फेसबुकद्वारे तुमच्या बिझनेसला करायचंय सुपर बुस्ट, तर Facebookचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहितीच पाहिजेत
फेसबुक… हे नाव आपण ऐकले किंवा पाहिल्यानंतर आपल्याला सर्वात पहिलं दिसतं, ते म्हणजे फोटो, व्हिडिओ, मीम्स आणि असं बरंच काही. लहानांपासून ते म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी फेसबुक हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. ही झाली फेसबुकची एक बाजू. मात्र, याची दुसरी बाजूही आपण समजून घेतली पाहिजे. ती म्हणजे, फेसबुक हे फक्त मनोरंजनाचे किंवा वेळ घालवण्याचे माध्यम नाहीये. खरं तर, फेसबुक लघु उद्योजकांपासून ते वर्षाकाठी हजारो कोटींचा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यावसायिकासाठी महत्त्वाचं आहे.
अनेकांनी फक्त फेसबुकचा वापर करून आपला व्यवसाय शिखरावर नेऊन ठेवला आहे. परंतु अनेक व्यावसायिक असे आहेत, ज्यांनी आपल्या व्यवसायासाठी अद्याप फेसबुकचा वापर सुरूच केला नाहीये. मात्र, त्यांनी जर फेसबुकचा वापर केला, तर त्यांच्या व्यवसायात वाढ झाल्याशिवाय राहणार नाही. आजचा हा लेख, त्या लोकांसाठी आहे, ज्यांना आपल्या व्यवसाय अनेक पटींनी वाढवायचा आहे. चला तर, फेसबुकचा वापर करून तुम्ही तुमच्या व्यवसायाला ‘चार चांद’ कशाप्रकारे लावू शकता, हे जाणून घेऊयात…
प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर तुमचा व्यवसाय लहान आहे की मोठा, याने काहीही फरक पडत नाही. प्रत्येक व्यवसाय फेसबुक बिझनेस पेजेसचा फायदा घेऊ शकतो. फेसबुक हे राजकीय तक्रारी, मजेशीर मीम्स, दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यापेक्षा खूप काही आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या व्यवसायाचे फेसबुक पेज तयार करता, तेव्हा तुम्ही सध्याचे आणि भविष्यातील कस्टमर (ग्राहक) शोधताना तुमचा ऑनलाईन प्रेझेन्स सुधारू शकता. व्यवसायासाठी फेसबुकचा वापर करणे खूपच सोपे आहे. योग्य स्ट्रॅटेजी (रणनीती) वापरून तुम्ही तुमचा व्यवसाय वेगाने वाढवू शकता.
फेसबुक बिझनेस पेजची ताकद
सर्वसाधारणपणे अनेक युजर्स हे दिवसातून एकदा का होईना फेसबुकवर फेरफटका मारतच असतात. दैनंदिन आयुष्यात काय घडतंय, याच्याशी जोडले राहण्यासाठी ते दिवसातून एकदा तरी फेसबुक स्क्रोल करतातच. फेसबुक युजर्सला त्यांच्या मित्र आणि कुटुंबाशी जोडलेले राहायचे असते. तसेच, जगात घडणाऱ्या गोष्टींमधून काही ना काही शिकायचे असते. तसेच, त्यांच्या आवडत्या ब्रँड आणि बिझनेससोबत जोडले राहायचे असते. जर तुम्ही तुमच्या व्यवसायाशी संबंधित काही अनाऊन्समेंट (घोषणा) केल्या असतील, तर त्यादेखील त्यांना जाणून घ्यायच्या असतात.
चला तर, फेसबुक बिझनेस पेजचे मोठे फायदे काय आहेत? हे आपण जाणून घेऊयात…
व्यवसायासाठी फेसबुक बिझनेस पेज वापरण्याचे फायदे
१. ऑनलाईन प्रेझेन्स सुधारणे
२. डायरेक्ट कस्टमर एंगेजमेंट
३. किफायतशीर मार्केटिंग
४. ऍनालिटिक्स आणि इनसाइट्स
५. जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रवेश मिळतो
१. ऑनलाईन प्रेझेन्स सुधारणे
प्रत्येक व्यवसायासाठी फेसबुक पेज असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण, फक्त फेसबुक पेज असणे गरजेचे नाही, तर तुम्ही त्यावर दरदिवशी काही ना काही पोस्ट केले पाहिजे. जेणेकरून, तुमच्या ग्राहकांना तुमच्या व्यवसायाशी जोडले जावेसे वाटेल. तुम्ही तुमच्या फेसबुक पेजवर काय पोस्ट करत आहात, हे त्यांना जाणून घ्यायचे असते. तसेच, त्या पोस्टवर कमेंट करून तुम्ही त्याला रिप्लाय (प्रतिसाद) द्यावा असेही त्यांना वाटत असते. अशात, जर ग्राहक तुमच्या पेजवर आले आणि त्यांना कोणतीही पोस्ट दिसली नाही, तर ते तुमच्या पेजला रामरामही ठोकू शकतात. त्यामुळे तुम्ही सातत्याने तुमचा ऑनलाईन प्रेझेन्स (ऑनलाईन उपस्थिती) सुधरवणे खूपच गरजेचे आहे.
