परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर मात करा
आपल्याला श्रीकृष्णाचे जीवनचरित्र तर माहितीच आहे.त्याच्या जन्माच्या आधीपासूनच त्याला मारण्यासाठीचे षडयंत्र चालू होते, मात्र तरीही तो त्यातून वाचला. त्यानंतर देखील त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक स्तरावर त्याला मारण्यासाठी अनेक युक्त्या लढवण्यात आल्या. मात्र त्यांना भूल देत तो प्रत्येक संकटातून बाहेर पडला. न डगमगता त्याने प्रत्येक संकटाविरुद्ध प्रतिकार केला. अर्थात तो परमेश्वर होता, पण संकटांविरुद्ध लढण्याचा तो गुण जर आज प्रत्येकाने आत्मसात केला असता, तर सर्वसामान्य माणसाचे होणारे हाल नक्कीच कमी झाले असते.
मित्रांनो साधं आपल्या रोजच्या जीवनातील उदाहरण म्हणजे आपण रस्त्याने चाललोय आणि अचानक एक कुत्रा आपल्याकडे पाहून गुरगुताना दिसतो तेव्हा आपण काय करतो… तिथून धूम ठोकतो. पण त्याच्यासमोरून आपण जर पळ काढला, तर तोही आपल्यामागून भुंकत येतो. मात्र तेच जर हातात एक दगड घेऊन आपण त्याच्या मागे लागलो तर? चित्र उलटं असेल.
मित्रांनो आपल्या आयुष्याचं देखील तसंच आहे, दुःखाला कवटाळत बसलो, तर दुःख अजून मोठं होतं. एक म्हण आहे ‘भित्या पाठी ब्रम्हराक्षस’ या म्हणीनुसार घाबरणाऱ्याच्या पाठीमागेच अनेक वाईट घटना, प्रसंग लागतात. मात्र त्यातून घाबरून पळ न काढता सक्षमतेने, निर्भयपणे आणि सद्सद्विवेकाने तोंड दिले, तरच आपण प्रत्येक संकटातून तारू शकतो.
तुम्हाला माहिती असेल पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर शंकर धोंडियाल यांच्या पत्नीची शौर्यकथा. 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यात 29 वर्षीय मेजर धोंडीयाल शाहिद झाल्यानंतर त्यांची पत्नी वीरमरण आलेल्या आपल्या पतीसाठी शोक करत बसली नाही. तर तिनेसुद्धा सैन्यात भरती होण्याचा निर्धार केला. आपल्या पतीला योग्य सन्मान आणि आदरांजली म्हणून तिने अनेक प्रयत्नांती शेवटी सैन्यात भरती होऊन समाजासमोर धैर्याचा एक धडा घालून दिला.
संकटांना मेहनतीने कसं उत्तर द्यायचं? नव्या उमेदीने आयुष्यात कसं सामोरं जायचं? यासाठीचं हे ज्वलंत आणि जिवंत उदाहरण. सुख-दुःखाचा प्रवास कोणाला संपलेला नाही. आयुष्यात संकटं ही येणारच; पण आलेल्या संकटांना न घाबरता, हतबल न होता जिद्धीने जो सामोरे जातो तोच खरा धैर्यवान.
एकदा 12-13 वर्षाच्या मुलाला अभ्यास न झाल्याच्या कारणावरून त्याचे शिक्षक भर खूप ओरडतात. वर्गात उभे करतात आणि त्याच्या हातावर जोराने छडी ने मारण्यासाठी हात वर करतात. आता त्याचा हात लालच होणार, पण त्यांचं लक्ष त्याच्या हाताकडे जातं. शिक्षक छडी खाली टाकतात आणि म्हणतात, “अरे तुला मारून काय फायदा. तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही. त्याला खूप दुःख होतं. माझ्याच हातावर कशी काय रेषा नाही. तो शिक्षकांना विचारतो गुरुजी विद्येची रेषा कुठे असते. गुरुजी सांगतात की बाबा इथे इथे असते. तो तडक शिक्षकांसमोरुन बाहेर जातो आणि चाकूने आपला हातावर रेष ओढतो आणि शिक्षकांना सांगतो, “गुरुजी माझ्या हातावर देवाने रेषा निर्माण केली नसेल, पण मी ती केली.” तो मुलगा दूसरा-तिसरा कोणी नसून व्याकरणाचार्य पाणिनी होता. पुढे जाऊन त्याने व्याकरणाचे गणित अख्ख्या जगासमोर मांडले.
सांगायचं तात्पर्य इतकंच; दुःखाचा, संकटांचा सामना करा. संकटांना नेटाने उत्तर दिले की विजय नक्कीच तुमचा असेल.
आणखी वाचा
- तुम्ही ज्यांच्या सहवासात असता तसेच तुम्ही बनता…
- यश मिळवण्यासाठी कल्पकता व शांत डोक पाहिजे
- सगळं संपलं असं कधीच होत नसतं
- अती विचाराच्या रोगापासून दूर राहा
- फक्त तुम्हीच स्वतःमध्ये बदल घडवू शकता
- ध्यानाने होत आहे रे … आधी केलेच पाहिजे!
- व्यवसायात यशस्वी होण्यासाठीचे स्टीव्ह जॉब्स यांचे १० नियम
- बारावीत नापास झालेला मुलगा बनला आयपीएस अधिकारी IPS Manoj Kumar Sharma