प्रेरणादायी

ध्येयासाठी झपाटून जा

शाळेत असताना मराठीच्या पेपरमध्ये 5 मार्कांसाठी व्याकरणाचे काही प्रश्न दिलेले असायचे. वर्तमानकाळाचे भविष्यकाळात रूपांतर करा किंवा भविष्यकाळाचे भूतकाळात, वर्तमानकाळात रूपांतर करा. प्रश्नपत्रिकेतला काळ उत्तरपत्रिकेत बदलता येऊ शकतो, मात्र वास्तविक जीवनातला काळ ना पुढे नेता येतो, ना मागे आणता येतो.

प्रत्येकालाच आपण का जगतोय आणि कशासाठी जगतोय हे प्रश्न पडलेच पाहिजेत, कारण त्यामुळेच आपल्याला आपल्या जीवनाचे मर्म कळू शकते. आपलं नशीब बदलण्याची धमक प्रत्येकामध्ये असते, मात्र त्यासाठी तुमच्या मनात प्रचंड इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे. एका महाकाय पर्वताच्या टोकावर एक 40-50 वर्षाचा सद्गृहस्थ पर्वत सर करण्याच्या उद्देशाने जातो. थंडी, वारा, ऊन, पाऊस कश्या-कश्याचीही पर्वा न करता तो तो पर्वत पार करतो आणि काही दिवसानंतर सुखरूप पायथ्याशी येतो. पायथ्याशी असलेले सर्वजण अचंबित होतात. ते म्हणतात,  “अरे तुला माहीत नाही का या पर्वतावर कोणीच जावू शकत नाही, मग तू कसं काय गेलास.” त्यावर तो गृहस्थ म्हणतो, मला ही गोष्ट माहीतच नव्हती आणि म्हणून मी गेलो. आणि बघा यशस्वी झालो. आयुष्यात यश मिळवत असताना जशी प्रोत्साहन देणारी माणसं असतात, तशीच निरुत्साहित करणारी लोकंदेखील असतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर पुढे गेलं पाहिजे. ओम शांती ओम सिनेमात शाहरूख खानचा एक फेमस डायलॉग आहे, ‘अगर आप किसी चीज को पुरी शिद्दत से चाहते हो, तो पूरी कायनात उसे आपसे मिलाने की साजिश मे जुड जाती है.”

प्रत्येकामध्ये आपले आयुष्य बदलून टाकण्याचे सामर्थ्य असते, फक्त त्याला याची जाणीव नसते. गाडीला ५ गियर असतात, जर योग्यवेळी योग्य गियर टाकला तरच गाडी वेगाने पळू शकते. बाकीचे 4 गियर असूनसुद्धा आपण जर पहिल्याच गियरवर गाडी चालवत असू, तर निश्चितच गाडी पुढे जाऊ शकणार नाही. बऱ्याचदा आपल्या बाबतीतही तसेच होते. घोड्याप्रमाणे झापडं लावून तुम्ही काम केलं, तर नक्कीच तुम्हीसुद्धा तुमचे ध्येय गाठू शकाल, कारण शेवटी यश किंवा अपयश हे केवळ आपल्याच हातात असतं.       

रेसकोर्सवर घोड्यांच्या तबेल्यात काम करणाऱ्या एका मजुराचा रॉबर्ट नावाचा एक मुलगा असतो. त्याची नववीची परीक्षा चालू असते. एकेदिवशी वर्गशिक्षिका अचानक वर्गात येतात आणि सगळ्या विद्यार्थ्यांना उद्देशून त्या म्हणतात, “मुलांनो “माझे स्वप्न” या विषयावर निबंध लिहा. निबंध मनापासून आणि तुमच्या खऱ्या-खुऱ्या स्वप्नावर लिहा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, याच निबंधावर तुमचा यावर्षीचा निकाल अवलंबून आहे. त्यामुळे निबंध व्यवस्थित आणि विचार करून लिहा. सगळे जण अगदी मन लावून निबंध लिहीत असतात. पेपर जमा करण्याची वेळ येते. घंटा वाजते, पेपर जमा करून सगळे आनंदाने घरी जातात. काही दिवसांनी निकालाचा दिवस येतो. सगळे विद्यार्थी वर्गात उपस्थित असतात. सगळ्यांच्या मनाला धाकधूक लागलेली असते, मला मार्क चांगले पडले असतील ना? मी पास झालो असेल ना? असे अनेक प्रश्न मनात डोकावत असतात. मात्र केवळ रॉबर्टच्या चेहऱ्यावर स्मितहास्य झळकत असतं, कारण आपण निबंध चांगला लिहिलाय त्यामुळे आपण पास होणारच याचा त्याला विश्वास असतो. सगळ्यांचा रिजल्ट जाहीर होतो. वर्गातली सगळी मुलं पास होतात, मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्याला स्वतावर विश्वास असतो, तो रॉबर्ट नापास होतो. ज्या चेहऱ्यावर हास्य खुललेलं होतं, तो चेहरा अचानक चिंताग्रस्त होतो. त्याला काहीच कळत नाही.

