अंतराळ विश्वविज्ञान आणि तंत्रज्ञान

औंढा नागनाथजवळ उभी राहतेय भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय वेधशाळा

या प्रकल्पाला १७ फेब्रुवारी २०१६ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने लायगो इंडिया प्रकल्पास तत्त्वत मंजुरी दिली होती. महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथजवळील दुघाळा परिसरातील जागा अधोरेखित करण्यात आली, तेथे फारशी झाडे नाहीत. सुमारे १७४ एकर जागा महाप्रकल्पासाठी अधिग्रहित करून प्रशासकीय इमारतही उभी राहिली. मात्र, सन २०२० मध्ये आलेल्या करोनामुळे प्रकल्पाची अंतिम मंजुरी लांबत गेली. अमेरिकेमध्ये दोन लायगो वेधशाळा यापुर्वीपासून गुरुत्वीय लहरींचा वेध घेत आहेत. त्यामुळे भारतात होणारी ही अमेरिकेबाहेरील पहिली व जगातील तिसरी वेधशाळा ठरणार आहे. सध्या केवळ अमेरिकेतील वॉशिंग्टन व लुईझियानामध्ये या प्रयोगशाळा आहेत.

India's First International Observatory Stands Tall Near Aundha Nagnath

लायगो वेधशाळेने २०१६ साली दोन मोठ्या कृष्णविवरांच्या टकरीतून निर्माण झालेल्या गुरूत्वीय लहरींचा पहिल्यांदाच शोध लावला होता. या संशोधनाला २०१७ सालचे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले होते. जेव्हा ही वेधशाळा २०२५ मध्ये कार्यान्वित होईल. त्याचे व्यवस्थापन ‘आयुका’कडे असेल, असे पुण्यातील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्टॉनॉमी अ‍ॅन्ड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स (आयुका)चे संचालक सोमक रायचौधरी यांनी सांगितले. भविष्यात वेध घेतल्या जाणाऱ्या गुरूत्वीय लहरींचे मुळ शोधण्यासाठी या नवीन अत्याधुनिक वेधशाळेची मदत होणार आहे. लहरींच्या संशोधनासाठी उच्च कौशल्याची गरज असते. त्यासाठी या क्षेत्रातील संशोधकांना उच्च स्तरीय प्रशिक्षण देता येणार आहे.

दुघाळा परिसरामध्ये उभारली जाणारी ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रयोगशाळा सुमारे १७१ हेक्टर क्षेत्रावर उभारली जाणार आहे. यामध्ये १२१ हेक्टर जमीन वन विभागाची आहे. गुरुत्वीय लहरींचा अभ्यास या प्रयोगशाळेच्या माध्यमातून केला जाणार असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञ या ठिकाणी थांबणार आहेत. या प्रयोगात गांधीनगरची प्लाझ्मा संशोधन संस्था, पुण्यातील आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र व खगोलभौतिक केंद्र (आयुका), इंदोरचे राजा रामण्णा प्रगत तंत्रज्ञान केंद्र या संस्थांची भूमिका लायगो इंडिया प्रकल्पात महत्त्वाची ठरणार आहे. लायगो

LIGO 1068x601 1

११ फेब्रुवारी २०१६ रोजी भारतीय वेळेनुसार रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी लायगो (Laser Interfrometer Gravitaional Wave Observatroy)चे कार्यकारी संचालक प्रो. डेविड रिट्झ यांनी गुरुत्त्वीय लहरी सापडल्याची घोषणा केली आणि आइन्स्टाइन यांच्या व्यापक सापेक्षतावादाच्या सिद्धांताला अजून एकदा प्रबळ पुष्टी मिळाली. १९१६ साली आइन्स्टाइन यांनी या लहरी अस्तित्त्वात असाव्यात असे भाकीत त्यांच्या व्यापक सापेक्षतावादाच्या (General Relativiry) सिद्धांताच्या आधारे केले होते. त्याचा भक्कम पुरावा लायगो प्रकल्पामुळे मिळाला आहे. या गुरुत्त्वीय लहरी अतिसूक्ष्म व अतिक्षीण असल्याकारणाने त्यांचा शोध हा अतिशय अवघड, किचकट पण महत्त्वपूर्ण मुद्दा असतो. पण या क्षेत्रात गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ काम करणाऱ्या एलएससीच्या (LIGO scientific collaboration) एक हजारांहून अधिक सदस्यांनी एकत्र येऊन हे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले. अभिमानास्पद बाब म्हणजे यामध्ये ६० हून अधिक भारतीयांचा सहभाग होता. गुरुत्वतरंग शोधण्याच्या प्रयत्नांना नव्वदच्या दशकात जेव्हा सुरुवात झाली तेव्हा त्यात अमेरिकेबरोबर इटली, ऑस्ट्रेलिया व अन्य काही देशांचाही सहभाग होता. संयुक्तरीत्या लायगो प्रकल्प राबविण्यात येणार होता. मात्र ऑस्ट्रेलियाने त्यातून माघार घेतली आणि भारताला आयती संधी मिळाली. भारतीय वैज्ञानिकांनीही त्या संधीचे सोनेच केले. या यशात पुण्यातील ‘आयुका’सह अनेक वैज्ञानिक संस्थांमधील वैज्ञानिकांचा मोठा वाटा आहे. आता भारतामध्येही लायगो उपकरण बसविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तेव्हा भारतीय वैज्ञानिकांना आधीच मिळालेल्या या अनुभवाचा फायदा त्यात नक्कीच होईल असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.

India's First International Observatory Stands Tall Near Aundha Nagnath

वॉशिंग्टन व लुईझियाना येथे असलेल्या लायगो प्रयोगशाळांमधून २०१५ मध्ये सप्टेंबर महिन्यात प्रथमच गुरुत्वीय लहरींच्या अस्तित्वाचा पुरावा शोधला गेला. त्यावेळी लायगोने पकडलेल्या गुरुत्वीय लहरी १.३ अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेल्या दोन प्रचंड वस्तुमानाच्या कृष्णविवरांच्या विलयातून तयार झाल्या होत्या. त्यानंतर त्याच वर्षी तीन महिन्यांनी म्हणजे २६ डिसेंबरला गुरुत्वीय लहरींचा आणखी एक संदेश टिपण्यात लायगो प्रयोगशाळांना यश आले होते. दोन कृष्णविवरांच्या मिलनातून तयार झालेल्या या गुरुत्वीय लहरी होत्या. विशेष म्हणजे ही घटना १.४ अब्ज प्रकाशवर्षे दूरवर घडली होती. वॉशिंग्टन व लुईझियाना येथील प्रयोगशाळांचे एकमेकांपासूनचे अंतर ३००० कि.मी आहे. ही उपकरणे ६६० दशलक्ष प्रकाशवर्षे दूर असलेल्या कृष्णविवरांच्या मिलनातून तयार झालेल्या गुरुत्वीय लहरी शोधू शकतात.

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button