हट्टापायी शिक्षण सोडले अन् उभारली हजारो कोटींची कंपनी, मायकल डेल यांचा प्रेरणादायी प्रवास

Dell Success Story: आजपर्यंत आपण अनेक यशस्वी लोकांच्या कथा पाहिल्या किंवा वाचल्या आहेत. यापैकी काहींनी स्वत:ला पडलेल्या कोड्यामुळे, तर काहींनी निर्माण झालेल्या उत्सुकतेतून आपल्या आयुष्यात क्रांती घडवली. अशा महारथींमध्ये डेल कम्प्यूटर कंपनीचे संस्थापक मायकल डेल यांच्या नावाचाही समावेश आहे. डेल आज (दि. २३ फेब्रुवारी) आपला ५९वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात की, त्यांनी कशाप्रकारे लहानपणापासून ‘जादूचा डब्बा’ म्हणजेच कम्प्युटर समजून घेण्याच्या हट्टापायी शिक्षणाला रामराम ठोकला आणि DELL कंपनीचा पाया रचला. चला तर, सुरुवात करूयात…
जन्म आणि कुटुंब
मायकल डेल (Michael Dell) यांचा जन्म २३ फेब्रुवारी, १९६५ रोजी अमेरिकेच्या ह्यूस्टन शहरात झाला आहे. त्यांचे वडील अलेक्झांडर डेल, दातांचे डॉक्टर होते. तसेच, आई लंगफान या एक स्टॉक ब्रोकर होत्या. मायकल यांच्या घरची परिस्थिती चांगली होती. आई-वडील दोघेही कमावते होते. त्यामुळे घरात पैशांची कसलीच कमतरता नव्हती. दुसरीकडे, मायकल हे बालपणापासूनच अभ्यासात हुशार होते. ते बालपणी इतर मुलांसारखे अजिबातच नव्हते. ते त्यांच्या जास्तीत जास्त वेळ काही ना काही शिकण्यात घालवत होते. मायकल यांचे प्राथमिक शिक्षण ह्यूस्टन शहरातील ‘हीरोड एलिमेंटरी स्कूल’मध्ये झाले होते. शिकत असतानाच मायकल यांनी आई-वडिलांकडून गुंतवणूक आणि व्यापाराचे सर्व गुण शिकून घेतले होते. बालपणापासूनच हे सर्व गुण शिकल्यानंतर मायकल यांचा व्यवसायाबद्दलचा रस आणखीच वाढला होता. त्यांनी मोठी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. विशेष म्हणजे, जेव्हा ते १० वर्षांचे होते, तेव्हा त्यांना त्यांच्या आई-वडिलांकडून पॉकेट मनी मिळायची. हेच पैसे ते साठवू लागले होते.

बालपणीपासून मायकल यांच्यात पैसे साठवण्याची धडपड असायची. त्यामुळेच त्यांनी पैसे जमा करण्यासाठी शहरात टपाल तिकिटांची विक्री सुरू केली होती. हे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल की, पैसे साठवण्याच्या चांगल्या सवयीमुळे त्यांनी अवघ्या १२ वर्षांच्या वयात २०००हून अधिक डॉलर्स साठवले होते.
यशाचे पहिले पाऊल
बालपणीपासून एक चांगला धडा घेतल्यामुळे मायकल डेल यांनी त्यांच्याजवळची संपूर्ण रक्कम मेटल्समध्ये गुंतवली. आयुष्यातील आपल्या पहिल्याच गुंतवणूकीतून मायकल यांना १८००० डॉलरचा फायदा झाला. तसेच, त्यांचे मनोबलही खूप वाढले. मायकल यांना इतक्या कमी वयात झालेला फायदा हा त्यांच्या वडिलांच्या वर्षभराच्या कमाईपेक्षाही कित्येक पटींनी जास्त होता. मायकल लहान वयातच यशाच्या त्या टप्प्यावर होते, जिथे अनेक व्यावसायिकही पोहोचू शकत नाहीत. मायकलचा काम करण्याबद्दलचा रस पाहून त्याच्या वडिलांनी त्याचे स्वप्न साकार करण्याचा विडा उचलला.
बालपणीपासूनच तांत्रिक क्षेत्रात रस
प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रस असतो. तसंच काहीसं मायकल यांच्याविषयीही होतं. मायकल यांना बालपणीपासूनच तांत्रिक क्षेत्रात खूपच रस होता. यामुळेच त्यांच्या वडिलांनी त्यांना वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी एक कम्प्यूटर खरेदी करून दिला. मात्र, मायकल यांनी कम्प्यूटर बाहेरून शिकण्याऐवजी त्याच्या आतमधील भागांविषयी शिकण्यास सुरुवात केली. त्यांनी त्या कम्प्यूटरचा एक-एक भाग वेगळा केला आणि आता त्यांना कम्प्यूटरचा प्रत्येक भाग व्यवस्थित दिसत होता.
याच घटनेनंतर मायकल यांचे कम्प्यूटरविषयीचा रस आणखी वाढला आणि त्यांनी आपला अधिकतर वेळ कम्प्यूटरवर घालवण्यास सुरुवात केली. नेहमीप्रमाणे कम्प्यूटरचा प्रत्येक भाग चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी त्यांनी दुसऱ्या एका कंपनीचा कम्प्यूटर खरेदी केला. इथंही मायकल यांनी दुसऱ्या कम्प्यूटरसोबत तेच केले, जे आधीच्या कम्प्यूटरसोबत केले होते. नंतर त्यांनी त्या कम्प्यूटरचे सर्व भाग योग्यरीत्या कम्प्यूटरमध्ये लावले आणि पुन्हा त्या कम्प्यूटरला पहिल्यासारखे बनवले, जे खूपच चकित करणारे होते.

