बिझनेसमध्ये पार्टनर गरजेचा आहे का? | Why is a partner necessary in business?
व्यवसाय म्हटलं की अनेक गोष्टी आल्या. प्रत्यक्षात व्यवसाय सुरू करण्याच्या आधीही बरीच पूर्वतयारी गरजेची असते. बिझनेस आयडियापासून ते प्रत्यक्षात व्यवसाय सुरू करेपर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय एक व्यावसायिक म्हणून आपल्याला घ्यावे लागतात.भांडवल, कच्चा माल, यंत्रं, कर्मचारी, ग्राहक, बाजारपेठ, बँका अशा अनेक घटकांचा समावेश करून त्यांच्या साहाय्याने व्यवसाय उभा राहतो. या सर्वांच्या बरोबरीने व्यवसायातील अतिशय महत्त्वाचा असणारा एक घटक म्हणजे आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्याबरोबर व्यवसाय करायला व सर्व आघाड्यावर तोंड द्यायला तयार असणारा आपला व्यावसायिक भागीदार अर्थात आपल्या व्यवसायाचा बिझनेस पार्टनर होय.
बिझनेस पार्टनर निवडताना काय काळजी घ्यावी?
- व्यवसायात भागीदार असावाच का?
- असला तर तो का असावा?
- नसला तर तो का नसावा?
पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणे चांगले नसल्याचा सल्ला अनेक अनुभवी लोकांनी दिला आहे. तरीसुध्दा पार्टनर घ्यावाच का?
असे अनेक प्रश्न व्यवसायिकाला पडू शकतात. खरंतर बिझनेसमध्ये पार्टनर असणे गरजेचे आहे का, हे बिझनेसच्या प्रकारावर आणि त्याच्या गरजांवर अवलंबून असते; परंतु या सगळ्यात एक महत्त्वाची बाब म्हणजे व्यवसायात पार्टनर न घेता फार मोठे संघटन तुम्हाला उभे करता येत नाही. एकटा व्यक्ती फक्त एक प्रोप्रायटर होऊ शकतो. त्याची मजल पुढे जाऊन एकल व्यक्ती कंपनी (One Person Company – OPC) पर्यंतच जाऊ शकते आणि भारतात कायदा असे सांगतो की, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप अथवा पब्लिक लिमिटेड कंपनी स्थापन करण्यासाठी एकापेक्षा जास्त व्यक्तींची गरज आहे.
प्रोप्रायटर किंवा एकल व्यक्ती कंपनी फार मोठी Growth करू शकत नाही. त्यामुळे मोठा व्यवसाय करायचा असला, तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा एलएलपी सुरू करणे गरजेचे ठरते. त्यानंतरच बँका व इतर कंपन्या आपल्यासोबत (अर्थात कंपनीसोबत) मोठे व्यवहार करायला तयार होतात. म्हणून आपल्याला मोठा व्यवसाय करायचा असेल तर पार्टनर हा घ्यावाच लागेल; कारण ती व्यवसायाची गरज आहे. काहीजण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करताना घरातील व्यक्तींची (विशेष करून बायको अथवा नवरा, भाऊ, आई, वडील, मुलगा) नावे व्यवसायात सहभागी करतात. जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. मात्र अशा कंपनीत केवळ नावालाच असणारे डायरेक्टर (संचालक/पार्टनर) काही काम करू शकत नाहीत किंवा कंपनीच्या वाढीसाठी प्रयत्न करत नाहीत, कारण त्यांना काम कसे करायचे हे माहिती असतेच असे होत नाही. त्यामुळे फायदा जरी घरातच राहिला, तरी कंपनी मोठी होत नाही. त्यामुळे हा फायदा व व्यवसायाचा विस्तार कमी प्रमाणात असतो.
