भारतीय नारी, भल्याभल्यांवर भारी! भारताची ही ‘ट्रॅक्टर क्वीन’ आहे 23 हजार कोटींची मालकीण – मल्लिका श्रीनिवासन
आज महिला कोणापेक्षाही कमी नाहीयेत. महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात प्रगती करताना दिसत आहेत. एवढंच काय तर, अनेक महिला अशाही आहेत, ज्यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडून कुटुंबाच्या व्यवसायात एन्ट्री केली आणि जगात डंका वाजवला. या महिलांमध्ये मल्लिका श्रीनिवासन यांच्या नावाचाही समावेश होतो. मल्लिका या अशा भारतीय महिला आहेत, ज्या १० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त महसुलासह जगातील तिसऱ्या सर्वात मोठ्या ट्रॅक्टर निर्मात्या बनल्या आहेत. चला तर, त्यांनी एवढा लांबचा पल्ला कसा गाठला आणि त्यांची वैयक्तिक संपत्ती किती आहे? या सर्वांचा आढावा घेऊयात…
भल्याभल्यांना लाजवेल अशी कामगिरी करून दाखवणाऱ्या मल्लिका श्रीनिवासन (Mallika Srinivasan) या भारताचे अब्जपती आणि TVS मोटर्सचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन यांच्या पत्नी आहेत. त्यांनी आपल्या प्रचंड मेहनतीच्या जोरावर ट्रॅक्टर्स अँड फार्म इक्विपमेंट म्हणझेच टॅफे (TAFE) कंपनीला यशाच्या शिखरावर पोहोचवले आहे. इतकेच नाही, तर त्यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे की, महिलादेखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून यश मिळवू शकतात.
मल्लिका श्रीनिवासन या देशातील त्या निवडक महिला उद्योजकांपैकी एक आहेत, ज्यांनी आपली वेगळी छाप सोडली आहे. त्यांच्या या कामगिरीमुळेच त्यांना ‘ट्रॅक्टर क्वीन’ म्हणूनही ओळखले जाते. त्या देशातील दुसऱ्या आणि जगातील तिसऱ्या सर्वात मोठ्या ट्रॅक्टर उत्पादक ब्रँड टॅफेच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि चेअरमन आहेत. टॅफे हा ब्रँड मोठा होण्यात मल्लिका यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यांनी या कंपनीला तंत्राची जोड दिली आणि कंपनीला यशाच्या पायऱ्या चढण्यात मदत केली. आजघडीला कंपनीची वार्षिक उलाढाल ही १० हजार कोटींपेक्षाही जास्त आहे.
कौटुंबिक व्यवसायात कधी घेतली उडी?
सन १९५९मध्ये चेन्नई येथे जन्मलेल्या मल्लिका श्रीनिवासन या शालेय जीवनापासूनच अभ्यासात हुशार होत्या. त्यांनी मद्रास विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले होते. तसेच, यूएसए येथील पेन्सिल्वानिया विद्यापीठाच्या वॉर्टन स्कूलमधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले होते. परदेशातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर मल्लिका पुन्हा भारतात आल्या. त्यांनी आपल्या वडिलांच्या देखरेखीखाली १९८६मध्ये कौटुंबिक व्यवसायात उडी घेतली. या कंपनीची सुरुवात मल्लिका यांचे आजोबा एस अनंतरामाकृष्णन यांनी केली होती. त्या टॅफेच्या जनरल मॅनेजर म्हणून कंपनीशी जोडल्या गेल्या होत्या. जेव्हा त्यांनी कंपनीत प्रवेश केला, तेव्हापासूनच महत्त्वाचे बदल होण्यास सुरुवात झाली.
