व्यवसायासाठी भगवद्गीतेतून शिकण्यासारखे धडे

भगवद्गीता ही भारतीय संस्कृतीतील एक महान ग्रंथ असून,जगभरातील लोक विविध स्तरांवरून गीतेचे संदेश आत्मसात करतात, परंतु तिचं महत्त्व फक्त आध्यात्मिक जीवनापुरतं मर्यादित नाही. व्यवसाय आणि उद्योजकतेसाठी देखील गीतेतून अनेक प्रेरणादायी धडे मिळू शकतात. आजच्या वेगवान आणि सतत बदलणाऱ्या व्यावसायिक जगात भगवद्गीतेतील शिकवण आपल्याला निर्णय घेण्यासाठी, आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि योग्य मूल्यांचा अभ्यास करण्यासाठी प्रेरणा देते.
आज आपण या लेखात पाहूया की, भगवद्गीतेतील हे तत्त्वज्ञान आपल्याला व्यवसायाच्या यशासाठी कसे मार्गदर्शन करते.
१) निष्काम कर्मयोग – कार्यावर लक्ष केंद्रित करा,
भगवद्गीतेच्या अध्याय २, श्लोक ४७ मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात
“कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥”
याचा अर्थ असा की, माणसाचा अधिकार फक्त कर्मावर असतो, फळावर नाही. आपण कर्म करताना फळाची अपेक्षा करू नये आणि फक्त आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडावे.
व्यवसायाच्या संदर्भात, या श्लोकाचा असा अर्थ लागू होतो की उद्योजकाने नेहमी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावं, नफ्यावर किंवा यशावर नाही. जर एखादा उद्योजक नेहमी फक्त परिणामांवरच लक्ष केंद्रित करतो, तर तो आपल्या कामातून आनंद घेण्यास अपयशी ठरतो. उलट, जर आपलं ध्येय, उद्दिष्ट आणि कार्यप्रणाली यावर लक्ष केंद्रित केलं, तर यश नक्कीच प्राप्त होईल.

२) त्याग आणि नेतृत्व
भगवद्गीतेत त्याग आणि नेतृत्व ह्या दोन्ही गोष्टींना खूप महत्त्व दिलेलं आहे. गीतेच्या १८व्या अध्यायातील श्लोक ९ मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात
“कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन।
सङ्गं त्यक्त्वा फलं चैव स त्यागः सात्त्विको मतः॥”
याचा अर्थ असा आहे की, जे कर्म फक्त कर्तव्य म्हणून केलं जातं , ज्यात फळाची आसक्ती नसते, तोच सात्त्विक त्याग मानला जातो.
उद्योजकतेतही, त्याग हा फार महत्त्वाचा घटक आहे. उद्योजकाने केवळ नफ्यावर लक्ष केंद्रित न करता, कर्मचाऱ्यांचे कल्याण, सामाजिक जबाबदारी आणि भविष्यातील उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. अनेक मोठ्या कंपन्यांनी समान वेतन धोरण, सामाजिक जबाबदारी कार्यक्रम राबवले आहेत, कारण त्यांनी स्वतःच्या फायद्यापलीकडे पाहण्याची वृत्ती स्वीकारली आहे.
जेव्हा उद्योजकात त्यागाची वृत्ती निर्माण होते, तेव्हा त्याच्या नेतृत्वगुणांची देखील आपोआप वाढ होते. त्यागाच्या शक्तीमुळे नेतृत्वकर्त्याला केवळ स्वतःच्या लाभाची नव्हे, तर इतरांच्या हिताची देखील जाणीव होते, ज्यामुळे तो अधिक प्रभावी आणि संवेदनशील लीडर होतो.

३) बदल स्वीकारणे
भगवद्गीतेच्या अध्याय २, श्लोक १४ मध्ये, श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात
“मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः।
आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत॥”
या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की, “हे कुंतीपुत्र, या जगात शीत-उष्णता, सुख-दुःख यासारख्या गोष्टी तात्पुरत्या आणि नाशिवंत आहेत. यांचा धैर्याने सामना करावा.”
ही शिकवण आपल्या दैनंदिन जीवनात तसेच व्यावसायिक क्षेत्रातही महत्त्वाची आहे. कोविड-१९ महामारीसारख्या अनपेक्षित संकटांमुळे अनेक व्यवसायांना फटका बसला, ज्यामुळे त्यांना त्यांच्या व्यवस्थापनात अनेक बदल करावे लागले. व्यवसायात बदल अपरिहार्य असतात आणि त्यांना सामोरे जाणे आवश्यक असते. जो व्यवसाय या बदलांना स्वीकारतो आणि नवीन संधींचा शोध घेतो, तोच यशस्वी होतो.
उद्योजकाने नेहमीच नवीन तंत्रज्ञान, नवीन बाजारपेठा आणि बदलणाऱ्या ग्राहकांच्या गरजा यांना स्वीकारण्यासाठी सज्ज असले पाहिजे. जेव्हा आपण संकटांना धैर्याने तोंड देतो आणि त्यांच्यातून शिकतो, तेव्हा आपण यशस्वी होण्याची शक्यता वाढवतो.
४) भावनांवर नियंत्रण – शांत मनाने यशस्वी व्हा
भगवद्गीतेच्या अध्याय ६, श्लोक ५ मध्ये श्रीकृष्ण सांगतात
“उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्।
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः॥”
या श्लोकाचा अर्थ असा आहे की, व्यक्तीने स्वतःचा आत्मविकास साधावा. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवावं, इतरांना दोष देण्याऐवजी स्वतःच्या आत डोकावून पाहणं आवश्यक आहे, कारण सुख-दुःखाची खरी मुळं आपल्या आतच असतात.
उद्योजकांसाठी हे शिकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. व्यवसायात यश मिळवण्यासाठी त्यांना अनेक लोकांशी आणि परिस्थितींशी जुळवून घ्यावं लागतं. यशस्वी होण्यासाठी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. निर्णय घेताना शांत चित्त ठेवून प्रसंगानुरूप विचारपूर्वक पाऊल उचलणं उद्योजकाच्या प्रगतीसाठी उपयोगी ठरतं .
राग, चिंता, असुरक्षितता यासारख्या भावना उद्योजकाने आपल्यावर हावी होऊ देऊ नयेत, कारण अशा परिस्थितीत घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात. शांत आणि संयमी मनाने विचार केल्यास योग्य दिशा ठरवता येते, ज्यामुळे यश प्राप्त होण्याची शक्यता अधिक असते.

