जाणून घ्या विमा क्षेत्रातील डिजिटल क्रांतीचे शिल्पकार वरुण दुआ यांचा प्रवास | Acko General Insurance

यश मिळवायचं असेल; तर जिद्द, मेहनत आणि योग्य दिशा असणं गरजेचं असतं. जिद्द मेहनतीला साथ देते, तेव्हा कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येतं. भारतीय विमा क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवणारे अग्रगण्य युवा उद्योजक वरुण दुआ हे या गोष्ट्टीचं उत्तम उदाहरण आहेत. पारंपरिक विमा क्षेत्रातील जटिल प्रक्रिया सोप्या आणि सुलभ करण्याचं त्यांनी स्वप्न पाहिलं. त्यांच्या दूरदृष्टीमुळे विमा घेण्याची संकल्पना आणि प्रक्रिया संपूर्ण बदलली.
ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी Acko General Insurance या पूर्णतः डिजिटल विमा कंपनीची स्थापना केली. पारंपरिक विमा कंपन्यांमध्ये अनेक टप्पे, कागदपत्रांची आवश्यकता आणि वेळखाऊ प्रक्रिया असते. याउलट, Acko ने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विमा प्रक्रिया सुलभ केली. ग्राहकांना जलद आणि पारदर्शक सेवा मिळावी यासाठी कंपनीने डिजिटल माध्यमातून थेट विमा पॉलिसी देण्याचा निर्णय घेतला.
वरुण दुआ यांचा प्रवास संघर्ष, नाविन्य आणि चिकाटीने भरलेला आहे. त्यांनी कठोर परिश्रम, नवकल्पना आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विमा क्षेत्रात नवी क्रांती घडवली. चला, त्यांच्या जीवनप्रवासाचा आणि उद्योजकीय यशाचा आढावा या लेखातून घेऊया.
प्रारंभिक जीवन आणि शिक्षण
वरुण दुआ यांचा जन्म १९८१ मध्ये दिल्लीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील चंदर मोहन दुआ हे सरकारी कंपनीत अधिकारी होते, तर आई रश्मी दुआ या सरकारी शाळेच्या प्राचार्या होत्या. शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या या कुटुंबात वरुण यांना लहानपणापासूनच नवीन गोष्टी शिकण्याची आवड होती, ज्यामुळे त्यांचा अभ्यासात चांगला सहभाग असायचा.
त्यांचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतील वांद्रे-जुहू परिसरातील शाळेत झालं. पुढे त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली आणि त्यानंतर MICA (Mudra Institute of Communications, Ahmedabad) मधून मार्केटिंग आणि कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. या शिक्षणामुळे त्यांना मार्केटिंग आणि ब्रँडिंग यांचं सखोल ज्ञान मिळालं, जे त्यांना पुढे विमा क्षेत्रात नवे प्रयोग करण्यासाठी उपयोगी ठरलं.
करिअरची सुरुवात
MICA मधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर वरुण दुआ यांनी आपल्या करिअरची सुरुवात Leo Burnett या जगप्रसिद्ध जाहिरात कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून केली. त्यांच्या कुटुंबाला नेहमीच त्यांच्यासाठी स्थिर आणि सुरक्षित नोकरी हवी होती, म्हणूनच त्यांनी सुरुवातीला नोकरी करण्याचा निर्णय घेतला. मार्केटिंग आणि ब्रँडिंग क्षेत्रातील आपल्या ज्ञानाचा उपयोग करत त्यांनी पुढे टाटा AIG लाइफ इन्शुरन्स आणि फ्रँकलिन टेम्पलटन इन्व्हेस्टमेंट्स यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम केलं. या कंपन्यांमध्ये काम करत असताना त्यांना विमा उद्योगातील कार्यपद्धती, ग्राहकांच्या गरजा आणि उद्योगाच्या मर्यादा यांची सखोल माहिती आणि समज मिळाली.

