Vandana Luthra: २०,००० रुपयांतून सुरू केलेल्या व्यवसायाचं २५०० कोटी रुपयांचं साम्राज्य

स्वप्नांना सत्यात उतरवण्याची मेहनत, चिकाटी आणि जिद्द आवश्यक असते ,असं आपण नेहमीच ऐकत आलो आहोत,आणि वंदना लुथरा यांचा यशस्वी प्रवास हे याच गोष्टींचं उत्तम उदाहरण आहे. त्यांच्या प्रवासाने हे सिद्ध करून दाखवलं आहे की, एक स्त्री जी कुटुंबातील जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही, तिच्या परिश्रमाने VLCC सारख्या मोठ्या कंपनीचं साम्राज्य उभं करू शकते. त्यांच्या संघर्षाची, जिद्दीची आणि चिकाटीची कहाणी आज लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
आजच्या लेखात आपण वंदना लुथरा यांच्या संघर्ष, जिद्द आणि चिकाटीच्या माध्यमातून उभं केलेल्या यशस्वी व्यवसायाचा प्रवास जाणून घेणार आहोत.
प्रारंभिक जीवन आणि प्रेरणा
वंदना लुथरा (Vandana Luthra) यांचा जन्म १२ जुलै १९५९ रोजी दिल्लीमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांच्या आई, डॉ. अरुणा सप्रू, या एक समाजसेविका होत्या आणि गरीब, वंचित लोकांसाठी काम करत होत्या. त्यांनी ‘अमर ज्योती‘ नावाची एक आयुर्वेदिक संस्था स्थापन केली, जी गरजूंसाठी मदतकार्य करत होती . या समाजसेवेचा वंदनांच्या मनावर खोल परिणाम झाला आणि लहानपणापासूनच लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा त्यांना आपल्या आईकडून मिळाली.
वंदना लुथरा यांना शाळेत असतानाच सौंदर्य, आरोग्य आणि फिटनेस या क्षेत्रांची विशेष आवड होती. या क्षेत्रात काहीतरी मोठं करण्याची त्यांची मनोमन इच्छा होती. मात्र, त्या काळात महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करणं आव्हानात्मक होतं . तरीही, वंदनाने कधीही हार न मानता आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याचा निर्धार केला.
दिल्ली विद्यापीठातून समाजशास्त्रात पदवी घेतल्यानंतर वंदनाने भारतात पोषण आणि कॉस्मेटोलॉजीबाबत असलेल्या उदासीनतेची जाणीव केली. यासाठी त्या पुढील शिक्षणासाठी जर्मनीला गेल्या. तिथे त्यांनी पोषणशास्त्र आणि कॉस्मेटोलॉजीचं सखोल शिक्षण घेतलं. जर्मनीत शिक्षण घेत असताना त्यांनी आरोग्य आणि वेलनेस क्षेत्राचं महत्त्व ओळखलं आणि भारतात या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला.
व्यवसायाची सुरूवात
वंदना लुथरा यांनी १९८९ साली भारतात परतल्यावर केवळ २०,००० रुपयांच्या भांडवलावर दिल्लीत VLCC (वंदना लुथरा कर्ल्स अँड कर्व्स) ची स्थापना केली. सुरुवातीला वजन कमी करण्याच्या उपचारांवर लक्ष केंद्रित करताना, त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आधुनिक उपकरणांचा वापर करून लोकांच्या आरोग्याला प्राधान्य दिलं .सुरुवातीला दिल्लीच्या सफदरजंग एन्क्लेव्हच्या गजबजलेल्या बाजारात पहिले सेंटर सुरू करताना त्यांनी अनेक आव्हानांचा सामना केला, पण त्यांच्या दृष्टिकोनामुळे लोकांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी ठरल्या.
VLCC ने वजन कमी करण्याच्या वैज्ञानिक पद्धतींबरोबर सौंदर्य सेवांची भर टाकून ग्राहकांची मने जिंकली. वेलनेस क्षेत्रात ग्लॅमरच्या पलीकडे जाऊन त्यांनी आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन दिलं . कठोर परिश्रम, नावीन्य, आणि उच्च गुणवत्तेमुळे VLCC आज एक मोठे नाव बनलं आहे, ज्याने देशभरातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपलं स्थान निर्माण केलं आहे.
सुरुवातीचे आव्हान आणि संघर्ष
वंदनाला सुरुवातीला त्यांच्या व्यवसायासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ९० च्या दशकात महिलांसाठी व्यवसायात यश मिळवणं अत्यंत कठीण होतं. समाजाच्या पुरुषप्रधान मानसिकतेमुळे, त्यांची कल्पनाही लोकांना आवडत नव्हती, आणि त्यातच डॉक्टरांनी सुद्धा त्यांच्या पद्धतीला पाठिंबा देण्यास नकार दिला. मात्र वंदनाने हार मानली नाही, कारण त्यांचा विश्वास खूप दृढ होता.त्यांनी त्यांच्या कामामध्ये सातत्य ठेवलं. त्यांचं ध्येय होतं एक असा व्यवसाय तयार करणं, जो वैद्यकीय दृष्टिकोनातून कार्यरत राहील, पण त्यासाठी वेळ लागणार होता.