५) बुद्धीचा वापर
अध्याय ३, श्लोक ४३ मध्ये, श्रीकृष्ण सांगतात
“एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना।
जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्॥”
या श्लोकात सांगितलं हे की, आपल्या बुद्धीच्या साहाय्याने कामरूपी शत्रूचा पराभव करावा. व्यवसायात, इच्छांचा प्रभाव अनेक वेळा बुद्धीवर होतो. एक उद्योजक म्हणून आपल्याला आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवून बुद्धीने योग्य निर्णय घ्यावा लागतो. चुकीच्या लोकांना कामावर ठेवणं, चुकीच्या गुंतवणूकदारांची निवड करणं यांसारख्या गोष्टींमुळे मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणून, इच्छांवर नियंत्रण ठेवून सत्य आणि योग्य गोष्टींची निवड करणं आवश्यक आहे.
६) निर्णयांवर ठाम रहा – आपल्या कर्तव्याचे पालन करा
अध्याय १८, श्लोक ४८ मध्ये श्रीकृष्ण सांगतात
“सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत्।
सर्वारम्भा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः॥”
याचा अर्थ असा आहे की, आपले सहज कर्म, जरी त्यात काही दोष असले तरी, त्याला नाकारता येत नाही. याचा अर्थ, आपल्याला आपल्या कर्तव्याचे पालन करताना किंवा निर्णय घेताना जरी काही अडचणी आल्या किंवा दोष काही असले तरी त्यांना थांबवू नये.
उद्योजकतेमध्ये प्रत्येक निर्णयावर काही ना काही दोष किंवा असहमती असू शकते. परंतु, जर तो निर्णय कर्तव्य म्हणून घेतला असेल आणि योग्य हेतूने करण्यात आलेला असेल, तर त्यावर ठाम राहणं आवश्यक आहे. यशस्वी उद्योजक कधीच स्वतःच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करून काम सोडत नाहीत. उलट ते आपल्या निर्णयांवर ठाम राहून आपल्या कर्तव्याचे पालन करतात.
७) नैतिकता
भगवद्गीतेच्या अध्याय १६, श्लोक ३ मध्ये श्रीकृष्ण सांगतात
“तेजः क्षमा धृतिः शौचमद्रोहो नातिमानिता।
भवन्ति सम्पदं दैवीमभिजातस्य भारत॥”
या श्लोकात ‘तेज’, ‘क्षमा’, ‘धैर्य’, ‘शुद्धता’, ‘कोणाबद्दलही शत्रुत्व न बाळगणे’ आणि ‘स्वतःच्या मोठेपणाचा अभिमान न ठेवणे’ यांसारख्या गुणांची महत्ता सांगितली आहे. हे गुण प्रामाणिक आणि गुणी व्यक्तींची लक्षणे मानली जातात.
उद्योजकतेत नैतिकतेवर आधारित नेतृत्व असणं खूप महत्वाचं आहे, म्हणजे कर्मचार्यांशी आदराने वागणं , सामाजिक जबाबदारीचे पालन करणं आणि कंपनीच्या सर्व निर्णयांमध्ये पारदर्शकता राखणं हेचं यश मिळवण्याचं मुख्य द्योतक आहेत. \
मित्रांनो, भगवद्गीता केवळ एक धार्मिक ग्रंथ नसून, ती जीवनाच्या प्रत्येक पैलूवर लागू होणारे मार्गदर्शन करते. कर्मयोग, त्याग, बदल स्वीकारणं, भावनांवर नियंत्रण ठेवणं, बुद्धीचा योग्य वापर करणं, निर्णयांवर ठाम राहणं आणि नैतिकतेच्या मूल्यांचं पालन करणं या सर्व गोष्टी उद्योजकाला एक यशस्वी उद्योजक बनवतात.