अर्थजगतआर्थिक

विमा कंपन्यांचे कार्य चालते तरी कसे?

नव्या खुल्या आर्थिक धोरणानुसार सदर क्षेत्र आता खाजगी क्षेत्रांसाठी त्याचप्रमाणे थेट परदेशी गुंतवणुकीसाठी खुले करण्यात आले. सुरुवातीला थेट परदेशी गुंतवणूक मर्यादा 26% होती त्यानंतर ती 26% वरून 49% वरून 74%आणि तेथून सन 2019 मध्ये उपकंपनीच्या माध्यमातून ही मर्यादा 100% पर्यत टप्याटप्याने वाढवण्यात आली आहे. सन 2014 ते 2024 पर्यत या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये 53900 कोटी रुपयांची थेट गुंतवणूक आली आहे. भारत लोकसंख्येच्या दृष्टीने पहिल्या क्रमांकावर असूनही, अजून विमा घ्यायला हवा ती आपली गरज आहे हे फार कमी लोकांना वाटते. त्यामुळे या व्यवसायात वाढ होण्याच्या मोठ्या संधी आहेत. स्वतःहून जीवन विमा किंवा आरोग्य विमा घेणारे फार थोडे लोक आहेत. अनेकांना विमा हा त्यांच्या मालकाकडून मिळतो. कोविड 19 नंतर या विषयावर थोडी जागृती होऊ लागली असून लोकांना त्याचे महत्त्व पटत आहे. सध्या जीवनाविमा देणाऱ्या (24) सर्वसाधारण विमा देणाऱ्या (33) अशा 57 कंपन्या कार्यरत आहेत. अलीकडे आलेल्या आणि शेअरबाजारात नोंदणी केलेल्या विमा कंपन्यांनी आपले 31 मार्च 2024 आर्थिक निकष जाहीर केले असून काहींनी अल्पावधीतच भरघोस नफा मिळवला आहे. त्यामुळे साहजिकच या कंपन्यांचा व्यवसाय चालतो तरी कसा? त्या प्रीमियम कसा ठरवतात, भरपाई कशी देतात याबद्दल सर्वसाधारण लोकांना कुतूहल आहे. त्यांच्या आकडेवारीच्या तपशिलात न जाता त्यांच्या कार्याचा मागोवा घेण्याचा हा प्रयत्न.

आपल्याला माहिती आहेच की विमा हा एक करार असून कंपन्या त्याच्या ग्राहकांकडून विम्याचा प्रिमियम घेतात आणि करारातील अटी शर्ती मान्य करून जर तशी घटना घडलीच तर त्याची भरपाई देतात. यामुळे ग्राहकांची जोखीम कमी होते त्याचप्रमाणे किरकोळ विमा संरक्षण देऊन त्या ग्राहकांच्या गरजेच्या बचत योजनांही बाजारात आणतात. त्यांना गरजेनुसार नियमित उत्पन्न मिळेल याची काळजी घेतात, ते करताना:

जोखीम निश्चिती: विमा कंपन्या एखाद्या व्यक्तीची त्याच्या मालमत्तेची किंवा एखाद्या अनपेक्षित घटनेची जोखीम स्वीकारतात. यासाठी वास्तविक विज्ञान तज्ञांची (Actuarial Science) तज्ञांची मदत घेतात. विमा, निवृत्ती वेतन, वित्त व्यापार, उद्योग, व्यवसाय यातील जोखीम मोजण्याची गणितीय आणि सांख्यिकीय विभागाची शाखा आहे भविष्यातील अनिश्चित घटनांचे आर्थिक परिणाम शोधून त्याचे विश्लेषण करण्यासाठी संभाव्यता आणि सांख्यिकीय गणिताचा वापर करते. प्रीमियम किती जमा होईल, किती क्लेम द्यावे लागतील आणि व्यवस्थापन खर्च भागवला जाईल याप्रमाणे योजनेची रचना करण्यात येते. बाजारात चालू अशाच प्रकारच्या योजना आणि त्यांचे प्रीमियम यांचाही विचार केला जातो.

योजनेचा प्रीमियम: योजना निश्चित झाली की त्यांची आकर्षक जाहिरात केली जाते. एजंटच्या माध्यमातून त्याचप्रमाणे ऑनलाईन पोर्टलवर ग्राहक त्यांनी खरेदी केलेल्या योजनेचा प्रीमियम मासिक, त्रैमासिक, वार्षिक पद्धतीने इन्शुरन्स कंपनीकडे जमा करीत असतात. जमा होणारा प्रीमियम हे इन्शुरन्स कंपन्यांच्या उत्पन्नाचे साधन आहे.

