स्वप्नं बघा, ती पूर्ण होतात!
स्वप्नं ती नव्हे जी झोपेत पडतात, स्वप्नं ती जी तुम्हाला झोपूच देत नाहीत असे डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम म्हणायचे. स्वप्नं म्हणजे काय? जर तुम्ही शब्दकोशात याचा अर्थ शोधलात, तर तुम्हाला उत्तर मिळेल, ‘एखादी इच्छित गोष्ट मिळविण्याचा ध्यास, ध्येय, महत्वाकांक्षा’. थोडक्यात एखादी अशक्य वाटणारी, तरीही मिळवता येईल अशी मोठी इच्छा.
स्वप्नं सारेच बघतात. मोठी स्वप्नं न बघणारा माणूस शोधूनही सापडणार नाही, पण सगळ्यांचीच स्वप्नं प्रत्यक्षात येत नाहीत. याचे कारण म्हणजे काहीजण स्वप्न बघतात आणि ते साध्य करण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करतात, तर बाकीचे लोक लगेच आपली स्वप्नं लगेच विसरून जातात. पहिल्या प्रकारच्या लोकांमध्ये मोठी स्वप्नं बघायची, ते साध्य करण्याची हिंमत असते. असे लोक इतरांनाही प्रेरित करत असतात.
सचिन तेंडुलकर, तुमच्या माझ्यासारखाच मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला मुलगा. पण त्याची स्वप्नं आभाळापेक्षाही मोठी होती. जी साकार करणं अशक्यप्राय गोष्ट होती… पण तो निघाला इतिहास घडवण्यासाठी… लहानपणापासूनच क्रिकेटमध्ये असलेल्या प्रचंड वेडापायी क्रिकेटलाच आपले करिअर करण्याचे ठरविले… एकमेव गोष्ट ज्यामुळे तो नेहमी पुढे जात राहिला, ती म्हणजे; त्याची मोठी स्वप्नं, त्याचा दृष्टीकोन, त्याची चिकाटी आणि खेळाविषयी असलेली प्रचंड तळमळ. यामुळे तो क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट बनला. आपल्या असामान्य बॅटिंगनं त्यानं अवघ्या क्रिकेटजगताला वेड लावलं. पण याहूनही महत्त्वाचं म्हणजे लाखो करोडो लोकांना त्यानं स्वप्न बघायला शिकवलं. या पिढीला त्यानं स्वप्नांचा पाठलाग करायला शिकवलं, ज्यांची अशी स्वप्नं बघायची आधी हिंमत सुद्धा होत नव्हती.
सर रॉजर बॅनिस्टर, चार मिनिटांपेक्षाही कमी वेळात एक मैल अंतर धावणारी जगातील पहिली व्यक्ती. १९५४मध्ये त्यांनी हा कारनामा केला होता. तोपर्यंत चार मिनिटांत एक मैल धावणे ही लोकांना अशक्य गोष्टच वाटत होती. त्यांना वाटायचे मानवी शरीराच्या मर्यादांमुळे कुठलाही माणूस एवढ्या वेगाने पळू शकत नाही. ही अशक्य अशी गोष्ट आहे. पण बॅनिस्टर यांनी सगळ्यांना खोटे ठरवले. त्यांनी स्वतःवर मेहनत घेतली. कठोर परिश्रम केले आणि महत्त्वाचं म्हणजे आपण हे करू शकतो हा विश्वास कायम ठेवला. महान लोकांची हीच तर खासियत असते. ही माणसं म्हणजे त्या मेणबत्तीसारखी असतात, जी स्वतः जळून इतरांचं जीवन प्रकाशमान करत असते. त्यांच्या जीवनात आशेचा आणि प्रेरणेचा नवीन किरण जागवत असते. मग जर ते करू शकतात, तर तुम्हाला का नाही जमणार? जर तुम्ही स्वयंशिस्त, चिकाटी या गोष्टी आत्मसात केल्या, आयुष्यात नवनवीन आव्हानं स्वीकारत गेलात, चालढकल करणे थांबवले, तर तुमची स्वप्नं साकार करण्यापासून तुम्हाला कुणीही थांबवू शकणार नाही. आणि या प्रवासात तुम्ही अनेक लोकांच्या आयुष्यातील असा प्रकाशाचा किरण बनाल, ज्याच्यामुळे अनेकांना यश मिळवण्याच्या मार्गावर चालना मिळते.
इथे मला ‘टर्बो’ या सिनेमातील एक सुंदर विचार आठवतोय “कुठलंही स्वप्नं खूप मोठं नसतं आणि स्वप्नं पाहणारा लहान नसतो”. मोठी स्वप्नं फक्त तुमच्याच नाही तर इतर अनेकांच्या सकारात्मक बदल घडवून आणत असतात. त्यांना प्रेरित करत असतात.
त्यामुळे मोठी स्वप्नं बघा, त्या दिशेने काम करा आणि इतरांना सुद्धा प्रेरणा द्या. कारण जगात काहीही अशक्य नाही!!!
आणखी वाचा
- तुम्ही ज्यांच्या सहवासात असता तसेच तुम्ही बनता…
- यश मिळवण्यासाठी कल्पकता व शांत डोक पाहिजे
- दृष्टीकोन’ बदला आयुष्य बदलेल
- अती विचाराच्या रोगापासून दूर राहा
- फक्त तुम्हीच स्वतःमध्ये बदल घडवू शकता