त्याउलट एखादा अनुभवी काम करणारा संचालक (तो घरातला नसला तरीही) पार्टनर म्हणून घेतला, तर कंपनीची वाढ मोठ्या प्रमाणात होऊ शकते, कारण तो प्रत्यक्ष आपल्या कामांनी कंपनीच्या वाढीसाठी प्रयत्न करतो. त्यामुळे फायद्याचे वाटे झाले, तरीसुध्दा चांगले उत्पन्न मिळते. कंपनी झपाट्याने वाढल्यामुळे अनेक ग्राहक जोडले जातात. गुणवत्तेचा पार्टनर घ्यायचा की, केवळ नावालाच पार्टनर घेऊन स्वतः काम करायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. कारण आपण स्वतः किती काम करू शकतो हे आपल्यालाच चांगले माहिती असते.
पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करण्याचे काही फायदे:
1) नवीन कौशल्यं :
पार्टनरमुळे तुमच्या जोडीला नवीन कौशल्यं आणि अनुभव मिळतात, ज्यामुळे कामकाज अधिक प्रभावीपणे आणि उत्तम पद्धतीने पार पाडले जाऊ शकते.
2) भांडवल वाढ :
पार्टनरमुळे आर्थिक गुंतवणुकीचा भार एकट्याच्या खांद्यावर न येता, तो दोन किंवा अधिक लोकांमध्ये विभागला जातो.
3) निर्णय घेण्यात मदत :
पार्टनरमुळे निर्णय घेण्यात वेगवेगळी मतं आणि दृष्टीकोन मिळतात, ज्यामुळे योग्य निर्णय घेणे सोपे होते
4) Networking :
प्रत्येक पार्टनरकडे त्याच्या स्वतःच्या व्यावसायिक संपर्कांचे जाळे असते, जे बिझनेसला नवीन ग्राहक, सप्लायर्स किंवा इतर व्यवसायिक संधी मिळवून देऊ शकते.
5) जोखीम वाटप :
पार्टनरमुळे बिझनेसची जोखीम अनेकांमध्ये वाटली जाते, त्यामुळे जोखीम कमी होते. आर्थिक नुकसान किंवा बिझनेसच्या अडचणींमध्ये सर्व पार्टनर्स एकत्र येऊन त्या समस्येचा, अडथळ्यांचा सामना सोबतीने करू शकतात.
व्यवसाय मोठा करायचा म्हटलं की, पार्टनर हा घ्यावाच लागतो, कारण कायद्याने ते बंधनकारक आहे. मग तो पार्टनर नावापुरताच असावा की, प्रत्यक्ष काम करणारा असावा याबाबत जरी कायद्याने कोणतेही बंधन घातले नसले, तरी पार्टनरला फायद्यातील वाटा हा ठरल्याप्रमाणे तुम्हाला द्यावाच लागतो.
दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी की, कंपनीचे मालक म्हणून कंपनीत येणारा सगळा नफा घरी न्यायचा नसतो किंवा कंपनी तोट्यात चालायला लागली म्हणून घरातील सगळ्या गोष्टी दाव्यावर लावून कंपनीबरोबर स्वतःचे वाटोळेदेखील करून घ्यायचे नसते ही पक्की खूणगाठ प्रत्येक व्यावसायिकाने स्वत:च्या मनात बांधून ठेवली पाहिजे. तुम्ही जरी कंपनीचे मालक असलात तरी तुमचा पगार आधी ठरवा. तेवढेच पैसे महिन्याच्या शेवटी सर्व कर्मचाऱ्यांच्या पगाराबरोबर आपल्या घरी न्या. तुमच्या पार्टनरलासुध्दा हेच नियम लागू करा. ही विचारांची स्पष्टता जर तुमच्यात आणि तुमच्या पार्टनरमध्ये असेल तरंच ही व्यवसायातील भागीदारी दीर्घकाळ टिकेल व व्यवसाय मोठा होईल.
जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर आताच Whatsapp वर शेअर करा. 😊
आणखी वाचा
- तुम्ही धंदा कोणता करता याला महत्त्व नाही, तो कसा करता याला महत्त्व आहे!
- बिझनेस मध्ये दिखावा नको, तर प्लानिंग हवी
- कमी भांडवलात जास्त टर्नओव्हर कसा करायचा?