निःस्वार्थ मदत हीच जगण्याची कला
जगात असे अनेकजण असतात जे आपल्या कृतीमुळे इतरांच्या लक्षात राहतात. आपल्या सर्वांना कसाब माहितीच आहे, ज्याने शेकडो निष्पाप लोकांचे प्राण घेतले. आणि करकरे, कामटे, साळसकर देखील माहिती आहेत, ज्यांनी अनेक लोकांचे प्राण वाचवले. त्यांचंच नाव अभिमानाने घेतले जातं जे परोपकारी वृत्तीने काम करतात. ना की, कारणं देत फिरतात, किंवा लोकांच्या वाईटाचं काम करतात.
उर्दूमध्ये एक वाक्य आहे, “खुदा भी अपने रहमतों की उस पर बरसात करता हैं, जो जरूरतमंद की मदत के लिए आगे बढ़ता हैं”
मित्रांनो आपल्याला हा सुंदर मानव जन्म मिळाला आहे आणि या जन्मात जर आपण दुसऱ्याच्या उपयोगाला नाही आलो, तर मग सगळंच व्यर्थ आहे. आज मी तुम्हाला जो प्रसंग सांगणार आहे तो आहे, १५ एप्रिल १९१२ रोजीचा. उत्तर अटलांटिक महासागरातला. टायटॅनिक जहाजाच्या विनाशकारी सागरी अपघाताचा.
२,२२४ प्रवासी आणि कर्मचाऱ्यांबरोबर निघालेल्या या बलाढ्य जहाजात १४ एप्रिलच्या मध्यरात्री अनेकांचा आक्रोश ऐकू येऊ लागला. हृदय पिळवटून टाकणाऱ्या किंकाळ्यांनी मन सुन्न झालं होतं. मात्र कोणतीच दैवी शक्ती टायटॅनिकला वाचवू शकत नव्हती. ज्यावेळी टायटॅनिक बुडत होतं, तेव्हा तीन जहाजे त्याच्या जवळपास होती. सॅम्पसन, कॅलिफोर्निया, कार्पेथिया.
सॅम्पसन टायटॅनिकपासून केवळ 7 किलोमीटर अंतरावर होते. त्या जहाजातील लोकांनी धोका दर्शविण्यासाठी टायटॅनिकवरून आकाशात उडवलेल्या दारूगोळ्यांना पाहिले, परंतु ते जहाज बेकायदेशीरपणे सीलची शिकार करत होते. जर टायटॅनिकच्या मदतीला गेलो, तर आपण पकडले जावू या विचाराने ते टायटॅनिकच्या उलट दिशेने निघून गेले. ते टायटॅनिकच्या गरजेला धावले नाहीत, कारण त्यांनी केलेल्या पापाच्या विचारात ते गढून गेले होते.
दुसरे जहाज कॅलिफोर्निया नावाचे होते. हे जहाज टायटॅनिक पासून केवळ १४ किलोमीटर अंतरावर होते. पण ते चोहोबाजूंनी हिमनगात वेढलेले होते. जहाजाच्या कॅप्टनने सुद्धा धोक्याचा इशारा बघितला, पण परिस्थिती अनुकूल नाही. आपणच हिमनगात अडकलोय. म्हणून त्याने परत जाण्याचा निर्णय घेतला आणि तो झोपी गेला.
“परिस्थिती योग्य नाही म्हणून मदत करू शकलो नाही” असं सांगण म्हणजे कारणं देणं, जबाबदारी झटकणं. असेल त्या परिस्थितीत स्वतःवरील संकटांशी दोन हात करून आपण इतरांना मदत केली, तरच ती निस्वार्थी भावनेने केलेली मदत म्हणता येईल.
तर तिसरं जहाज होतं कार्पेथिया. जे टायटॅनिकपासून तब्बल 58 किलोमीटर दूर दक्षिण दिशेने धावत होतं. त्यांनी रेडिओवर टायटनिक वरील हलकल्लोळ, रडणे, मदतीचा आक्रोश ऐकला. मन हेलावून टाकणारा तो आवाज ऐकून जहाजाच्या कॅप्टनने गुडघे टेकून ईश्वरचरणी प्रार्थना केली आणि मग पूर्ण वेगाने सभोवतालच्या पसरलेल्या हिमनगातून मार्ग काढत कार्पेथिया टायटॅनिकजवळ पोहोचले आणि त्या भयानक परिस्थितीत सुद्धा प्रयत्नांची शर्थ करून तब्बल ७०५ जणांचे प्राण वाचवून त्या प्रवाशांना कार्पेथियाने जणू नवा जन्मच दिला. त्यामुळे आपण कोणत्या जहाजाचा गुण अंगीकृत करायचा, ते आधी ओळखा आणि मग त्यानुसार पाऊलं टाका.
आपल्याला त्या चिमणीची गोष्ट माहितीच आहे, जिने जंगलात आग लागल्यावर कशाचीही पर्वा न करता, आपल्या छोट्याश्या चोचीतून कित्येक मैल अंतरावरून चोचीत पाणी नेऊन आग विझवण्याचा प्रयत्न करत होती. रस्त्यात तिला हत्ती भेटला. हत्ती तिला म्हणाला, “अगं, चिऊताई तुझ्या चोचीतल्या त्या एवढ्याश्या पाण्याने जंगल विझणार आहे का? कशाला उगाच धावपळ करतेस, सोड ते प्रयत्न.” त्यावर ती चिऊताई म्हणाली, “माझ्या प्रयत्नांनी जंगलातील आग विझेल की नाही माहित नाही, पण जेव्हा-केव्हा या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यांमध्ये नसून आग विझवणाऱ्यांमध्ये असेल आणि तेच माझ्यासाठी पुरेसं आहे.”
मित्रांनो, समाजात असे अनेकजण आहेत, जे दुःखी आहेत. त्यांचे तुम्ही अश्रू पुसा, ज्यांना मदतीची गरज आहे, अशांसाठी तुम्ही कर्णाचा ‘आहे ते देण्याचा’ गुण अंगी बाणवून घ्या. अडथळे आणि जबाबदारी टाळण्यासाठी कारणं नेहमी असतील, परंतु जी लोकं ती बाजूला सारून पुढे जातात, ती नेहमी जगाच्या हृदयात स्थान मिळवतात.
आणखी वाचा
- तुम्ही ज्यांच्या सहवासात असता तसेच तुम्ही बनता…
- यश मिळवण्यासाठी कल्पकता व शांत डोक पाहिजे
- दृष्टीकोन’ बदला आयुष्य बदलेल
- अती विचाराच्या रोगापासून दूर राहा
- फक्त तुम्हीच स्वतःमध्ये बदल घडवू शकता
- बारावीत नापास झालेला मुलगा बनला आयपीएस अधिकारी IPS Manoj Kumar Sharma