तो तडक शिक्षिकेच्या केबिनमध्ये जातो आणि त्यांना म्हणतो, ‘मॅडम, कदाचित तुम्ही माझा पेपर व्यवस्थित तपासला नसेल, कृपया तुम्ही परत चेक करता का? बहुदा चुकून तुम्ही….”

शिक्षिका त्याला मध्येच थांबवत म्हणतात. “अरे चुकून नाही मी पेपर बघूनच तुला नापास केलं. अरे वेड्या तू निबंध काय लिहिलास, तुझं तुला तरी माहिती आहे का? मी रेसकोर्सचा मालक बनेल. २००-३०० घोडे माझ्याकडे असतील, अनेक कामगार माझ्या हाताखाली असतील, मी करोडपती बनेल. अरे हे शक्य आहे का? माणसाने झेपतील अशी स्वप्न बघावी. हे बघ अजूनही वेळ गेली नाही. तू तुझा निबंध बदल, दुसरा निबंध लिहून दे. मी रिजल्ट बदलते.”

त्यावर रॉबर्ट म्हणाला, “नाही मॅडम, तुम्ही तुमच्या खऱ्या स्वप्नावर निबंध लिहायला सांगितला होता, मी तो लिहिलाय आणि मी माझ्या स्वप्नावर ठाम आहे, मी माझे स्वप्न पूर्ण करणारच.”

त्यावर बाई म्हणाल्या, “ठीके, आता तूच ठरव निबंध बदलून पुढच्या वर्गात जायचं की, इथेच बसायचं ते.”

त्यावर रॉबर्ट तो रिजल्ट घेतो आणि रागारागाने निघून जातो.

काही वर्षांनी त्याच शिक्षिका एका मोठ्या रेसकोर्सवर विद्यार्थ्यांची सहल घेऊन जातात. रेसकोर्सचा तरुण मालक अगदी आदराने त्यांचे स्वागत करतो. स्वतः पूर्ण रेसकोर्स त्यांना फिरून दाखवतो आणि त्यांना दुपारच्या जेवणासाठी देखील आग्रह करतो. त्याने केलेला तो कळकळीचा आग्रह त्या शिक्षिका स्वीकारतात आणि विद्यार्थ्यांना घेऊन डायनिंग हॉलमध्ये जातात. त्या हॉलच्या एका भिंतीवर एक फ्रेम अडकवलेली असते. कुतुहलाने त्या शिक्षिका त्या फ्रेमजवळ जातात. त्यात फ्रेमकडे बघतात आणि आश्चर्याने म्हणतात, “अरे या सर्टिफिकेटवर तर माझीच स्वाक्षरी आहे. कोणाचं सर्टिफिकेट आहे हे? रॉबर्ट! अरे हा तर माझाच विद्यार्थी! तुमच्या इथे काम करतो का तो? जरा बोलवा त्याला.”

त्यावर रेसकोर्सचा तो तरुण, उमदा मालक त्यांच्यासमोर जातो आणि म्हणतो मॅडम मीच तो तुमचा विद्यार्थी, रॉबर्ट. मॅडम शॉक झाल्या. त्यावर रॉबर्ट म्हणाला मॅडम, “त्यावेळी जर मी तुमचं ऐकून स्वप्न बदललं असतं, तर कदाचित शाळेच्या परीक्षेत पास झालो असतो; मात्र जीवनाच्या परीक्षेत नापास झालो असतो.”  

मित्रांनो, तुम्हाला खरंच एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर स्वस्थ बसू नका. त्यामुळे ध्येयासाठी झपाटून जा. जर तुम्हाला अगदी मनापासून आणि तीव्रतेने वाटत असेल की, ही गोष्ट मला मिळवायचीच आहे आहे, तर नक्कीच ती तुम्ही मिळवाल.”

हा लेख विडीयो मध्ये पहा

आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button