या अनुभवातून त्यांना लक्षात आलं की विमा खरेदी प्रक्रिया अत्यंत जटिल, वेळखाऊ आणि पारदर्शकतेच्या अभावामुळे ग्राहकांसाठी त्रासदायक आहे. अनेक ग्राहकांना विमा पॉलिसी समजण्यात अडचण येत होती, तर काहींना क्लेम प्रक्रिया खूप वेळ घेणारी आणि कठीण वाटत होती. ही समस्या सोडवण्यासाठी काहीतरी नवीन आणि ग्राहकांसाठी सुरळीत प्रक्रिया निर्माण करणं गरजेचं होतं. म्हणून त्यांनी परंपरागत विमा उद्योगाला डिजिटल युगाशी जोडण्याचा संकल्प केला आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा दृढ निश्चय केला.
व्यवसायाची सुरुवात आणि सुरुवातीचा संघर्ष
२०१६ मध्ये वरुण दुआ यांनी ACKO General Insurance ची स्थापना केली. ही भारतातील पहिली पूर्णतः डिजिटल विमा कंपनी आहे. “शून्य कमिशन, शून्य कागदपत्रे” या संकल्पनेने सुरू झालेल्या ACKO ने “फुल पैसा वसूल” या मोहिमेच्या माध्यमातून लोकांचं लक्ष वेधून घेतलं.
ACKO ने विमा क्षेत्रात एक नवा बदल घडवला. पारंपरिक विमा कंपन्यांच्या जटिल आणि वेळखाऊ प्रक्रियांमुळे ग्राहकांना अडचणी येत होत्या. मात्र, ACKO ने डिजिटल आणि सोपी विमा सेवा उपलब्ध करून हे आव्हान सोडवलं. मोठ्या खर्चाशिवाय, त्यांनी परवडणाऱ्या आणि सहज समजणाऱ्या विमा पॉलिसी ग्राहकांसाठी तयार केल्या. AI आणि डेटा-ड्रिव्हन तंत्रज्ञानाचा वापर करून, त्यांनी विमा मंजुरी आणि क्लेम प्रक्रिया जलद आणि पारदर्शक केली.
ACKO ने ओला, अमेझॉन, रेडबस, बायजूस यांसारख्या मोठ्या ब्रँडसोबत भागीदारी करून विमा सेवा अधिक सोपी केली. त्यांच्या उत्तम ग्राहक सेवेमुळे, ACKO भारतातील युनिकॉर्न कंपन्यांपैकी एक बनली आहे. आज ACKO फक्त वाहन आणि आरोग्य विमाच नाही, तर जीवन विमाही प्रदान करते, त्यामुळे ग्राहकांचा विश्वास आणि कंपनीचा विस्तार सातत्याने वाढत आहे.
ACKO चा यशस्वी प्रवास
ACKO ने आपल्या अभिनव दृष्टिकोनामुळे कमी वेळात मोठं यश मिळवलं. २०१८ मध्ये IRDAI कडून अधिकृत परवानगी मिळवल्यानंतर, कंपनीने वेगाने विस्तार केला. २०२१ मध्ये $२५५ मिलियन गुंतवणूक फंड उभारून, त्यांनी डिजिटल विमा क्षेत्रात आपलं स्थान अधिक मजबूत केलं. या यशामुळे २०२४ मध्ये ACKOचे मूल्यांकन $१.१ अब्ज डॉलर्स (सुमारे ९,००० कोटी रुपये) ओलांडले आणि कंपनीने भारतातील टॉप युनिकॉर्न स्टार्टअप्समध्ये स्थान मिळवलं.
ACKO चे संस्थापक वरुण दुआ यांनी २०२३ मध्ये शार्क टँक इंडिया या प्रसिद्ध रियॅलिटी शोच्या सीझन ३ मध्ये परीक्षक म्हणून सहभाग घेतला. अनेक तरुण उद्योजकांना त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांना आर्थिक मदतही दिली. त्यांची व्यवसायवाढीतील दूरदृष्टी आणि ग्राहक-केंद्रितता ACKO च्या यशाचा मुख्य आधार आहे.
आणखीन वाचा:
- मुंबईची झोपडपट्टी ते दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीय
- ५,००० रुपये उसने घेऊन उभारली १७,००० कोटींची कंपनी: पी. रामचंद्रन यांचा संघर्ष आणि “उजाला” साम्राज्य.
- इडली विक्रेता ते पंचतारांकित हॉटेलांचा मालक- विठ्ठल कामत