इस्रोच्या गगनयानमधून पहिल्यांदाच 4 भारतीय अंतराळवीर करणार अवकाश वारी वाचा कोण आहेत ते बहाद्दर?

तब्बल १४० कोटींहून अधिक भारतीयांसाठी अभिमानास्पद बाब घडली आहे. मंगळवारी (दि. २७ फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळ येथील इस्रोच्या ३ मुख्य तांत्रिक विभागांचं उद्घाटन केले. तसेच, त्यांनी गगनयान मोहिमेतील ४ अंतराळवीरांची नावे आख्ख्या जगापुढे जाहीर केली. हे चौघेही भारतीय हवाई दलाचे चाचणी वैमानिक (Test Pilot) आहेत. यामुळे हा कोट्यवधी भारतीयांसाठी गर्वाचा क्षण आहे.
कोण आहेत ते चार अंतराळवीर?
गगनयान मोहिमेअंतर्गत भारताचे अंतराळवीर स्वतःच्या बळावर अवकाशात पाठवले जाणार आहेत. यामध्ये तब्बल ६ टन वजनाचे अवकाश यान अवकाशात पाठवले जाणार आहे. या यानाची क्षमता ४ अंतराळवीर सामावतील इतकी असणार आहे. विशेष म्हणजे, हे यान पृथ्वीपासून तब्बल ४०० किमी अंतरावर ३ दिवस प्रदक्षिणा घालेल, असे गगनयान मोहिमेचे नियोजन असेल.

अशात या मोहिमेची जबाबदारी असणाऱ्या चार अंतराळवीरांची नावेही समोर आली आहेत. त्यात ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप, ग्रुप कॅप्टन अजित कृष्ण आणि विंग कमांडर शुभांशू शुक्ला यांचा समावेश आहे. हे चारही वैमानिक बंगळुरू येथील अंतराळवीर प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत आहेत. इतकंच नव्हे, तर रशियात या चौघांनीही काही काळ अंतराळवीरासाठी आणि अवकाश प्रवासासाठी आवश्यक असलेले प्राथमिक शिक्षणाचे धडे घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या चारही वैमानिकांना ऍस्ट्रोनॉट विंग्स (अंतराळवीर पंख) देऊन जगापुढे सादर केले. तसेच, त्यांना पुढील तयारीसाठी शुभेच्छाही दिल्या.
देशातील सर्व प्रकारची लढाऊ विमाने उडवण्याचा अनुभव
या चारही वैमानिकांबाबत महत्त्वाची बाब अशी की, त्यांनी देशातील सर्व प्रकारची लढाऊ विमाने उडवली आहेत. या चौघांनीही प्रत्येक प्रकारच्या लढाऊ विमानांची सखोल माहिती आत्मसात केली आहे. त्यांनी विमानांची वैशिष्ट्ये आणि कमतरता यांचा बारकाईने अभ्यास करून त्यांचे ज्ञान समृद्ध केले आहे. त्यामुळे या चौघांची गगनयान अंतराळवीर प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.
राकेश शर्मा भारताचे पहिले अंतराळवीर
यापूर्वी एप्रिल १९८४ मध्ये राकेश शर्मा हे तत्कालिन सोव्हिएत रशियाच्या Soyuz-11 या यानातून अवकाश भ्रमंती करत भारताचे पहिले अंतराळवीर बनले होते. त्यानंतर कल्पना चावला, सुनीता विल्यम्स यांच्यासह काही भारतीय वंशाच्या नागरिकांनी इतर देशांचे प्रतिनिधित्व करत अंतराळवीर म्हणून अवकाश वारी केली होती.

मात्र, आतापर्यंत भारताला स्वत:च्या बळावर भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवता आला नव्हता. त्यामुळे आता देशाचे चारही अंतराळवीर पुढील वर्षी म्हणजेच २०२५च्या अखेरीस किंवा २०२६ च्या सुरुवातीला गगनयान मोहिमेतून अवकाश वारी करतील.
विशेष म्हणजे, स्वत:च्या बळावर अवकाशात अंतराळवीर पाठवणारा भारत हा चौथा देश ठरेल. भारतापूर्वी रशिया, अमेरिका आणि चीन यांनीही स्वबळावर अंतराळवीर अवकाशात पाठवले आहेत. लक्षवेधी बाब अशी की, युरोपियन स्पेस एजन्सी, जपान आणि कॅनडा यांसारख्या देशांना अशी कामगिरी अजूनही जमलेली नाहीये.