२. डायरेक्ट कस्टमर एंगेजमेंट
डायरेक्ट एंगेजमेंट हा एक फेसबुक बिझनेस पेजचा सर्वात मोठा फायदा आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स हे इंटरॅक्शन्स सोपे व्हावे या अर्थाने डिझाईन केलेले असतात. विशेष म्हणजे, हे वैयक्तिक आणि बिझनेस या दोन्हींच्या बाबतीत लागू होते. त्यामुळे तुमच्या संभाव्य ग्राहकांना तुमच्याशी जोडून घेण्यासाठी त्यांच्याशी संबंध वाढवा. तुम्ही फक्त तुमच्या ग्राहकांना कमेंट आणि डायरेक्ट मेसेज करू शकत नाहीत, तर तुम्ही त्यांच्यासोबत तुमची मूल्ये, कौशल्य आणि कामाशी संबंधित आकडेवारीही शेअर करू शकता. नियमितपणे टार्गेटेड बातम्यांच्या फीडमध्ये दिसून तुम्ही तुमची कंपनी कशामुळे वेगळी बनते ते हायलाईट करू शकता.
३. किफायतशीर मार्केटिंग
आता अनेकांना वाटत असेल की, फेसबुक बिझनेस पेज सुरू करायचं म्हणजे, त्यासाठी कितीतरी रुपये खर्च करावे लागत असणार. मात्र, हा तुमचा गैरसमज आहे. फेसबुक बिझनेस पेज तयार करण्यासाठी एकही रुपया खर्च करावा लागत नाही. ही सुविधा मोफत आहे. मात्र, तुम्ही तिथे तुमच्या मार्केटिंग बजेटवर पैसे खर्च करू शकता. तुमच्या बिझनेस पेजची फॉलोईंग वाढवण्यासाठी आणि सोशल मीडिया स्ट्रॅटेजी कशी विकसित करायची, हे शिकत असताना फेसबुक जाहिरातीचाही विचार करा.
फेसबुक जाहिरातींद्वारे, तुम्ही फक्त तेव्हाच पैसे भरता, जेव्हा लोक तुमची जाहिरात पाहतात किंवा त्यावर क्लिक करतात. तुम्हाला कोणत्या प्रकारच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचे आहे, हे ठरवले की, हे मार्केटिंग सर्वात किफायतशीर ठरते. त्यामुळेच आपल्या टार्गेट मार्केटचा विचार करणे खूप महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही फेसबुक जाहिरात टार्गेटिंगसाठी सर्वात आवश्यक असलेल्या डेमॉग्राफिक्सचा अभ्यास करा.
४. ऍनालिटिक्स आणि इनसाइट्स
तुम्ही एकदा फेसबुक बिझनेस पेज सुरू कसे करायचे हे शिकलात, की तुम्हाला प्रभावी अशा इनसाइट्स डॅशबोर्डचा ऍक्सेस मिळेल. तुमच्या साइटला भेट देणाऱ्या आणि तुमच्या पोस्टशी संवाद साधणाऱ्या लोकांचा ट्रेंड तुम्हाला दाखवण्यासाठी फेसबुक तुमच्यापुढे आकडेवारी आणून देते. याद्वारे तुम्ही तुमच्या जाहिरातींवर क्लिक करणाऱ्यांची संख्यादेखील पाहू शकता.
व्यवसायासाठी फेसबुक वापरण्याचा तुमचा दृष्टीकोन सुधारल्यामुळे हे उपयुक्त आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायात कोणत्या गोष्टींची सुधारणा केली जाऊ शकते याबद्दल रियल-टाईम इनसाइट्स मिळतील. शेवटी, सोशल मीडिया मार्केटिंग योजना, सर्व मार्केटिंग स्ट्रॅटेजीप्रमाणे, आपण कालांतराने शिकत असताना बदलू शकता.
५. जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रवेश मिळतो
तुम्हाला रंजक बाब सांगतो. तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण फेसबुकवर तब्बल तीनश कोटींहून अधिक लोकांचे अकाऊंट्स आहेत. तुमच्या टार्गेट प्रेक्षकांसाठी किंवा त्यांच्यापैकी काहींसाठी तुमच्या ब्रँडशी प्रथमच फेसबुकद्वारे ओळख करून देणे शक्य आहे. याला वर्ड-ऑफ-माऊथ मार्केटिंग म्हणून ओळखले जाते. बरेच लोक पैसे देऊन करणाऱ्या जाहिरातींपेक्षा मित्र, कुटुंब आणि अगदी अनोळखी लोकांच्या शिफारशींवर अधिक विश्वास ठेवतात. सोशल मीडियाच्या शब्दात सांगायचं झालं तर, वर्ड ऑफ माऊथ किंवा माऊथ पब्लिसिटी. म्हणजेच युजरच्या फेसबुक फीड किंवा इनबॉक्समध्ये शेअर्स, कमेंट्स, फॉलो इ. जेव्हा तुम्ही तुमच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये फेसबुकचा वापर करता, तेव्हा तुम्हाला या ऑरगॅनिक आउटरीचचा फायदा होतो.
अशाप्रकारे, फेसबुकचा वापर करून तुम्ही रुळावरून खाली उतरलेल्या तुमच्या व्यवसायाची गाडी पुन्हा रुळावर आणू शकता.
सोशल मीडियाच्या जगात वावरणाऱ्या मित्रमंडळींनो, तुम्हाला हा लेख कसा वाटला, हे कमेंट करून नक्की सांगा. तसेच, तुमच्या कोणत्या मित्र-मैत्रिणींना त्यांच्या व्यवसायासाठी हा लेख फायदेशीर ठरू शकतो, असे वाटत असेल, तर त्यांनाही हा लेख नक्की शेअर करा. आणि हो, इतर कोणत्या विषयांवर लेख वाचायला आवडतील, हेदेखील कमेंट करून नक्की सांगा.
आणखी वाचा
- RBI चं मोठं पाऊल! Paytm Payment Bank वर घातली बंदी, एका क्लिकवर वाचा A to Z प्रश्नांची उत्तरे
- UPI मधील नवीन बदल: आर्थिक व्यवहार अधिक सोपे आणि सुरक्षित
- तंत्रज्ञानाच्या वापराने भविष्यातील ‘या’ 5 समस्या होणार दूर!