अवघ्या भारताचं भविष्य बदलणाऱ्या टाटा कंपनीची सुरुवात कशी झाली? जमशेदजी टाटा यांचा प्रवास…
तो काळ होता १८४०चा. भारत पूर्णपणे ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. इंग्रज भारतीयांची सर्वच बाबतींत पिळवणूक करत होते. समाज या अन्यायाविरुद्ध लढत होता, तर यातील एक भारतीय देशाच्या अर्थव्येवस्थेचा पाया रचत होता. ते द्रष्टे भारतीय म्हणजे टाटा ग्रुपचे संस्थापक आणि भारतीय उद्योगाचे जनक जमशेटजी टाटा.
गुजरातमधल्या नवसारी या छोट्या गावात नुसेरवान यांचा जन्म झाला. वयाच्या ५व्या वर्षी जीवनबाई या चिमुरडीसोबत त्यांचा विवाह झाला. वयाच्या १७ व्या वर्षी म्हणजे ३ मार्च १८३९ रोजी नुसेरवानजी वडील झाले आणि जन्माला आले ते भारताच्या उद्योगविश्वाचे भीष्म पितामह म्हणून नावलौकिक मिळवलेले जमशेटजी टाटा.
नवसारीतील पारशी परिवारासाठी आपल्या गावाची वेस ओलांडणं म्हणजे एक दिव्यच. हे दिव्य नुसेरवान यांनी पार केलं. सात पिढ्यांत व्यापार कशाशी खातात हेही कुणाला माहित नव्हतं. घरात पौरोहित्याची परंपरा असूनही व्यापाराचं खूळ त्यांच्या डोक्यात शिरलं आणि आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते आपल्या परिवारासहित मुंबईला आले. तेव्हा जमशेटजी ८ वर्षांचे होते. हा तोच काळ होता जेव्हा इंग्रजीचं शिक्षण भारतीयांना द्यायला सुरुवात झाली होती. हेच वाघिणीचं दूध प्यायला जमशेटजी तयार होत होते. त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते वडिलांना उद्योगधंद्यात मदत करू लागले.
आपल्या मुलाच्या अंगचे व्यावसायिक गुण बघून नुसेरवान यांनी त्यांना थेट परदेशात व्यापारासाठी पाठवलं. अतिपूर्वेकडे असणाऱ्या हाँगकाँग या देशात गेलेले जमशेटजी पहिल्या परदेश दौऱ्यातच तिथं कंपनी स्थापन करुन आले, जमशेटजी आणि अर्देशीर या नावाने. औद्योगिक क्रांतीच्या दारात उभ्या असणाऱ्या जगामध्ये कापसाचं महत्व ओळखून त्यांची कंपनी कापसाचा व्यापार करत होती, तर चीनसाठी लागणाऱ्या अफूला देखील त्यांनी तितकंच महत्त्व दिलं. व्यवहार चातुर्य, संधी ओळखण्याचे कसब यामुळे जमशेटजींनी काही महिन्यांतच आपल्या पहिल्या कंपनीची शाखा शांघायमध्ये आणि दुसरी नंतर लगेच लंडनमध्ये उघडली. युरोपला कापड आणि चीनला अफू विकून तिथून चहा, वेलदोडे, सोनं, तयार कापड ते भारतात आणून विकत. यातून त्यांना भरपूर नफा मिळाला.
याच दरम्यान चालू होतं ते अमेरिकेचं यादवी युद्ध. भारतातील अनेक व्यापाऱ्यांचं दिवाळं निघालं. याची झळ टाटा परिवारालासुद्धा बसली, पण नुसेरवान आणि जमशेट पिता-पुत्राने यातून देखील मार्ग काढला. राहतं घर विकून सर्वांची देणी चुकती केली. यामुळे लोकांचा टाटा नावाशी विश्वास जोडला गेला.
