उद्योजकताबिझनेस महारथी

फोटोग्राफी क्षेत्रातला पहिला कॅमेरा बनवणारा अवलिया – जॉर्ज इस्टमन

नवी अर्थक्रांतीच्या बिझनेस महारथी या मलिकतेतील आजच्या लेखात जाणून घेऊया कॅमेऱ्याच्या निर्मात्याबद्दल.

कॅमेऱ्याला जन्म देणाऱ्या जॉर्ज इस्टमन यांचा जन्म मारिया किलबार्न आणि वॉशिंग्टन इस्टमन यांच्या पोटी 12 जुलै 1854 रोजी न्यूयॉर्कमध्ये झाला. गरिबीमुळे पोटाला चिमटा काढून इस्टमनच कुटुंब जगत होते. दोन मोठ्या बहिणींनंतर जॉर्ज सर्वात लहान. आपण आणि आपलं कुटुंब इतकंच काय ते त्याचं जग होतं. तो सहा वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. पहिलीतल्या त्या अल्लड जॉर्जला वडिलांची छत्रछाया लाभलीच नाही. त्याच्या आईनेच त्या तिघा भावंडांना मातापित्याचे प्रेम दिले. वडील वारल्यामुळे घर चालवण्यासाठी त्याची आई काही छोटीमोठी काम करून घरचा खर्च भागवत होती.

काही वर्षांनी जॉर्जच्या मोठ्या बहिणीचे निधन झाले आणि जॉर्जच्या कुटुंबावर पुन्हा आभाळ कोसळले. जॉर्ज न्यूयार्क मधील एका छोट्याश्या शाळेत शिकत होता, मात्र घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे वयाच्या 16 व्या वर्षी त्याला शाळा सोडावी लागली. त्यानंतर त्याने काही वर्ष फोटोग्राफीचे काम केले. नंतर 1877 मध्ये न्यूयार्कमधील रोचेस्टर शहरात त्याला बँकेत क्लार्क म्हणून नोकरी मिळाली. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे त्याला नोकरी करणं भाग होतं. त्याच्या नोकरीमुळे हळू हळू घरात पैसे येऊ लागले.   

तीन वर्षांच्या सततच्या प्रयत्नानंतर अखेरीस त्यांना 1880 साली यश आले. कॅमेऱ्यासाठीच्या ग्लास तयार करून त्यांनी प्लेट बनविण्याचं मशीन सुरू केलं आणि पेटंट मिळवलं. त्यांच्या प्लेट्सनी बाजारात धुमाकूळ घातला. इस्टमन यांचे पहिले प्रॉडक्ट अनेकांच्या पसंतीस उतरले. मात्र ते एवढ्यावरच स्वस्थ बसले नाहीत, तर त्यांनी आपल्या संशोधनात आणखी नाविन्यता आणायचे ठरवले. जड काचेच्या प्लेटपेक्षा हलक्या आणि लवचिक कागदी प्लेटचा वापर कसा करता येईल याच्या प्रयत्नांत ते लागले. मात्र पेपर हे जरी सोयीस्कर माध्यम असले तरीही ते योग्य नव्हते. लोकांना आकर्षित करण्यासाठी इस्टमन यांनी स्वतःचा कॅमेरा बनवायचे ठरवले आणि 1888 साली जगात जॉर्ज इस्टमन यांच्या नव्या रोलफिल्म कॅमेऱ्याने पूर्ण विश्वावर राज करायला सुरुवात केली. 

कोडॅक रोलफिल्मच्या अभूतपूर्ण यशानंतर 1892 साली इस्टमन फोटोग्राफीचे अगोदरचे नाव बदलून इस्टमन कोडॅक असे झाले. कोडॅकची ख्याती जगभरात झाली. लंडनमध्ये कोडॅकचे मोठमोठे बॅनर लागले. वर्तमानपत्र, मासिके, डिस्प्ले बोर्ड, पत्रके सगळीकडे कोडॅकच दिसू लागले.  या अभूतपूर्व यशानंतर जॉर्ज यांनी मागे वळून पहिलेच नाही. फोटोग्राफीचे कॅमेरे, फिल्म, रसायने करण्यात त्याने स्वतःला झोकून दिलं. अनेक तऱ्हेचे कॅमेरे त्याने लोकांसमोर ‘आणले. सर्वसामान्य लोकांना वापरता येणारा व पुढे अतिशय लोकप्रिय झालेला ब्राऊनी कॅमेरा, फोल्डिंग कोडॅक कॅमेरा, पॉकेट कोडॅक कॅमेरा, होम मूव्ही कॅमेरा, सिने कोडॅक मोशन पिक्चर कॅमेरा, एक्स-रे फिल्म व त्याकरिता लागणारा कॅमेरा, युद्धात वापरता येणारा एरियल फोटोग्राफी करणारा कॅमेरा, खगोलशास्त्रात अंतराळात निरीक्षण करणारा कॅमेरा असे अनेक तऱ्हे तऱ्हेचे कॅमेरे कोडॅक कंपनीने बाजारात आणले, या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने भरपूर पैसा मिळविला व अमेरिकेतल्या श्रीमंत व्यक्तीच्या पंक्तीत इस्टमनचं नाव गेलं.

इस्टमन हे परोपकारी वृत्तीचे होते 1919 साली त्यांनी आपल्या उत्पन्नातला एक तृतीयांश हिस्सा म्हणजे दहा कोटी डॉलर्स त्यांनी कामगारांना वाटले.

जो केवळ पैसे मिळविण्यासाठी आयुष्यभर काम करत असतो तो पक्का व्यावसायिक असतो, मात्र इस्टमन यांनी जे काही केलं ते फोटोग्राफीच्या प्रेमाखातर. तुम्ही तुमच्या ध्येयाच्या मागे लागा, ज्ञान मिळविण्याच्या मागे लागा, पैसा आपोआपच तुमच्या मागे येईल हे वाक्य त्यांनी सार्थ करून दाखवलं.

वयाच्या 77 वर्षी 14 मार्च 1932 साली आपल्या काही खास मित्रांना त्यांनी आपल्या बंगल्यावर बोलावलं. आपल्या संपत्तीचा बहुतांशी हिस्सा रॉचेस्टर युनिव्हर्सिटीला देणगी म्हणून दिला. मृत्युपत्राच्या कागदपत्रांवर सही करून ते वरच्या मजल्यावरील आपल्या खोलीत गेले व पिस्तुलाने आपल्या छातीत गोळी मारून घेतली. एकच वाक्य लिहिलेली चिठ्ठी मागे ठेवली. त्यात त्यांनी लिहिले होते कि, ‘मला जे काही करता येणं शक्य झालं, ते मी केलं. आता मी कशाला थांबू?’

हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

आणखी वाचा

संबंधित लेख

One Comment

  1. अति उत्तम कथानाक आहे प्रेरणादायी कथानक असून अशी करताना आम्हास आवडतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button