
भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयने 31 जानेवारी रोजी पेटीएमला मोठा धक्का दिला. आरबीआयने पेटीएमच्या अनेक सेवांवर बंदी घातली आहे. आरबीआयने कठोर आदेश देत म्हटले की, पेटीएमने नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे 29 फेब्रुवारी, 2024नंतर पेमेंट प्लॅटफॉर्म आपल्या खात्यात किंवा वॉलेटमध्ये नवीन रक्कम स्वीकारू शकणार नाही. आजच्या या लेखामार्फत आपण आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेविरुद्ध इतके मोठे पाऊल का उचलले, हे जाणून घेणार आहोत. तसेच, यावर पेटीएमकडून काय प्रतिक्रिया आली यावरही नजर टाकणार आहोत. चला तर, लगेच सुरुवात करूयात…

आरबीआयने का लावली बंदी?
आरबीआयने (RBI) आपल्या निवेदनात म्हटले की, पेटीएम पेमेंट्स बँकेविरुद्ध (Paytm Payments Bank) केलेली कारवाई बँकिंग विनिमय कायदा, 1949च्या कलम 35A अंतर्गत केली होती. बँकेने असेही म्हटले की, त्यांनी मार्च 2022मध्ये पेटीएम पेमेंट्स बँकेंला नवीन ग्राहक जोडणे बंद करण्यास सांगितले होते. एका सिस्टम ऑडिट रिपोर्टमध्ये बँकेवर सतत नियमांचे पालन न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, यावर आरबीआयने कोणतेही विशेष भाष्य केलेले नाही.

काय-काय बदल होतील?
खरं तर, पेटीएम पेमेंट्स बँक ही भारताची सर्वात मोठी पेमेंट फर्म पेटीएम (Paytm) कंपनीचा भाग आहे. याचा वापर लाखो लोक करतात. मात्र, पेटीएमसाठी वाईट बातमी अशी आहे की, आरबीआयने घातलेल्या बंदीनंतर 29 फेब्रुवारीपासून नवीन रक्कम डिपॉझिट करणे, क्रेडिट व्यवहाराच्या सुविधेसह सर्व फंड ट्रान्सफरची सुविधाही बंद होईल.
केंद्रीय बँकेने निवेदनात म्हटले की, 29 फेब्रुवारी, 2024नंतर कोणत्याही ग्राहकाचे अकाऊंट, प्रीपेड टूल, वॉलेट, FASTags, NCMC कार्ड यामध्ये कोणतेही व्याज, कॅशबॅक किंवा रिफंडव्यतिरिक्त कोणतेही डिपॉझिट, क्रेडिट व्यवहार किंवा टॉपअपची परवानगी दिली जाणार नाही.
उरलेल्या पैशांचे काय करणार?
याव्यतिरिक्त हे देखील समोर आले आहे की, जर ग्राहक वापरत असलेल्या प्रीपेड डिव्हाइसेस, Fastags, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड इत्यादींमध्ये काही रक्कम शिल्लक असेल, तर ते रक्कम संपेपर्यंत कोणत्याही निर्बंधाशिवाय वापरू शकतात. तसेच, जर तुमचे बचत बँक खाते, चालू खात्यात रक्कम शिल्लक असेल, तर ती तुम्ही कोणत्याही निर्बंधाशिवाय सहजरीत्या काढू शकता.
पेटीएमने काय म्हटले?
पेटीएमने स्पष्टीकरण देताना म्हटले की, ते आरबीआयच्या निर्देशांचे पालन करण्यासाठी तातडीने पावले उचलतील. गुरुवारी (दि. १ फेब्रुवारी) एका निवेदनात म्हटले की, वेगवेगळ्या पेमेंट पर्यायासाठी पेटीएम पेमेंट्स बँकेसह वेगवेगळ्या बँकांसोबतही काम करते. त्यांनी असेही म्हटले की, आता आम्ही योजनांमध्ये वेग आणू आणि पूर्णपणे इतर बँक भागीदारांकडे जाऊ. म्हणजेच आता ओसीएल पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडऐवजी इतर बँकांसोबत काम करेल.

या बंदीमुळे पेटीएमला मोठे नुकसान होऊ शकते. अशी चर्चा आहे की, आरबीआयच्या कारवाईमुळे पेटीएमला 500 कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. मात्र, आशा आहे की, आगामी काळात यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात.
विशेष म्हणजे, पेटीएम ब्रँड One97 Communications Ltd च्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली आहे. सध्या पेटीएमची शेअर प्राईज ही 487.20 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.