१८६५ मध्ये यंत्रविद्येचे ज्ञान मिळविण्यासाठी जमशेटजी मँचेस्टरला गेले. इंग्लंडमध्ये ते चार वर्षे होते. स्वदेशी परतल्यावर कापडाची वाढती मागणी लक्षात घेता त्यांनी कापड गिरण्या सुरु करायचं ठरवलं. अंदाज घेण्यासाठी त्यांनी २१००० रुपयांत मुंबईच्या चिंचपोकळी भागातील दिवाळं निघालेली एक तेलगिरणी विकत घेऊन अलेक्झांड्रिया मिल असं तिचं नामकरण केलं. बऱ्यापैकी फायदा कमवून २ वर्षांनी ती विकून टाकली. त्यानंतर नागपूरला कापड मिल उभी करण्यासाठी जागा घेतली. त्याकाळी सगळ्या कापड गिरण्या मुंबईमध्ये होत्या. अशा वेळी नागपूरमध्ये मिल उभी करण्याला अनेकांचा विरोध असून देखील त्यांनी हीच जागा पक्की करत मोठ्या कष्टाने मिल उभी केली. कापसाचं मोठ्या प्रमाणावर उत्पन्न, वाहतुकीची सोय, पाण्याची उपलब्धता यामुळे जमशेटजी यांनी घेतलेला निर्णय अगदी योग्य ठरला. ब्रिटनची महाराणी व्हिक्टोरियाच्या गौरवार्थ आणि त्या काळाची गरज लक्षात घेता त्यांनी त्या मिलला एम्प्रेस मिल असं नाव दिलं. १८७७ मध्ये उभी राहिलेली ही गिरणी सप्टेंबर २००२मध्ये अखेर बंद पडली. या दोन गिरण्यांच्या अनुभवावरच कुर्ला येथील ‘धरमसी मिल’ ही जुनी गिरणी विकत घेऊन तिचे ‘स्वदेशी मिल’ असे नामकरण केले, तर अहमदाबादला ‘ॲडव्हान्स मिल’ सुरू केली गेली.
आपल्या कारखान्यात काम करणारा प्रत्येक व्यक्ती महत्वाचा आहे याची जमशेटजींना जाणीव होती. कर्मचाऱ्यांना अपघात विमा देणे, कामाचे तास कमी ठेवणे, त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे, कामाची जागा हवेशीर ठेवणे यांसारख्या गोष्टींमुळे त्यांच्या मिल या जगभरातील सर्वात सुनियोजित मिल म्हणून ओळखल्या जात होत्या. ज्या सुविधा पश्चिमी देशात देखील त्यांच्या कामगारांना मिळत नव्हत्या, त्या जमशेदजी त्याकाळी आपल्या कर्मचाऱ्यांना देत होते.
आर्थिक स्वतंत्रता हीच राजनीतिक स्वतंत्रतेचा आधार आहे हे जमशेटजी जाणत होते. दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता यांच्या विचारांचा प्रभाव जमशेटजींवर होता. जमशेटजींची ४ मोठी स्वप्नं होती. स्टील उद्योग उभा करणं, जागतिक दर्जाचं शैक्षणिक केंद्र उभं करणं, हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट उभा करणं आणि जागतिक कीर्तीचं हॉटेल उभं करणं. दुर्दैवाने यातील हॉटेल सोडल्यास इतर तीन स्वप्नं त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकली नाहीत, पण त्याची बीजं मात्र त्यांनी रोवली होती. आणि ‘शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी’ या म्हणीप्रमाणे त्यांच्या येणाऱ्या पिढीने ही सगळी स्वप्नं पूर्ण केली.
आपल्या अपमानाचा बदला म्हणून भारतीयांसाठी एक भलंमोठं हॉटेल बांधायचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. त्या काळातील ४ कोटी रुपये खर्च करुन ३ डिसेंबर १९०३ रोजी उद्घाटन झालेले ‘दि ताजमहल पॅलेस’ हे वीज वापरणारे देशातले पहिले हॉटेल होते! हे जगविख्यात हॉटेल कसं उभं राहिलं याची कहाणी आम्ही एका व्हिडीओमध्ये सांगितली आहे. त्याची लिंक खाली आहे. तो व्हिडीओ नक्की पहा.
मुंबईची वाढती विजेची गरज पूर्ण करण्यासाठी जमशेटजींनी २ कोटी रूपये भांडवल उभे करून फेब्रुवारी १९११ला खोपोली येथे जलविद्युत प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली. खंडाळा, लोणावळा येथे पडणारे पावसाचे पाणी १८०० फूट ऊंचीवरून खाली खोपोली येथे ७ पाइपलाइन टाकून आणायचे, तेथे जनित्राद्वारे वीज निर्माण करायाची व ती मुंबईला पोहोचवायची अशी ही योजना होती. त्याकरता वळवण येथे दोन धरणे बांधण्यात आली. १९११ साली केलेल्या या कामांत आजही कोठे गळती नाही, की कोणताही पाइप फुटला नाही. प्रचंड वेगाने कित्येक वर्षे या पाइपांतून पाणी येत आहे व ८००० मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. हे काम टाटांच्या ७ हजार लोकांनी ४ वर्षात पूर्ण केले. १९११ साली दळणवळणाची साधने, टेक्नॉलॉजी, परिस्थिती आणि इतर सोयींचा विचार केला, तर ह्या अफाट कामाची व दूरदृष्टीची टाटांची समज किती मोठी होती हे लक्षात येते.
