मानसिक शांततेसाठी या सहा गोष्टी करून पाहाच!
चित्त स्थिर आणि शांत ठेवणं, दुसऱ्या समोर काहीतरी सिद्ध करण्याची भावना मनातून काढून स्वतःला आवडतील त्या गोष्टी करणं, हे सगळं आपण करतो का? आणि केलं तरी दिवसातून किती वेळ यासाठी आपण देतो? जर तुम्ही हा वेळ स्वतःला देत असाल तर चांगलीच गोष्ट आहे, पण जे देत नाहीत त्यांचं काय? मानसिक शांतता, आत्मिक सुख, समाधान या गोष्टीतरी कशा मिळतील? वाचण्यापुरत्या किंवा ऐकण्यापुरत्याच त्या मर्यादित राहणार नाहीत का? मित्रांनो रोजच्या या धावपळीत वरवरच्या भौतिक सुखांसाठी झगडतांना आपण आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडवून घेतो. हे स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजे ते आजच्या लेखात आपण पाहूया.
स्वतःची काळजी घ्यायला शिका
आपण नेहमी स्वतःच्या शरीराची आणि मनाची काळजी घेत आहोत का? याची खात्री करा. कारण इतर कामं करण्याच्या नादात आपण त्या कामांची किंवा इतरांची काळजी घेत असतो, पण स्वत:कडं मात्र दुर्लक्ष करत राहतो. स्वतःला वेळ देणं म्हणजे काय? तर शांत बसणं, आवडीची गाणी ऐकणं किंवा एखादा आवडीचा पदार्थ बनवणं. थोडक्यात काय तर ज्या गोष्टींतून तुम्हाला आनंद मिळतो, त्या गोष्टी करणं म्हणजे स्वतःला वेळ देणं.
वेळेचे नियोजन
जेव्हा तुम्ही दिवसाच्या कामांचे, आठवड्याच्या कामांचे नियोजन करता, तेव्हा तुमची कामं वेळेत होतात. शिवाय तुम्ही पूर्ण क्षमतेने काम करू शकता. जेव्हा कामं सुरळीत होत असल्याचं तुम्हाला दिसतं, तेव्हा तुमचा ताण कमी होऊन मानसिक शांतता लाभते. याउलट जेव्हा तुम्ही तुमच्या कामांचं योग्य नियोजन करत नाही, तेव्हा मात्र तुम्हाला मानसिक ताण येतो.
सतत शिका
तुम्हाला ज्या क्षेत्रात मोठं व्हायचं आहे आणि ओळख निर्माण करायची आहे ते क्षेत्र निवडा. तुमच्या कौशल्यांवर काम करा आणि ज्ञान वाढवा. पुस्तकं वाचा, ऑनलाइन अभ्यासक्रम घ्या, कार्यशाळेत सहभागी व्हा किंवा वेबिनारमध्ये भाग घ्या. या गोष्टी केल्याने तुमचं मन उत्साही राहील आणि नवीन संधीसुद्धा मिळतील.
ध्येय निश्चित करा
स्वतःसाठी काही स्पष्ट आणि साध्य करण्यायोग्य ध्येय सेट करा. त्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये divide करा आणि त्या दिशेने कार्य करण्याची योजना तयार करा. जर तुमच्याकडे निश्चित ध्येय नसेल, तर तुमच्या डोक्यात बिनकामाचे विचार येतील आणि यामुळे तुम्ही पुन्हा मानसिक शांततेपासून चार हात लांब राहाल.
सजगतेचा सराव करा
मागच्या लेखात पाहिल्याप्रमाणे तुमची सजगता वाढविण्यासाठी ध्यानाचा सराव करा. ध्यान हे सर्वात शक्तिशाली माध्यम आहे, जे तुम्हाला वर्तमानात जगायला शिकवते. जेव्हा तुम्हाला वाटेल की, आपण अतिविचार करायला लागलो आहोत, तेव्हा आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.
चांगली संगत ठेवा
तुम्हाला सहकार्य आणि प्रोत्साहन देणाऱ्या लोकांसोबत रहा. मित्र असो वा कुटुंब वैयक्तिक वाढीस प्रोत्साहन देणाऱ्या लोकांशी संपर्क ठेवा. नकारात्मक लोकांच्या सान्निध्यात राहून आपणही नकारात्मक विचार करायला लागतो आणि परिणामतः आपण आपली शांतता गमावून बसतो.
तर मित्रांनो जर या सहा गोष्टी तुम्ही नियमितपणे केल्या, तर नक्कीच मानसिक शांततेसाठी याचा फायदा तुम्हाला होईल.
आणखी वाचा
- तुम्ही ज्यांच्या सहवासात असता तसेच तुम्ही बनता…
- यश मिळवण्यासाठी कल्पकता व शांत डोक पाहिजे
- दृष्टीकोन’ बदला आयुष्य बदलेल
- अती विचाराच्या रोगापासून दूर राहा
- फक्त तुम्हीच स्वतःमध्ये बदल घडवू शकता
- निःस्वार्थ मदत हीच जगण्याची कला I Sunday Motivation
- सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो! Sunday Motivation
- स्वाभिमानाने जगायचे असेल तर आत्मविश्वास गरजेचा आहे
- ध्येयासाठी झपाटून जा | Sunday Motivation