कॉलेजमध्ये जुन्या पार्ट्सपासून बनवला कम्प्यूटर
मायकल डेल जेव्हा कॉलेजमध्ये होते, तेव्हा त्यांनी एकदा कम्प्यूटरशी संबंधित हार्डवेअर आणि त्याचे पार्ट्स एकत्र करून आपला स्वत:चा एक कम्प्यूटर बनवला. त्यांनी तयार केलेला कम्प्यूटर आपल्याच कॉलेजमधील मित्राला विकला आणि त्यातून त्यांना काही पैसे मिळाले. आता पैशांचे आकर्षण मायकल डेल यांना बालपणीपासूनच होते. आता मायकल आणि कम्प्यूटर हे एक समीकरण बनले होते. ते आणखी कम्प्यूटर बनवू लागले. ते जे कोणते कम्प्यूटर बनवायचे, ते लोकांची सुविधा लक्षात ठेवून बनवत होते. यामुळे लोकांना त्यांनी बनवलेले कम्प्यूटर खूपच आवडू लागले होते.
कॉलेजला रामराम अन् स्वत:ची कंपनी
एका अहवालानुसार, १९८४मध्ये मायकल डेल यांनी १ हजार डॉलरमधून कम्प्यूटरचा व्यवसाय सुरू केला होता. हा व्यवसाय करण्यासाठी त्यांनी आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेतला. त्यांनी व्यवसायात प्रवेश करण्यासाठी मेडिकल कॉलेजला रामराम ठोकला. त्यांनी आपल्या कंपनीला पीसीज लिमिटेड (PC’s Limited) या नावाने रजिस्टर केले. सुरुवातीला त्यांनी हॉस्टेलच्या एका रूममध्ये कम्प्यूटर असेम्बल करण्यास सुरुवात केली आणि त्यांना यातून यशही मिळाले. १९८५मध्ये त्यांनी आपल्या कंपनीचा पहिला टर्बो पीसी बनवला, ज्याचे डिझाईन मायकल यांनीच केले होते. हे कम्प्यूटर विकण्यासाठी त्यांनी जाहिराती आणि मेल-ऑर्डर कॅटलॉग या माध्यमाची निवड केली. मायकल यांच्या सर्व पॉलिसी मार्केट आणि ग्राहक, या दोघांसाठी योग्य होती, ज्यामुळे कंपनी दिवसेंदिवस प्रगती करू लागली. यानंतर १९८८ मध्ये कंपनीचे नाव पीसीज लिमिटेड बदलून डेल कम्प्यूटर कॉर्पोरेशन (Dell Computer Corporation) असे ठेवले.

विशेष म्हणजे, पुढच्याच वर्षी म्हणजे १९८९मध्ये मायकल यांनी संसार थाटला. त्यांनी सुझेन डेल यांच्यासोबत लग्न केले. या दोघांनी ३ मुली आणि १ मुलगा अशी ४ अपत्य आहेत. मुलींची नावे, अलेक्सा, ज्युलिएट आणि किरा आहे. तसेच, मुलाचे नाव झॅकरी डेल असे आहे.
हळूहळू मायकल यांनी बनवलेल्या कंपनीचे नाव प्रत्येक व्यक्तीच्या तोंडावर येऊ लागले, जे मायकल यांच्यासाठी मोठ्या यशाचे संकेत होते. मायकल यांची डेल कंपनी त्यावेळी सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि कमी किंमतीत लोकांना कम्प्यूटर उपलब्ध करून देऊ लागली. एवढंच नाही, तर मायकल यांची कंपनी जगभरात यशस्वी झाली. विशेष म्हणजे, अवघ्या २७व्या वर्षी मायकल हे सर्वात कमी वयातील CEO बनले. त्यांची कंपनी जगातील प्रसिद्ध 500 कंपन्यांमध्येही सामील झाली. मायकल यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे त्यांची कंपनी आज जगातील सर्वात मोठी टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांपैकी एक आहे.
आज घडीला मायकल डेल हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत १७व्या स्थानी आहेत. रिपोर्टनुसार, डिसेंबर २०२३मध्ये त्यांची एकूण संपत्ती ही ७२.८ बिलियन डॉलर्स इतकी होती. यावरून एक गोष्ट सिद्ध होते मित्रांनो, जर तुम्ही तुमचं पॅशन फॉलो करत आयुष्यात पुढे जात राहिलात, तर एक दिवस तुम्हाला यश नक्कीच मिळेल.
तुम्हाला आजचा हा लेख कसा वाटला हे कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा. लेख आवडला असेल तर लाइक आणि subscribe जरूर करा आणि हो अजून कोणत्या विषयाची माहिती ऐकायला तुम्हाला आवडेल कॉमेंट बॉक्समध्ये सांगा.
आणखी वाचा
- यंत्रांनाच देव मानणारा भक्त – बाबा कल्याणी
- आई करायची दुसऱ्यांकडे घरकाम, मेहनतीच्या जोरावर तो आज आहे जगातील सर्वात महागडा आणि सर्वात श्रीमंत फुटबॉलर
- आपल्या शास्त्रीय गायनातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे जगप्रसिद्ध शास्त्रीय गायक भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची जयंती