अंडररायटिंग: जेव्हा ग्राहक विमा संरक्षणाची मागणी करतो तेव्हा सर्वप्रथम या प्रक्रियेतून जावे लागते. विमा कंपन्या छोट्या व्यवसायाचा विमा उतरवण्याचा धोका निर्धारित करण्यायोग्य असल्याची चाचपणी करून तुमची मागणी स्वीकाहार्य आहे का नाही ते तपासून, जर ती स्वीकाहार्य असेल तर प्रीमियम किती घ्यायचा ते ठरवते. व्यक्तीला जीवना विमा, आरोग्य विमा देताना त्याचा प्रीमियम ठरवताना त्याचे वय, आरोग्य, जीवनशैली, कामाचे स्वरूप आणि त्याचा इन्शुरन्सच्या क्लेम्सचा पूर्वेतिहास तपासला जातो. त्यानंतर त्याचा प्रस्ताव बनवला जातो.

प्रस्तावास मंजुरी अथवा नामंजुरी: अंडररायटिंगच्या अहवालास अनुसरून तुमचा प्रस्ताव स्वीकारायचा नाकारण्याचा किंवा त्यातील अटीशर्तीमध्ये अथवा प्रीमियममध्ये बदल करण्याचा अधिकार विमा कंपनीस असतो. तो दोघांनाही मान्य असेल तर प्रिमियम घेऊन विमा करार केला जातो. तो मिळाल्यावर ग्राहकाने तपासून पाहणे अपेक्षित असून त्याने समाधान होत नसेल, तर ठराविक मुदतीत तो रद्द केला जाऊ शकतो. यासाठी कोणतेही कारण देण्याची जरुरी नसते. अशा वेळी त्यावरील प्रोसेसिंग फी वजा करून उरलेली रक्कम परत देण्यात येते.

जोखीम फंड उभारणी: विमा कंपन्या जमा झालेल्या प्रीमियममधील काही भागाचा एक फंड निर्माण करून त्याचा उपयोग क्लेम रक्कम देण्यास वापरतात. यामध्ये पडून असलेल्या रकमेची अल्पकालीन आणि दीर्घकालीन गुंतवणूक कशी करायची यांचे नियम असून ती त्याच पद्धतीने केली जाते. ज्यामुळे कंपनीच्या रोखता प्रवाहात अडचण येणार नाही. ग्राहकांना त्यातूनच नुकसानीची भरपाई मिळात असल्याने त्यांची जोखीम कमी होते.

क्लेमवरील प्रक्रिया: जेव्हा पॉलीसीधारक त्याच्या नुकसानीचा दावा दाखल करतो तेव्हा इन्शुरन्स कंपनीकडून त्याची सत्यता तपासली जाते. दावा योग्य असल्यास मंजूर करून त्याची रक्कम धारकास दिली जाते. अशा प्रकारे धारकाच्या आर्थिक नुकसानीची भरपाई होते.

आपत्कालीन फंडाची निर्मिती: जमा झालेल्या प्रिमियममधून भविष्यात येणाऱ्या दाव्यांच्या भरपाईची खात्री असली तरी जमा प्रिमियममधील काही रक्कम बाजूला ठेऊन आपत्कालीन फंडाची निर्मिती केली जाते. जेणेकरून त्यातून गुंतवणूक केली जाऊन अधिक परतावा मिळेल, त्यामुळे भविष्यात कदाचित अधिक दावे मंजूर करायला लागल्यास होणाऱ्या जास्तीच्या खर्चाची भरपाई होईल.

कंपनीचा नफा: जमा झालेला प्रिमियम आणि त्यातून द्यावी लागलेली भरपाई आणि व्यवस्थापन खर्च यातील फरक हा विमा कंपनीचा नफा असतो. पहिल्या वर्षाचा खर्च हा सर्वाधिक असतो. त्यातुनच एजंटला सर्वाधिक कमिशन मिळते. आपत्कालीन फंडातून मिळवलेले जास्तीचे उत्पन्न हा देखील कंपनीचा नफा असतो.

पुनर्विमा: खूप मोठ्या रकमेचा विमा उतरवताना कंपनी अन्य कंपन्यांकडून पुनर्विमा घेऊन आपली जोखीम कमी करते. अनपेक्षित नुकसान होऊ नये यासाठी मुख्य कंपनी आपली जोखीम वेगवेगळ्या कंपनीकडे पुनर्विमा काढून कमी करून घेते.

नियामक नियमन: या सर्व कंपन्यांवर अंकुश ठेवण्यासाठी स्वतंत्र नियामक आहेत. त्यामुळे सूचना आणि नियम या कंपन्यांना पाळावेच लागतात. ग्राहक हक्क संरक्षण, उचित व्यवहार, आर्थिक स्थिरता राहून कंपन्यांचा व्यवसाय कसा वाढेल याची काळजी नियमकाकडून घेतली जाते.

उत्पादन विविधता: ग्राहकांच्या गरजा, नियामकांच्या सूचना यांचा विचार करून वेगवेगळी जोखीम कमी करणारी उत्पादने या कंपन्या बाजारात आणतात यात जीवनाविमा, आरोग्यविमा, मालमत्ता विमा, वाहन विमा, विशेष विमा इ. चा समावेश होतो.

©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकरणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत)

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button