उद्योजकताबिझनेस महारथी

इडली विक्रेता ते पंचतारांकित हॉटेलांचा मालक- विठ्ठल कामत

विठ्ठल कामत यांचे वडील व्यंकटेश कामत सुरुवातीला डिश वॉशर म्हणून काम करायचे. हे काम करत असताना सतत त्यांना वाटायचं की, आपलं स्वतःचं एक हॉटेल असावं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत केली, रात्रंदिवस काम केले आणि अखेरीस 1952 मध्ये त्यांनी सत्कार हे पहिले हॉटेल उभे केले. हे हॉटेल उभे करण्यासाठी व्यंकटेश कामत यांनी आपल्या पत्नीचे दागिने गहाण ठेवले आणि व्यवसायाची उभारणी केली. हळूहळू व्यवसाय वाढू लागला. धंद्यात यश येऊ लागलं. सगळं काही आनंदात चालू होत. या अश्या आनंदाच्या वातावरणातच 1956 साली विठ्ठल कामत यांचा जन्म झाला. लहानपणापासून विठ्ठल कामत अभ्यासात हुशार होते, नवीन गोष्टी करण्यात त्यांना रस होता. अभ्यासात हुशार असणाऱ्या विठ्ठल यांनी 1973 साली मुंबईच्या रॉबर्ट मनी हायस्कूलमधून आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.

विठ्ठल यांच्या आईला नेहमी वाटायचं की, त्यांनी वडिलांना हॉटेलमध्येच मदत करावी, मात्र त्यांना इंजीनियर व्हायचं होतं. त्यांनी इंजीनियरिंगची पदवी मिळवली. इकडे वडिलांचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढतच होता. वडिलांनी दोन चांगली हॉटेल उभी केली होती. मात्र अपयशाशिवाय यश मोठं वाटत नाही म्हणतात. प्रत्येकाच्या आयुष्यात अपयश, संकटं ही येतच असतात, जवळच्याच एका व्यक्तीने फसवणूक करून विठ्ठल यांच्या वडिलांचे हॉटेल हिसकावले. त्यात त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. अश्यावेळी त्यांच्याकडे असलेले दुसरे म्हणजेच सत्कार हॉटेलही असेच लुबाडले जाईल, या भीतीने विठ्ठल यांनी वडीलांसोबत काम करायचे ठरवले. त्यांचा हा निर्णय त्याच्या आई-वडिलांना देखील खूप आवडला. हेच होते विठ्ठल यांचे हॉटेल व्यवसायातले पहिले पाऊल. व्यवसाय कसा वाढेल यासाठी विठ्ठल काम करू लागले. त्यांनी मुंबईत ‘विठ्ठल कामत’ या नावाने अनेक हॉटेल्सची साखळीच उभी केली.

Vitthal Kamat 1
203742984 transformed
The orchid hotel pune

त्यांनी इतकं अफाट यश मिळवलं खरं पण ‘ऑर्किड’ च्या उभारणीवेळी त्यांच्या डोक्यावर कर्जाचा देखील बलाढ्य डोंगर उभा राहिला. या कर्जाच्या ओझ्यामुळे हॉटेल बंद करण्याची वेळ आली होती. तब्बल 282 कोटी रुपयांपर्यंत कर्ज वाढलं होतं. आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या ते खचले होते, आता पुढे काय होईल? पैश्यांची जोडणी कशी करता येईल? या विचाराने ते बैचेन झाले होते आणि अशातच त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार डोकावू लागले, मात्र एका दृश्यामुळे त्यांना संकटांना हरवण्याची प्रेरणा मिळाली. एका इमारतीच्या २३ व्या मजल्यावर एक पेंटर काहीही सुरक्षाकवच नसताना भिंत रंगवत होता आणि भिंत रंगवून झाल्यावर तो सुरक्षित खाली देखील उतरला, “जर तो पेंटर जीवघेणी जोखीम घेऊ शकतो तर मग मी नक्कीच परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो.” या विचाराने त्यांनी परिस्थितीशी दोन हात केले आणि शेवटी संकटांना हरवून दाखवले. 

ही झाली विठ्ठल कामत यांची व्यावसायिक बाजू. पण विठ्ठल कामत हे एक बहुरंगी, बहुढंगी, बहूआयामी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे पर्यावरणावर देखील खूप प्रेम. हे विश्व, ही सृष्टी सदा हिरवळ आणि झाडा-झुडूपांनी तसेच प्राण्यांनी समृद्ध असावी असा त्याचा मानस आहे. यासाठी ‘पाथरे गाव’ सारख्या डोंगराळ भागात त्यांनी औषधी वनस्पतींची लागवड केली. मुंबईतील अनेक उद्यान दत्तक घेत शहर प्रदूषण विरहित बनवण्यास सहाय्य केले. ६० लाखांहून अधिक झाडे लावली. १०० पेक्षा जास्त टेकड्यांचे त्यांनी औषधी आणि स्थानिक झाडांमध्ये रुपांतर केले. पक्षीशास्त्रज्ञाच्या पेशाने त्यांनी ‘ऑर्किड’ हॉटेल जवळ पोपट गल्ली देखील तयार केली. तिथे नानाविविध प्रकारचे  पोपट, इतर काही पक्षी पाहायला मिळतात, त्याबरोबर ओडिसा येथील “चिल्का सरोवर” येथे डॉल्फीन ऑबझर्वेटरी सेंटर”ची स्थापना केली. ऑर्किड हॉटेल, मुंबई आणि किल्ले जाधवगड येथे आई या नावाचे संग्रहालय देखील त्यांनी उभे केले. तिथे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू ठेवून पर्यावरणाला पूरक असा उपक्रम कामतांनी यशस्वी करून दाखवला.

1701685706 SR27CH creative1 88 1
The Orchid Jamnagar

विठ्ठल कामत यांचा हॉटेल व्यवसाय आज संपूर्ण जगभर पसरला आहे. त्यांना आजवर ११० हून  अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. यामध्ये इंडियन एक्सप्रेसचा सर्वोत्कृष्ट सीईओ उद्योग पुरस्कार, त्यानंतर दलाई लामा यांच्याकडून मिळालेला गोल्डन पीकॉक पुरस्कार, २०१० मध्ये ग्रीन हॉटेलीयर पुरस्कार,  राजीव गांधी पुरस्कार, २०१२ मध्ये जर्मनचा जीवनगौरव पुरस्कार अश्या अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. विठ्ठल कामत हे  ‘हॉटेल आणि रेस्टॉरेट असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष आहेत. या व्यतिरिक्त अनेक शैक्षणिक, औद्योगिक समितीवर सल्लागार म्हणून ते आपले काम करतात.

हॉटेल इंडस्ट्री मध्ये मराठी माणूस यशस्वी होऊ शकतो किंवा उद्योजक बनू शकतो असं क्वचित पहायला मिळतं, परंतु आज बरीच वेगवेगळी मराठी लोकं उद्योजक बनण्याचा किंवा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतात. अशांसाठी विठ्ठल कामत यांनी आपली हॉटेल इंडस्ट्रीमधील कारकीर्द आणि उद्योजक म्हणून यशस्वी केलेल्या वाटचालीचा संपूर्ण प्रवास त्यांच्या ‘इडली ऑर्किड आणि मी’, ‘उद्योजक होणारच मी’ आणि यश, अपयश आणि मी  या पुस्तकांच्या माध्यमातून उद्योजकांपर्यंत पोहोचवला आहे.

हा लेख विडीयो मध्ये पहा

आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button