संयम…! : यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले अदृश्य कौशल्य
मेहनत, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास या बरोबरच यशस्वी आयुष्यासाठी उपयोगी असलेलं सर्वात महत्वाचं कौशल्य म्हणजे ‘संयम’. बऱ्याच जणांकडे ही आधी नमूद केलेली चार कौशल्य असतात, पण संयम मात्र नसतो. तर आजच्या भागात आपण बोलणार आहोत आपल्या आयुष्यात संयमाचं महत्त्व काय आहे. चला तर मग सुरुवात करूया!
संयम म्हणजे फक्त वाट बघणं किंवा प्रतीक्षा करणं एवढंच नाही, तर ती प्रतीक्षा करत असताना आशावादी वृत्ती बाळगणं. एक छान मराठी सुभाषित आहे, ‘संयम म्हणजे काय? तर एक युद्ध… स्वतःच्या विरुद्ध...’
तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी यशाचा आनंद घेतला आहे का? तो क्षण, त्यावेळच्या मनातील भावना खूपच महत्त्वाच्या असतात. नाही का? तसेच तुम्ही अनेकदा पराभवाची चवसुद्धा चाखली असेल. जगात सर्वत्र आणि सगळ्यांच्या बाबतीत हा यश-अपयशाचा खेळ चालूच असतो. जीवनात अपयश हाच खरा सोबती आहे. त्याचं स्वागत केलं पाहिजे. त्याच्यामुळे तर आपल्याला नम्रता, संयम आणि धैर्याचे धडे मिळतात. माणसाने नेहमी कठीण परिस्थितीतून वर येत जगलं की जिंकणं सोप्पं होतं.
इतिहासाकडून आपण बऱ्याच गोष्टी शिकत असतो. त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे; ज्यांनी इतिहास घडवला, स्वतःचा नाव अजरामर केलं त्यापैकी कुणाचंही आयुष्य सुखासीन नव्हतं. बहुतेक सर्वांनाच काट्यांनी भरलेल्या रस्त्यावरून स्वत:ची वाट शोधावी लागली.
लष्करी प्रशिक्षण घेताना कॅरोली टकाक्सला भयंकर दुखापत झाली आणि त्याचा उजवा हात निकामी झाला. त्यामुळे तो नेमबाजी करू शकणार नव्हता, पण ही दुखापत त्याला त्याच्या ध्येयापासून विचलित करू शकली नाही. त्याने डाव्या हाताने सराव करायला सुरुवात केली. न थकता, न थांबता त्याचा सराव चालूच होता आणि एक दिवस असा उजाडला कि ऑलिम्पिकच्या इतिहासात कधीही न घडलेली घटना घडली ती आणि ती म्हणजे कॅरोली टकाक्स हा ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीच्या २५ मीटर रॅपिड फायर प्रकारात दोन सुवर्णपदकं मिळवणारा जगातील पहिला नेमबाज बनला.
बिल गेट्स हे सुद्धा असंच एक नाव आहे, ज्यांना सुरुवातीच्या काळात खडतर परिस्थितीला तोंड द्यावे लागले. तुमचा हे वाचून कदाचित विश्वास बसणार नाही, पण बिल गेट्स हॉवर्ड विद्यापीठातील ड्रॉपआउट आहेत. त्यांच्याकडे कोणतीही शैक्षणिक पदवी नाही, पण या गोष्टी त्यांच्या मार्गात कधीही अडसर बनल्या नाहीत. ते पुढे जात राहिले आणि आज ते जगातील सर्वात यशस्वी व्यक्तींपैकी एक आहेत. अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला देता येतील.
मित्रांनो, एक लक्षात घ्या आपल्याला एखादी गोष्ट मिळाली नाही, याचा अर्थ सगळं संपलं असा होतो का? निश्चितच नाही. उलट आपण स्वतःला सिद्ध करण्यासाठी अजून थोडं झगडलं पाहिजे. स्वतःवर, स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं, ‘संयम’ ठेवला पाहिजे. आयुष्यातला बहुतेक प्रश्नांचं उत्तर ‘वेळ’ देते. त्यामुळे आपल्याकडं कमालीचा संयम असणं खूप गरजेचं आहे.
मनुष्य जेव्हा संयम शक्ती वाढवतो, तेव्हा त्याची सगळी कामं सहज पूर्ण होतात. संयमाचं फळ केवळ मधुरच नाही, तर स्वास्थ्यवर्धकही असते. तुमचा संयम वाढला, की तुमची संकल्पशक्ती सुद्धा वाढत जाते. तुम्ही ध्येयाच्या अधिक जवळ जाऊ लागता. संयम नसेल, तर अनेकदा कामं पूर्ण होत नाहीत, अर्धवट राहतात. स्वप्न पूर्ण करण्यासाठी संयम बाळगला आणि योग्य दिशेने वाटचाल केली, तर नशीब तुमच्या मार्गात कधीही येणार नाही. परंतु अट एवढीच आहे की, लक्ष्य साध्य करताना पराजय स्वीकारू नये. म्हणजेच तुमच्या वाटेला कितीही पराजय आले तरी खचून जाऊ नका धैर्याने संयमाने पुढे चालत रहा एक दिवस तुम्हाला नक्कीच यश मिळेल.
जॉईस चॅपमन या लेखिकेचं एक खूप प्रेरणादायी वाक्य आहे “जर तुमचं स्वप्नं खूप मोठं असेल आणि त्यासाठी संपूर्ण आयुष्य झोकून द्यायला तुम्ही तयार असाल, तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व गोष्टी करणे हा एकचं मार्ग आहे.” त्यामुळे कधीही प्रयत्न सोडू नका, नेहमी पुढे जात राहा.
आणखी वाचा
- तुम्ही ज्यांच्या सहवासात असता तसेच तुम्ही बनता…
- यश मिळवण्यासाठी कल्पकता व शांत डोक पाहिजे
- दृष्टीकोन’ बदला आयुष्य बदलेल
- अती विचाराच्या रोगापासून दूर राहा
- फक्त तुम्हीच स्वतःमध्ये बदल घडवू शकता