ब्रिटिश जहाजउद्योगाला टक्कर देण्याकरिता त्यांनी आपली ‘टाटा लाइन’ ही जहाजकंपनीही उभारली होती. तथापि ब्रिटिश सरकारच्या वाहतूकदरांच्या स्पर्धेत जमशेटजींना आपल्या स्वदेशी जलवाहतूक कंपनीची प्रगती साधणे शक्य झाले नाही व तो नाद त्यांना सोडावा लागला.
भारतात प्रगत विज्ञान संशोधन केंद्रासाठी जमशेटजींना ‘रॉयल सोसायटी ऑफ इंग्लंडसारखी’ एक संशोधन संस्था भारतात उभी करण्याची होती. यासाठी त्यांनी स्वामी विवेकानंदांचे मार्गदर्शन घेतले. या संस्थेसाठी जमशेटजींनी तेव्हा सव्वा लाख रु. दिले. अनेक दानशूर लोकांनी देणग्या दिल्या. पैसे कमी पडले म्हणून टाटांनी मुंबईतील आपल्या सतरा इमारती विकल्या. मंजुरीसाठी इंग्रज सरकारकडून उशीर झाला, तरी १९११ मध्ये बंगलोर येथे या संस्थेच्या इमारतीचा पाया घालण्यात आला आणि त्याच वर्षी २४ जुलैपासून संस्था कार्यान्वित झाली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अर्थात ‘भारतीय विज्ञान संस्था’ या नावाने ओळखली जाणारी ही ४४० एकरात पसरलेली संस्था आजही जगद्विख्यात आहे.
अर्थव्यवस्थेची प्रगती सातत्याने चालू राहण्यात लोखंड व पोलाद उद्योगाचा फार मोठा वाटा असल्याने जमशेटजींच्या ध्यानात आले होते. अनेक वर्ष शोधाशोध करून आणि संशोधन करून शेवटी बिहारच्या सिंगभूम जिल्ह्यातील साक्ची या छोट्याशा गावात कारखाना उभारण्याचे ठरले. १९११ साली ‘द टाटा आयर्न अँड स्टील कंपनी’ (टिस्को) हा कारखाना सुरू झाला. बघता बघता त्या गावाचं एका मोठ्या शहरात रुपांतर झालं आणि तेथील रेल्वेस्टेशनला ‘टाटानगर’ नाव देण्यात आलं. सध्या झारखंडमध्ये असलेल्या या शहराचं नाव जमशेटजींच्या गौरवार्थ ‘जमशेदपूर’ असं देण्यात आलं. आज टाटा स्टील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कंपनीत खनिज लोखंडापासून उत्कृष्ट पोलादापर्यंतच्या सर्व प्रक्रिया या पार पाडल्या जातात. टाटा स्टील आज भारतातील दुसरी मोठी कंपनी आहे.
प्रचंड अभ्यासू असणाऱ्या आणि जगभर फिरणाऱ्या जमशेटजींनी साताऱ्यातील पाचगणीचं महत्त्व त्या काळात ओळखलं होतं. तिथल्या हवामानात कॉफी आणि स्ट्रॉबेरी चांगली लागेल याची त्यांना खात्री होती. कॉफीत त्यांना यश मिळालं नाही, पण स्ट्रॉबेरी रुजली. फ्रान्समधून रेशमाचे किडे आणून बंगलोर, म्हैसूरमधील शेतकऱ्यांना त्यांनी रेशीम लागवडीचे धडे द्यायला सुरुवात केली. आज म्हैसूरच्या रेशमी साड्यांमुळे हा परिसर रेशीम उद्योगाचं केंद्र बनलाय, त्याच्या मुळाशी जमशेटजीच आहेत.
कर्मचार्यांच्या हक्क आणि अधिकारांसाठीही टाटा सदैव जागरूक राहिले. कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरही ठीकठाक जगता यावं यासाठी भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ ही संकल्पना जमशेटजींनी जन्माला घातली. ही संकल्पना त्यावेळी पाश्चात्य देशांतसुद्धा सुरु झाली नव्हती. काम करताना काही अपघात झाल्यास त्यासाठी नुकसानभरपाईची सोय केली. जमशेटजी म्हणायचे, ‘आपण आपले भागधारक, कामगार यांच्या हिताचा विचार केला; तर प्रगतीचा मळा अधिक फुलतो.’
