२.1 कल ओळखण्याची कला
कल ओळखण्याची गरज काय आहे? याबाबतची माहिती आपण पाहिली. त्यावर अजून थोडे जाणून घेणे गरजेचे आहे. काही लोकांना आयुष्याच्या सूरवातीला असणाऱ्या उपजत क्षमतांची जाणीव झाली. त्यांनी त्यावर काम केले व त्यांना त्या-त्या क्षेत्रात यशस्वी होता आले. काही लोकांना त्यांच्या क्षमताबाबत आयुष्याच्या अगदी शेवटी लक्षात आले, त्यांच्या उपजत क्षमतावर त्यानी काम केले व त्यात त्यांची ओळख निर्माण केली.
तर काही लोक त्यांच्यातल्या उपजत क्षमता न जाणताच मरुन गेले. मात्र त्यांना त्यांच्या आयुष्यात साध्या साध्या गोष्टीसाठी झगडावे लागले, मोठा संघर्ष करावा लागला. मात्र काही लोकांना त्यांच्यातल्या योग्य सुप्त गुणांचा शोध लागला नसला तरी त्यांनी आपल्या क्षमतांवर मात करत जीवनात यश मिळवले.
एखाद्याला लहानापणापासूनच तबला वाजवण्याची आवड असेल, त्याला तबला वाजवण्याचे चांगले प्रशिक्षण मिळाले, तर तो चांगला तबलावादक बनू शकेल. मात्र त्याला सूरवातीच्या काळात नुसते लिहणे वाचणे इतर गोष्टीचे शिक्षण जबरदस्तीने देत गेले तर तो ना चांगला तबला वाजवू शकेल, ना चांगला विद्यार्थी बनू शकेल. लिहता वाचता येणे गरजेचे आहे. त्याची सुध्दा जीवनात एक महत्त्वाची भूमिका आहे.
एक मुलगा कधी विहिरीजवळ गेला नाही, पोहण्याचा आणि त्याचा कधीही संबंध आला नाही. आणि आयुष्याची चाळिशी उलटून गेल्यावर (तो एक गृहस्थ बनल्यावर) त्याने एकदा पोहायचा प्रयत्न करुन पाहिला. काही दिवसातच त्याला उत्तम पोहता सुध्दा येऊ लागले. त्याच्यात जन्मतःच पोहण्याची कला होती. मात्र त्या क्षेत्राचा व त्याचा कधीही संबंध न आल्याने त्याला ते योग्य वयात समजले नाही. चाळीस वर्षे उलटून गेल्यावर समजले तेव्हा तो काहीही करु शकला नाही. हेच जर अगदी लहान वयात समजले असते तर तो उत्तम जलतरणपटू होऊ शकला असता.
गेलेल्या संधीवर रडत बसून चालणार नाही. हा लेख वाचताना कदाचित आपले बरेच वय निघून गेलेले असेल. त्यावर खंत करुन काहीही फायदा होणार नाही. आता सुध्दा वेळ गेलेली नाही. माणूस काय एकच क्षमता घेऊन जन्माला येत नाही. आपल्याकडे असणाऱ्या अनेक क्षमतापैकी आपण सध्या बरेच काही साध्य करु शकू अशा क्षेत्रात काम केल्यास अजूनही यश खेचून आणण्याची जिगर आपल्याकडे नक्कीच आहे. म्हणून आपल्यातल्या क्षमतांचा शोध कायम घेत राहणे गरजेचे आहे. ज्याला आपल्या उपजत क्षमतांचा शोध लागला आहे. त्यांनी त्यावर काम करत राहिले पाहिजे.
आपली अवस्था कस्तुरीमृगासारखी आहे. कस्तुरी ही मृगाच्या नाभीतच असते. मात्र तो मृग संपूर्ण जंगलभर तिच्या शोधात सैरावैरा धावत असतो. विद्यार्थ्यांनी सुध्दा आपल्याला कोणते विषय आवडतात? शिकण्याची कोणती पध्दती आवडते? शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त कोणत्या गोष्टी आपण करु शकतो? आपला खरा आनंद कशात आहे? याचा शोध घेत राहिले पाहिजे. पालकांनी यासाठी मुलांना मदत केली पाहिजे. या क्षमता ओळखण्याच्या काही पध्दती आहेत. त्यासाठी काही चाचण्या आहेत. काही परिक्षा आहेत किंवा काही शास्त्रीय पध्दतीने विकसित केलेली तंत्रज्ञाने बाजारात उपलब्ध आहेत. त्यात आपला कल ओळखून आपला मार्ग निवडला पाहिजे. जीवनात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, करिअर प्रत्येक क्षेत्रात करता येते. जीवनात आवश्यक असलेली आर्थिक सुबत्ता आपण सर्व क्षेत्रातून प्राप्त करुन घेऊ शकतो. तेव्हा आपला आनंद शोधा. आपल छंद हेच आपले काम असेल तर आपल्याला त्या कामाचा कधीही कंटाळा येणार नाही.
सध्याच्या काळात डीएमआयटी सारख्या टेस्टच्या माध्यमातून प्रत्येकामध्ये असलेले गुण जाणून घेता येतात. या टेस्टसाठी खर्च जरुर करावा लागतो. मात्र आयुष्यात पुढे वाया जाणारी वर्षे वाचवली जाऊ शकतात. मला लोकसंवाद साधायची उपजत देणगी लाभली आहे, तिचा उपयोग करुन मी आपल्या पर्यंत पोहोचत असतो. अशा या कला व शिकण्याच्या पध्दतीतून ओळखून त्याचा विकास करण्याबाबत ची माहिती उद्याच्या लेखात पाहू या. धन्यवाद.