टॅफेचा प्रवास
ट्रॅक्टर्स अँड फार्म इक्विपमेंट (Tractors and Farm Equipment) म्हणझेच टॅफेची (TAFE) सुरुवात १९६०मध्ये चेन्नई येथे झाली होती. कंपनीची स्थापना जरी १९६०मध्ये झाली असली, तरीही यामध्ये महत्त्वाचे आणि मोठे बदल घडवून आणण्याचा विडा मल्लिका श्रीनिवासन यांनीच उचलला. त्यांनी कंपनीला तंत्राची जोड देऊन तिचा विस्तार केला. त्यामुळेच टॅफेचे प्रोडक्ट भारतीय शेतकऱ्यांची पहिली पसंत बनले आहेत. टॅफे ही ट्रॅक्टर बनवणारी जगातील तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनीकडे जवळपास १६०० डीलर्सचं नेटवर्क आहे. तसेच, कंपनी जगातील जवळपास १०० देशांमध्ये व्यापार करत आहे. एवढंच नाही, तर टॅफे फक्त ट्रॅक्टर बनवण्यापर्यंत मर्यादित राहिली नाहीये. ही कंपनी बॅटरी, डिझेल इंजिन, जेनेसेट, गियर पार्ट्स, पॅसेंजर व्हेइकल, हायड्रॉलिक पंप्स आणि फार्म मशिनरीही तयार करते.
कौटुंबिक व्यवसायाला मिळवून दिला फायदा
टॅफेला यशाच्या पायऱ्या चढण्यासाठी भाग पाडण्यात मल्लिका श्रीनिवासन यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्याच नेतृत्वाखाली टॅफेने फ्रेंच कंपनी फॉरेसियाला विकत घेण्यासाठी ४०० कोटींचा करार केला. त्यांनी कंपनीची क्षमता वाढवण्यासाठी अमेरिकन ऍग्रो कंपनी AGCO शी मिळून काम करण्यास सुरुवात केली. कंपनीने AGCOसोबत मिळून तुर्की येथेही आपला प्लान्ट सुरू करत जगातील अनेक भागात ट्रॅक्टर पोहोचवणे सुरू केले. कालांतराने व्यवसायाची व्याप्ती वाढवण्यासाठी टॅफेने अनेक कंपन्या आपल्यात जोडल्या. टॅफे कंपनीने आयशर लिमिटेडचे ट्रॅक्टर, इंजिन आणि गियर्स विभाग विकत घेतले. त्यामुळेच भारतात कृषी यंत्र व्यवसायात त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते.
पद्मश्री पुरस्काराने सन्मान
टॅफेच्या यशाचा डंका जगभरात गाजवल्यानंतर ६४ वर्षीय मल्लिका श्रीनिवासन यांना ‘ट्रॅक्टर क्वीन’ या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांना ट्रेड आणि इंडस्ट्रीतील यशामुळे जानेवारी २०१४मध्ये पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. त्या अशा निवडक महिलांपैकी एक आहेत, ज्यांचे नाव दिग्गज उद्योगपतींमध्ये घेतले जाते.
भारतातील ८३ व्या श्रीमंत व्यक्ती
प्रसिद्ध उद्योगपती असण्याव्यतिरिक्त मल्लिका श्रीनिवासन या एनजीसीओ, टाटा स्टील आणि टाटा ग्लोबल बेवरेजेस बोर्डाच्या सदस्या आहेत. तसेच, चेन्नईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) आणि हैदराबादच्या इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या (ISB) कार्यकारी बोर्डाच्याही सदस्या आहेत. त्यांनी अलीकडेच, स्विगी बोर्डातील स्वतंत्र संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. स्विगीची व्हॅल्यू ही जवळपास ६८९१८ कोटी रुपये इतकी प्रचंड आहे. तसेच, मल्लिका श्रीनिवासन यांच्या संपत्तीविषयी बोलायचं झालं, तर त्यांची एकूण संपत्ती २.८४ बिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास २३,६२५ कोटी रुपये आहे. अशाप्रकारे, फोर्ब्सनुसार त्या भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ८३व्या क्रमांकावर आहेत.
वाचक मित्रांनो, तुम्हाला हा लेख कसा वाटला, हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच, तुमच्या जवळच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा. याव्यतिरिक्त तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवरील लेख वाचायला आवडेल, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
आणखी वाचा
- जगातील सर्वात मोठ्या बँकेचे संस्थापक जे पी मोर्गन यांची कहाणी
- या माणसामुळे आपल्या घरापर्यंत वीज पोहचली- निकोला टेस्ला
- फोटोग्राफी क्षेत्रातला पहिला कॅमेरा बनवणारा अवलिया – जॉर्ज इस्टमन
- जगातील पहिली गाडी बनवणारा कार्ल बेंझ