सुरुवातीला ग्राहक मिळवणं देखील त्यांच्यासाठी मोठं आव्हान होतं. पण त्या कधीही मागे ह्टल्या नाहीत . सतत मेहनत करत राहिल्या आणि आपल्या कल्पनांना प्रगल्भतेच्या दिशेने आकार देत राहिल्या . त्यांच्या या परिश्रमांमुळे त्यांनी एक नवा मार्ग तयार केला. याचा परिणाम त्यांच्या व्यवसायातील गुणवत्तेचा आणि कार्यपद्धतीचा विश्वास ग्राहकांमध्ये वाढला, ज्यामुळे त्यांना यश मिळण्यास सुरुवात झाली
यशाच्या शिखरावर
१९९० च्या दशकात VLCC चं नाव हळूहळू लोकप्रिय होऊ लागलं. २००० च्या दशकात, VLCC चा वार्षिक महसूल ५० कोटींवर पोहोचला. ग्राहक त्यांच्या उच्च दर्जाच्या सेवांसाठी अधिक पैसे देण्यास तयार होऊ लागले. २००५ मध्ये “जस्सी जैसी कोई नहीं” या मालिकेतील नायिका जस्सीचं मेकओव्हर केल्यानंतर VLCC चं नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचलं आणि ब्रँड अधिक चर्चेत आला.
२००५ पासून VLCC ने आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार सुरू केला. आज VLCC १२ देशांमध्ये कार्यरत आहे . २००९ मध्ये Shine या प्रसिद्ध कंपनीने VLCC मध्ये १४.४ कोटींची गुंतवणूक केली, ज्यामुळे कंपनीचा महसूल १२५ कोटींवर पोहोचला. त्यानंतर VLCC ने २०१० मध्ये भारतात आणि भारताबाहेर १०० सेंटर्स सुरू केले आणि महिलांना ब्युटी उद्योजक होण्यासाठी प्रशिक्षण देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला.

सप्टेंबर २०१३ मध्ये VLCC ने सिंगापूरमधील Gvig कंपनीचा ताबा घेतला आणि सौंदर्यप्रसाधनांच्या उत्पादन क्षेत्रात पाऊल ठेवलं . त्यानंतर त्यांच्या हरिद्वार आणि सिंगापूर येथील GMP सर्टिफाइड प्लांट्समधून स्किन, केस आणि बॉडी केअर उत्पादने तयार होऊ लागली. 2023 पर्यंत, VLCC ने २१० सेंटर्स, १०० प्रशिक्षण संस्था आणि ११ देशांमध्ये विस्तार केला आहे .
पुरस्कार आणि सन्मान
२०१० मध्ये वंदना यांना ‘एंटरप्राइझ एशिया वुमन आंत्रप्रेन्योर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं,, तसेच २०१३ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाला. २०१६ मध्ये फोर्ब्स आशियाच्या “५० पॉवर बिझनेसवुमन” यादीत त्यांचं स्थान मिळवणं हे त्यांच्या यशाचं प्रतीक आहे.
वंदना लुथरा यांनी महिलांच्या सशक्तीकरणावर विशेष लक्ष दिलं. आज VLCC मध्ये ७०% कर्मचारी महिला आहेत. त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन आणि आत्मनिर्भर बनवून, त्यांनी महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. या उपक्रमामुळे फक्त महिलांची आर्थिक स्थितीच सुधारली नाही, तर कंपनीला देखील अधिक यश प्राप्त झालं.
मित्रांनो ,वंदना लुथरा यांचा संघर्ष आणि यशाचा हा प्रवास आपल्यला शिकवतो की, मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वास असला की कोणतंही स्वप्न शक्य पूर्ण करता येतं . आणि सोबतच त्यांचा हा प्रवास आपल्याला दाखवतो की, सुरुवात कितीही छोटी असली तरी प्रामाणिक प्रयत्नांनी मोठं यश नक्कीच मिळवता येतं.
आणखीन वाचा:
- मुंबईची झोपडपट्टी ते दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीय
- ५,००० रुपये उसने घेऊन उभारली १७,००० कोटींची कंपनी: पी. रामचंद्रन यांचा संघर्ष आणि “उजाला” साम्राज्य.
- इडली विक्रेता ते पंचतारांकित हॉटेलांचा मालक- विठ्ठल कामत