जमशेटजींनी आपला उद्योग अशा काळात चालू केला जेव्हा उद्योग क्षेत्र फक्त युरोपियनांचीच मक्तेदारी होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर खऱ्या अर्थाने तो औद्योगिकदृष्ट्या तारला गेला तो जमशेटजींच्या दूरदृष्टीने. टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा पॉवर, टाटा केमिकल्स, टाटा टी, टायटन इंडस्ट्रीज, टाटा कम्युनिकेशन्स, ताज हॉटेल्स आणि अशाच अजून १०० कंपन्या आणि त्यात काम करणारे ८ लाखांहून अधिक कर्मचारी ही आहे टाटांची देन.
जमशेटजींनी त्यांच्या दूरदृष्टीने टाटा सन्स लि. ची स्थापना करून तिच्याकडे आपल्या सर्व कंपन्यांचे व्यवस्थापन सोपविले. या संस्थेचे ८५ टक्के भांडवल टाटा कुटुंबातील मंडळींनी उभारलेल्या धर्मादाय न्यासांच्या मालकीचे असल्याने टाटा समूहातील विविध उद्योगांना होणारा फायदा या न्यासांकडे म्हणजे पर्यायाने जनतेकडे पोहोचविला जातो. एका प्रसिद्ध संस्थेच्या रिपोर्टमध्ये गेल्या १०० वर्षातील जगातील सर्वात दानशूर व्यक्ती म्हणून जमशेटजी टाटांचं नाव जाहीर करण्यात आलं होतं.
१९ मे १९०४ रोजी जर्मनीतील न्यूहॅम येथे वयाच्या पासष्टाव्या वर्षी या महान उद्योगपतीचे निधन झाले. ‘भारतीय व्यापार व उद्योग यांच्या भरभराटीसाठी कोणत्याही तत्कालीन भारतीयाने जमशेटजींइतके प्रयत्न केले नाहीत’, हे लॉर्ड कर्झनचे उद्गार यथार्थाने जमशेटजींची थोरवी व्यक्त करतात. त्यांच्या पश्चात दोराबजी व रतनजी या त्यांच्या दोन मुलांनी वडिलांची परंपरा यशस्वीपणे पुढे चालविली.
शंभर सव्वाशे वर्षापूर्वी आपल्यातल्याच एका माणसाने एक स्वप्न पाहिलं. त्यासाठी त्याच्यासह पुढच्या कित्येक पिढ्यांनी जिवाचं रान केलं आणि आजचं हे नंदनवन उभं राहिलं. फक्त देशाची आर्थिक बाजू भक्कम करणारं हे स्वप्न मुळीच नव्हतं, तर देशाच्या सामान्य नागरिकाला सन्मानानं जगता यावं, त्याच्या सर्व गरजा त्याच्या आवाक्यातच पूर्ण व्हाव्यात असा त्यांचा दृष्टीकोन होता. संपत्ती निर्मिती हा टाटांचा उद्देश कधीच नव्हता, उलट समाजाकडून आलेले पैसे समाजालाच परत करावयाचे हे त्यांचे धोरण होते. कोणतीही पार्श्वभूमी नसताना उद्योग क्षेत्रातला ध्रुवतारा असणारे, भारतीय उद्योगाचे भीष्म पितामह म्हणजे जमशेदजी टाटा यांच्या चिरकाल टिकणाऱ्या कार्याला आणि प्रेरणेला आपल्यातही उतरवण्याचा प्रयत्न करूया.
तर ही होती जमशेदजी टाटा यांची जीवन कहाणी. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा.
आणखी वाचा
- जगातील सर्वात मोठ्या बँकेचे संस्थापक जे पी मोर्गन यांची कहाणी
- या माणसामुळे आपल्या घरापर्यंत वीज पोहचली- निकोला टेस्ला
- फोटोग्राफी क्षेत्रातला पहिला कॅमेरा बनवणारा अवलिया – जॉर्ज इस्टमन
- जगातील पहिली गाडी बनवणारा कार्ल बेंझ
- यांच्यामुळे सामान्य माणसाच्या दारात गाडी उभी राहिले – हेन्री फोर्ड
- सायकलच्या दुकानापासून १० हजार कोटींपर्यंत पहिले मराठी उद्योगपती – लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर
- मतिमंद म्हणून शाळेतून काढून टाकलं, तोच मुलगा जगातील सर्वात मोठा संशोधक बनला
- इंग्रजांच्या घरात घुसून त्यांचेच घर विकत घेऊन, त्यांनाच नोकर म्हणून ठेवणारा सांगलीचा पठ्ठ्या