Aavadel Tethe Pravas Yojana: तिकीट बुकिंगची कटकट नाही! एका पासमध्ये फिरा महाराष्ट्रभर, एसटीची ‘आवडेल तेथे प्रवास’ योजना!

प्रवास करणं ही आपल्यातील बहुतेक जणांची आवड असते. नवीन ठिकाणं पाहणं, वेगवेगळे अनुभव घेणं आणि त्या प्रत्येक प्रवासातून काहीतरी शिकणं यात एक वेगळीच मजा असते; पण अनेकदा आपली इच्छा असूनही, तिकीट आरक्षण, प्रवासाचा खर्च, वेळेचा अपव्यय आणि बसेसचा अभाव अशा अडचणींमुळे ही आवड पूर्ण होत नाही. त्यामुळेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) एक खास योजना सुरू केली आहे ती म्हणजे “आवडेल तेथे प्रवास योजना.”
ही योजना म्हणजे प्रवाशांसाठी एक पर्वणीच आहे. जर तुम्हाला कमी खर्चात महाराष्ट्र फिरायचा असेल, तर ही योजना तुमच्यासाठीच आहे. अगदी काही मोजक्या अटींसह, तुम्हाला हवं तिथं, हव्या त्या वेळेस, हव्या त्या मार्गावर प्रवास करता येतो. चला तर मग, आजच्या लेखात या नव्या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
या योजनेची सुरुवात कशी झाली? (How did the plan start?)
“आवडेल तेथे प्रवास योजना” ही प्रथम १९८८ साली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाद्वारे सुरू करण्यात आली होती. त्यावेळी प्रवाशांना १० दिवसांचा पास देण्यात यायचा. मात्र, २००६ मध्ये या योजनेत बदल करण्यात आला आणि त्या ऐवजी ४ व ७ दिवसांचे पास उपलब्ध करून देण्यात आले. या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की, राज्यातील नागरिकांनी कमी खर्चात संपूर्ण महाराष्ट्रात प्रवास करावा आणि त्यासाठी एसटी बस सेवेचा अधिकाधिक वापर व्हावा.
या योजनेअंतर्गत प्रवाशांना साधी एसटी, जलद सेवा, रात्रीची बस, शिवशाही आणि हिरकणी अशा विविध बस प्रकारांची निवड करता येते. ही योजना वर्षभर लागू असली तरी सण-उत्सव, उन्हाळी सुट्ट्या, हिवाळा आणि लग्नसराईच्या काळात याला अधिक चांगला प्रतिसाद मिळतो. विशेषतः पर्यटन स्थळं आणि धार्मिक ठिकाणांसाठी हे पास मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. ही योजना म्हणजे कमी खर्चात मोकळेपणानं प्रवास करण्याची एक उत्तम संधी आहे.
योजनेची वैशिष्ट्ये काय?
ही योजना एसटी महामंडळाची अत्यंत उपयुक्त आणि प्रवाशांसाठी सोयीची योजना आहे. या योजनेअंतर्गत दिले जाणारे पास संपूर्ण महाराष्ट्रात तसेच काही आंतरराज्य मार्गांवरही वापरता येतात. विशेष म्हणजे या पासवर प्रवाशांना आरक्षणाची सुविधा देखील उपलब्ध आहे, त्यामुळे प्रवास अधिक आरामदायक आणि नियोजित करता येतो.
या योजनेत ७ दिवसांच्या पासाचे दर पाहिल्यास, साध्या बसेससाठी प्रौढ प्रवाशांसाठी २०४० रुपये आणि मुलांसाठी १०२५ रुपये आकारले जातात. शिवशाही बसेससाठी हे दर अनुक्रमे ३०३० रुपये (प्रौढ) आणि १५२० रुपये (मुले) आहेत. ४ दिवसांच्या पासचे दर साध्या बसेससाठी प्रौढ ११७० रुपये आणि मुले ५८५ रुपये, तर शिवशाहीसाठी प्रौढ १५२० रुपये आणि मुले ७६५ रुपये आहेत. हे मुलांचे दर ५ ते १२ वर्षे वयोगटासाठी लागू होतात. कमी खर्चात आणि मोजक्या अटींसह आणि हवी तशी बससेवा निवडण्याच्या पर्यायामुळे ही योजना खरोखरच प्रवाशांसाठी एक उत्तम संधी आहे.
योजनेचे फायदे (Benefits of the scheme)
- खर्चात बचत होते, कारण कमी पैशात राज्यभर सहज प्रवास करता येतो.
- संपूर्ण महाराष्ट्रात प्रवास करता येत असल्यामुळे पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळे आणि नातेवाईकांना भेट देणं शक्य होतं.
- आरक्षणाची सुविधा उपलब्ध असल्यामुळे प्रवास अधिक सोयीचा आणि निश्चित होतो.
- पासचा कालावधी रात्री बारा वाजल्यापासून सुरू होतो आणि शेवटच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत वैध असतो.
- प्रौढ प्रवाशाला ३० किलो आणि मुलांना १५ किलो पर्यंत सामान मोफत वाहून नेण्याची परवानगी मिळते.
योजनेचे नियम व अटी (Terms and conditions of the scheme)
- पास फक्त ज्याच्या नावावर असेल, त्याच व्यक्तीने वापरायचा असतो. तो दुसऱ्या कोणालाही वापरायला देता येत नाही.
- जर पास हरवला, तर त्याची कोणतीही भरपाई किंवा नवीन पास दिला जात नाही.
- प्रवासादरम्यान काही सामान हरवले किंवा नुकसान झाले, तर त्याची जबाबदारी एसटी महामंडळ घेत नाही.
- पासचा गैरवापर झाल्यास, तो पास लगेच रद्द करण्यात येतो.
- शिवशाही बससाठी स्वतंत्र पास घ्यावा लागतो आणि त्याचे दरही वेगळे असतात.
पास कसा घ्यावा? (How to get a pass?)
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या एसटी स्टँडवर जावे लागते. तिथे ठराविक नमुन्यातील अर्ज भरावा लागतो. अर्जासोबत दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, आधार कार्डची प्रत आणि पासची रक्कम द्यावी लागते. हे सर्व तपासून झाल्यावर तुम्हाला पास दिला जातो.
कधी कधी एसटीचा संप किंवा आंदोलन झाल्यास प्रवासी प्रवास करू शकत नाहीत. अशा वेळी प्रवास न झालेल्या दिवसांचा परतावा मिळतो किंवा पासाच्या कालावधीत वाढ दिली जाते. त्यामुळे प्रवाशांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहत नाही.
मित्रांनो, स्वस्तात मस्त असलेली ही योजना सामान्य माणसांसाठी खूप उपयोगी आहे. तुम्ही पर्यटनासाठी, नातेवाईकांना भेटण्यासाठी, व्यापारासाठी किंवा फक्त भटकंतीसाठी प्रवास करत असाल तरीही ही योजना तुमच्यासाठी निश्चितपणे फायद्याची ठरते.
आणखी वाचा:
- ऑनलाइन पेमेंट करताना भीती वाटते? या टिप्स नक्की फॉलो करा.
- कॅश क्रंचमुळे तुमचा व्यवसाय संपतोय का?
- स्मार्ट बचतीसाठी 6 महत्त्वाचे नियम