून आणि दुर्दैवाने त्यांच्या आईकडूनच सर्वात अगोदर या व्यवसायाला नावं ठेवण्यात आली. “मी काय माझी मुलगी ब्रा विकते असं सांगायचं का?” असं म्हणत त्यांनी मुलीच्या स्वप्नांना बळ द्यायच्या जागी उलटं मागे खेचलं. मुलगी समाजाच्या चौकटीबाहेर जात काही तरी वेगळं करू पाहतेय यासाठी तिचं कौतुक करण्याच्या जागी आईकडून लोकं काय बोलतील यावरच जोर देण्यात आला. कुठल्याही मुलीसाठी तिची आई ही आधारस्तंभ असते. असं म्हणतात दोन महिलांचं आपापसात कधीही पटत नाही, मात्र या उक्तीला फोल ठरवणारं एकमेव नातं असतं ते म्हणजे  आई आणि मुलीचं नातं. रिचा कर यांची आईच त्यांच्या विरोधात उभी असल्याने व्यवसायाच्या सुरुवातीलाच त्यांच्यासमोर कष्टांचा डोंगर उभा ठाकला होता. 

घरातील अडचणी बाजूला सारायचं म्हटलं, तर उंबरठ्याबाहेर देखील अडचणींची भली मोठी रांग लागली होती. भारतात त्यावेळी महिलांच्या अंडरगारमेंट्ससाठी अशाप्रकारचं ऑनलाईन पोर्टल (Online Portal) असू शकतं अशी कल्पना सुद्धा जन्माला आली नव्हती. एकतर या कपड्यांची खरेदी करताना महिला बऱ्यापैकी दुकानात सुद्धा शरमतात आणि या परिस्थितीत अशा कपड्यांची ऑनलाईन विक्री होत असल्याची बातमी अनेकांच्या पचनी पडत नव्हती. महिलांसाठी अंडरगारमेंट्सची खरेदी सोपी व्हावी आणि समाजातील ही  पोकळी भरून निघावी म्हणून रिचा प्रयत्न करीत होत्या. अडचणी भले अनेक होत्या तरीही दृढ आत्मविश्वासाच्या जोरावर रिचा कर यांनी २५ ऑगस्ट २०११ पासून झिवामेच्या नावाने इ-कॉमर्स (E-Commerce) प्लॅटफॉर्मवरून व्यवसाय सुरु केला. 

झिवामेने गाठलेली उंची:

सुरुवातीला ज्या व्यवसायाला अनेकांकडून हिणवण्यात आलं किंवा उपेक्षा करण्यात आली तोच व्यवसाय आज दरवर्षी नवीन शिखरं काबीज करतोय. रिचा कर यांच्या व्यवसायाची उलाढाल आज  जवळपास २७० कोटी रुपयांच्या घरात आहे. भारतातील प्रत्येक पिनकोडवर डिलिव्हरी देण्यात हा व्यवसाय सक्षम आहे आणि दर दिवशी या प्लॅटफॉर्मला भेट देणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढतेय. झिवामेकडून अत्ताच्या घडीला ५००० लॉन्जरी स्टाईल (Lingerie Styles), ५० ब्रँड आणि १००० विविध साईझेस उपलब्ध आहेत. 

एवढंच नाही तर झिवामेमध्ये लवकरच महिलांसाठीचे कपडे, फिटनेस वेअर आणि स्लीपवेअर समाविष्ट करण्यात येणार आहे. .जो व्यवसाय कधी एकेकेकाळी समाजाच्या चौकटीत बसत नव्हता आज त्याच व्यवसायाचा ग्राहकववर्ग या समाजाचा भाग आहे आणि म्हणून  ग्राहकांच्या  मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या रिचा यांचा अभिमान वाटतो. 

आपली मुलगी किंवा सून जो व्यवसाय करू पाहतेय त्यामुळे आपण समजत तोंड दाखवू शकणार नाही अशा विचारसरणीच्या वातावरणातून उमलू पाहणाऱ्या रिचा इतरांना कायम प्रेरणा देत राहतील. परिवाराचा किंवा समाजतील कोणाचाही आधार नसताना रिचा यांनी केवळ स्वतःच्या मेहनत आणि जिद्धीच्या बळावर अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक गरजेसाठी वेळप्रसंगी त्यांनी स्वतःची जमापुंजी पणाला लावली होती. वर्ष २०१५-१६ मध्ये त्यांना ५४ कोटी रुपयांचं नुकसान सोसावं लागलं होतं तरीही त्या खचून गेल्या नाही. अशा कठीण काळात सुद्धा केवळ ग्राहकांवर विश्वास ठेऊन त्या नेहमी पुढे जात राहिल्या. रिचा त्यांच्या आत्तापर्यंतच्या व्यवसायाबद्ल बोलताना सांगतात की, “ आपण जर का एखादी चांगली गोष्ट करत असू, तर कुणालाही काहीही सिद्ध करून दाखवण्याची गरज नसते. तुम्ही प्रयत्न करत राहा आणि नंतर तुमच्या योग्यतेची साक्ष स्वतः देव देईल.” वर्ष २०१७ मध्ये रिचा कर यांनी कंपनीमधून CEO पदाचा राजीनामा दिला, मात्र तरीही त्या कंपन्यांच्या संचालक मंडळाच्या सदस्या आहेत आणि त्यांची नेट वर्थ ७४९ रुपयांच्या आसपास आहे. कंपनीच्या आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये घडलेला सर्वात मोठा बदल म्हणजे वर्ष २०२० मध्ये रिलायन्स रिटेलकडून झिवामेचा ताबा मिळवण्यात आला होता. 

आणखीन वाचा:

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button