उद्योजकताप्रेरणादायीबिझनेस महारथी

Shiv Nadar Success Story | केवळ लाखभर रुपये गुंतवून सुरु केलेला व्यवसाय आज पोहोचलाय सात समुद्रापार

या जगात वावरणाऱ्या कुणालाही मेहनतीशिवाय फळ मिळालेलं नाही, त्यामुळे जर का कुणाच्या यशाकडे पाहत अचंबित होत असाल, तर त्यामागे असणाऱ्या खडतर वाटचालीकडे सुद्धा नक्कीच लक्ष द्या. आज आम्ही देखील अशाच एका खेडेगावातून आलेल्या बिझनेस महारथीची गोष्ट तुमच्यासमोर उलगडून दाखवणार आहोत… 

शिव नादर : जन्म आणि शिक्षण

तुम्ही HCL Technologies या कंपनीबद्दल ऐकून आहात का? याच कंपनीचे मालक म्हणजे शिव नादर, ज्यांचा जन्म १४ जुलै १९४५ रोजी तामिळनाडू मधल्या तुतीकुडी जिल्ह्यातील मूलयपोजी नावाच्या एका छोट्या गावात झाला. दक्षिण भारतातील एका लहानशा गावात मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले शिव नादर हे आत्ताच्या घडीला भारतीय  IT क्षेत्रातील दिग्गजांपैकी एक बनले आहेत. बालपणापासूनच शिक्षणाची आवड असलेल्या शिव नाडार यांनी शिक्षणात बाजी मारत इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची (Electrical and Electronics Engineering) पदवी मिळवली. पदवी मिळवल्यानंतर आपण जसं नोकरी करण्याचा निर्णय घेतो, त्याप्रमाणेच  शिव नाडार यांनी देखील नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणि वयाच्या २२व्या वर्षी पुण्यातील वालचंद ग्रुप ऑफ इंजिनियरिंगमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. 

नोकरी ते व्यवसायाचा प्रवास:

अनेकवेळा आपण एखादं काम करत असतो, मात्र त्यात खुश असत नाही किंवा आपल्या इच्छा-आकांशा पूर्ण न झाल्याने केलेल्या कामातून म्हणावा तसा आनंद मिळत नाही. शिव नाडार यांच्या बाबतीतही काही अंशी असंच घडलं. त्यांना नेहमीच स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची तीव्र इच्छा होती. जेव्हा आपण मनात तीव्र इच्छा बाळगतो तेव्हा कितीही खडतर प्रवास करण्याची, मेहनत घेण्याची आपली तयारी असते. शिव नाडार याच विचारसरणीचे असल्याने कामाच्या अनुभवाची पुंजी सोबत घेऊन त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय पक्का केला. या प्रवासात त्यांना काही मित्रांची सोबत लाभली जे देखील चौकटीच्या बाहेर जात  काहीतरी वेगळं करण्याच्या विचारात होते. समविचारी माणसांनी एकत्र येणं हा त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला आणि वर्ष १९७६ मध्ये पाच मित्रांनी सोबत येऊन मायक्रोकॉम्प नावाची कंपनी उभारली, ही कंपनी त्या काळात कॅल्क्युलेटर विकण्याचे काम करायची. 

काही वर्षांच्या मेहनतीनंतर याच कंपनीचं  रूपांतर हिंदुस्थान कम्प्युटर्स लिमिटेडमध्ये (Hindustan Computers Limited) करण्यात आलं, ज्याला आपण HCL Technologies म्हणून ओळखतो. काही कारणास्तव त्यावेळी IMB सारख्या दिग्गज कंपनीला भारतातून काढता पाय घ्यावा लागला होता आणि हीच संधी नादरआणि समूहासाठी महत्वाची ठरली. व्यावसायिकाचे सर्व गुण घेऊन जन्मलेल्या नादर यांनी मिळालेल्या संधीचं सोन्यात रूपांतर केलं आणि IMB च्या अनुपस्थितीमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढली. केवळ १,८७,ooo रुपयांच्या गुंतवणुकीमधून सुरु झालेल्या HCL ला पुढे राज्य सरकारकडून २० लाख रुपयांची आर्थिक मदत पुरवण्यात आली आणि बदल्यात सरकारने कंपनीचा २६ टक्के वाटा मिळवला. 

