रुबाबदार आयुष्य जगा : आरोग्यसंपन्न जगा
रोगांचा अभाव म्हणजे आरोग्य का?
नक्कीच नाही,
सर्वांगीण दृष्ट्या जगण्याचा राखलेला समतोल
हे खरं निरोगी आरोग्य…
काल झोपताना त्याने उद्याच्या दिवसात करावयाच्या सर्व कामांची यादी केली, ती त्याची नेहमीची सवयच होती. पण नेहमीप्रमाणे व्यायामासाठी वेगळा वेळ काढायचं त्याच्याकडून राहूनच गेलं. खरंच आपण आपल्या आरोग्याला किती साधारण स्थान दिलंय नाही का? खरंच आपल्या आयुष्यात आरोग्याचं महत्व तितकं साधारण आहे का? गांभीर्याने स्वतःला प्रश्न विचारला तर नाही हेच उत्तर येईल. मुळात आरोग्याशिवाय माणसाला काय करणं शक्य आहे हाच सर्वात मोठा कळीचा मुद्दा आहे.
चार दिवानांचं घर जरी आपल्याकडे असलं; पण मणक्यात गॅप असला, तर चटईवर झोपायला लागतं. दहा साखर कारखान्यांचे Shares आपल्याकडे असतील; पण डायबिटीस असेल, तर तो डॉक्टर चमचाभर सुद्धा साखर खाऊ देत नाही. घरी हरभऱ्याची एकरभर शेती आहे; पण ते चणे खायला तोंडात दातच नसतील, तर करणार काय? तोंडासमोर पंचपक्वानांची मेजवानी आहे, पण पचनसंस्थाच जर काम करत नसेल, तर कोणाला दुःख सांगणार…
बोध हाच की चांगलं आरोग्य नसणं हे दात नसलेल्या वाघासारखं आहे. अर्थहीन. तरुणपणी पैसा कमावण्यासाठी आपण शरीराची ओढाताण करतो आणि म्हातारपण आलं की हेच शरीर जपण्यासाठी कमावलेलं धन खर्च करतो. मेहनत करू नका असं अजिबात म्हणायचं नाहीये, पण या कष्टमय प्रवासात शरीराशी मात्र कधीच तडजोड करू नका, कारण हे शरीर जर आपल्यावर रुसलं, तर समोर असणारं स्वर्गसुख देखील व्यर्थ ठरतं. आपल्या शरीरातील अवयवांची जर किंमत काढायला आपण गेलो, तर ती शेकडो कोटींच्या घरात जाईल. खिशात जर पाचशेच्या चार नोटा असल्या, तर आपण किती वेळा चाचपडून पाहतो, मग एवढी कोट्यावधींची शरीररुपी संपत्ती आपल्याजवळ असताना आपण त्याची किती काळजी घेतो. खूप कमी, खरच खूप कमी. का? कारण ते मोबदल्याशिवाय मिळालंय. या शरीरासाठी आपण कोणते पैसे मोजले नाहीत. आपल्या आई-वडिलांना आपण त्याचं भाडंही देत नाही. म्हणजे फुकटच मिळालेली चीजवस्तू. साधं एक उदाहरण पाहा. आपण आपला चष्मा जास्त जपतो, की डोळे जास्त जपतो? 90% वाचकांचे उत्तर चष्मा हेच असेल. तो चष्मा ठेवायचं खोकं वेगळं, त्याला पुसण्याचा रुमाल वेगळा. ती काच स्वच्छ करायला liquid वेगळं. आणि त्या चष्म्याच्या कितीतरी पटीने महाग असणारे आपले डोळे. त्यांचं काय… ॐ दुर्लक्षाय नमः फक्त एकदा ओल्या पाण्याचा हात फिरवला, की झाले आमचे डोळे स्वच्छ. किती मोठी शोकांतिका. पण याच शोकांतिकेवर वेळ जायच्या आधी विचार व्हायला हवा. आपल्या आरोग्यासाठी आपणच जागं व्हायला हवं. चांगल्या करिअरसाठी जसे आपण झगडतो ती धडपड चांगल्या आरोग्यासाठी देखील व्हायलाच हवी. उत्तम आरोग्याला आपण जर अलंकार मानत असू, तर त्या अलंकाराची बडदास्त देखील आपणच ठेवायला हवी ना!
सुदृढ शरीराच्या महत्त्वावर रामदास स्वामी फार सुंदर म्हणतात
“शक्तीने पावती सुखे | शक्ती नसता विटंबना ||
शक्तीने नेटका प्राणी | वैभव भोगता दिसे ||”
आपलं शरीर सुदृढ नसेल; तर व्यक्तीच्या विद्वत्तेचा व ज्ञानाचा त्याला किंवा समाजाला काहीही उपयोग होत नाही. उत्तम आरोग्य शरीरातील ऊर्जेला कायम प्रज्वलित ठेवतं, ज्या ऊर्जेचा वापर करून आपण आपली वेळ चांगल्या कार्यासाठी सत्कारणी लावू शकतो.
आणखी वाचा
- तुम्ही ज्यांच्या सहवासात असता तसेच तुम्ही बनता…
- यश मिळवण्यासाठी कल्पकता व शांत डोक पाहिजे
- दृष्टीकोन’ बदला आयुष्य बदलेल
- अती विचाराच्या रोगापासून दूर राहा
- फक्त तुम्हीच स्वतःमध्ये बदल घडवू शकता