वर्ष १९७८ मध्ये HCL कडून पहिला वाहिला पर्सनल कंप्युटर (Personal Computer/ PC) बाजारात आणण्यात आला आणि हा अनोखा बदल संपूर्ण बाजारपेठेसाठी महत्वाचा ठरला. HCL Technologies यशाची शिखरं काबीज करत असतानाच शिव नादर यांनी फार इस्ट कम्प्युटर्स (Far East Computers) नावाची आणखीन एक कंपनी सुरु करत आंतराष्ट्रीय व्यवसायाचा श्रीगणेशा केला. १९८० मध्ये याच कंपनीच्या माध्यमातून नाडार सिंगापूरमध्ये IT Hardware विकायचे. तुम्हाला माहिती आहे का त्यावेळी फक्त एक वर्षाच्या व्यवसायातून शिव नादर यांच्या कंपनीचे मूल्य ३ कोटी रुपयांवर जाऊन पोहोचले होते. देशात आणि परदेशात नाव कमावत असलेल्या नादर यांनी इथून मात्र कधीच मागे वळून पाहिलं नाही. वर्षांची  मेहनत आणि कष्टांच्या जोरावर त्यांनी  जागतिक पातळीवरील ‘फोर्ब्स’ (Forbes) च्या यादीत अनेकवेळा नाव पटकावलं. शिव नादर यांची मेहनत आणि सोबत असेल्या मंडळींची साथ यामुळे आज HCL ला केवळ एक कंपनी म्हणून नाही, तर ब्रँड म्हणून ओळखलं जातं.

फोर्ब्सच्या यादीनुसार शिव नादर हे भारतातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती असून त्यांची एकूण संपत्ती ३३.६ बिलियन डॉलर्सच्या घरात पोहोचली आहे. आशिया खंडात श्रीमंत व्यक्तींमध्ये नादर यांचा ९ वा, तर जागतिक स्तरावर ४५ वा क्रमांक लागतो म्हणूनच शिव नादर हे नाव आज केवळ भारताच्या व्यावसायिक क्षेत्रातच नाही, तर जगभरात पसरलं आहे. तसेच त्यांच्या नेतृवाखाली HCL ने जगभरातील ४४ विविध देशांमध्ये विस्तार केला आहे. कैक वर्ष मेहनत केल्यानंतर काही काळापूर्वीच त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र ते नेहमी म्हणतात की, “प्रत्येक माणसाने लक्ष ठरवण्यासाठी स्वप्न पाहिलं पाहिजे, कारण स्वप्न  पाहिल्याशिवाय लक्ष ठरवता येत नाही आणि ज्याने लक्षच ठरवलेलं नाही, तो यश संपादन करू शकत नाही.” नादर हे अध्यक्षपदावरून बाजूला झाल्यानंतर आता त्यांची मुलगी रोशनी नादर-मल्होत्रा कंपनीच्या अध्यक्षपदाची जवाबदारी सांभाळते, तसेच शिव नादर हे आजही व्यवस्थापकीय संचालक म्हणून कायम कार्यरत आहेत. 

शिव नादर यांनी लहानपणी हलाखीचे दिवस सोसले होते, घरची आर्थिक परिस्थिती काही खास चांगली नव्हती.  मात्र कधीही त्यांनी स्वतःच्या परिस्थितीला दोष दिला नाही, याउलट सतत मेहनत करत परिस्थितीवर मात करण्याची जिद्ध उराशी बाळगली. शिक्षण घेत असताना त्यांना अनेक  हालअपेष्टा सोसाव्या लागल्या तरीही खचून न जाता एका शाळेतून दुसऱ्या शाळेत बदली करत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण संपलं तरीही समोर उभी ठाकलेली आव्हानं काही संपण्याचं नाव घेत नव्हती. हलाखीच्या परिस्थितीशी दोन हात करत इथवर आल्यांनतर, नोकरीमधून काहीशी रक्कम मिळायची. मात्र मिळणाऱ्या पैशांकडे दुर्लक्ष करत स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेणं देखील सोपं नव्हतं. सर्वात महत्वाचं म्हणजे त्याकाळात भारतात कम्प्युटर्स बद्दल अधिक माहिती उपलब्ध नव्हती,लोकांना माहिती नसलेल्या वस्तूची विक्री करणं आणि स्पर्धात्मक वातावरणात नवख्या माणसाने व्यवसाय सुरु करणं  ही वाटते तेवढी साधी आणि सोपी गोष्ट नाही. 

शिशिव नादर यांचे सामाजिक कार्य:

अझीझ प्रेमजी, कुमार मंगलम बिर्ला, मुकेश अंबानी यांच्यासोबत शिव नादर यांना आधुनिक भारतातील एक दानशूर व्यक्ती म्हणून ओळखलं जातं, कारण या दिग्गज उद्योगपतीने नेहमीच स्वतःजवळ असलेली धनाची पुंजी गरजू माणसांसाठी खुली केली आहे. विद्याज्ञान, शिव नादर युनिव्हर्सिटी, शिव नादरस्कुल, किरण नादर म्युझियम ऑफ आर्टस् अशा एक ना अनेक माध्यमांमधून त्यांनी समाजापर्यंत वेळोवेळी मदत पोहोचवली आणि म्हणूनच हुरून इंडिया फिलोनत्रोफीच्या (Hurun India Philanthropy List) यादीत शिव नाडर यांचं नाव पाहायला मिळतं. एवढंच नाही तर आत्तापर्यंत त्यांनी शिव नादर फाउंडेशनतर्फे शिक्षण तसेच आरोग्य क्षेत्रांना आर्थिक मदत पोहोचवून महत्वपूर्ण योगदान दिलं आहे. 

आणखीन वाचा:

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button